लेख-समिक्षण

पुन्हा तारीख

महाप्रलय… कयामत… जजमेन्ट डे… बहुतांश धर्मविचारांमध्ये या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. पृथ्वीचा आणि संपूर्ण सजीवसृष्टीचा नाश या संकल्पनेत अभिप्रेत आहे. या दिवसाचं स्मरण ठेवून आपली कृती असावी, पाप करण्याची दुर्बुद्धी होऊ नये, सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा हेतू यामागे आढळतो. महाप्रलय म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसर्‍या युगाची सुरुवात, असं मानलं जातं. जगात पापाचा भार वाढला की प्रलय येतो. पुण्यवान लोकांना देव त्यातून तारतो. मग पुन्हा एकदा सृष्टीची निर्मिती होते आणि पुण्यवान लोक या नव्या जीवसृष्टीला चांगला आकार देतात. आधुनिक काळातही सृष्टीचा अंत जवळ आल्याच्या चर्चा जगभरात वारंवार होत असतात. त्यासाठी कुणी नॉस्ट्रेडॅमस या फ्रेंच भविष्यवेत्त्याचा, कुणी आइनस्टाइनसारख्या शास्त्रज्ञाचा तर कुणी माया संस्कृतीमधील कॅलेंडरचा हवाला देतो. अलीकडच्या काळात 2012 या वर्षासंबंधीची चर्चा खूप गाजली. माया संस्कृतीतील ज्योतिषांनी या वर्षापर्यंतचं कॅलेंडर तयार केलेलं आहे आणि कॅलेंडर संपताच प्रलय होऊन पृथ्वी नष्ट होणार, असं सांगितलं गेलं. 2012 मध्ये या संभाव्य विनाशाला सामोरं जाण्याची मानसिक तयारीही अनेकांनी केली होती. तसं खरोखर घडलंय, असं गृहित धरून संभाव्य विनाशाचं दर्शन घडवणारा चित्रपटही हॉलिवूडकरांनी बनवला. नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाणीचा अर्थ लावणार्‍यांनी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याचं वारंवार सांगितलंय. या संभाव्य धडकेची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
ताज्या ‘माहिती’नुसार 13 एप्रिल 2029 ही तारीख चर्चेत आहे. एक हजार फुटांपेक्षा अधिक लांबीचा एक लघुग्रह या दिवशी पृथ्वीचा खूपच जवळून जाणार असल्याचं सांगितलं गेलंय. तो जर पृथ्वीला धडकला, तर हिरोशिमावर पडलेल्या अणुबाँबच्या 10 लाख पट ऊर्जा निर्माण होईल आणि आपला सर्वांचा अंत होईल. समुद्रात शंभर मीटरपेक्षा उंच लाटा उसळतील आणि सर्वकाही नष्ट होईल. हा धोका टळल्यास 12 जुलैै 2038 रोजी त्याहून मोठा लघुग्रह पृथ्वीला धडक देईल. 2012 मध्ये काहीच घडलं नाही. आता जे सांगितलं जातंय ते घडेल का? लक्षावधी वर्षांपूर्वी अशी घटना घडून गेली आहे. त्यावेळी पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट झाली होती. त्यामुळं अशी काही माहिती समोर आली, की लोकांना धडकी भरते. अर्थात तरीही ज्या दोन संभाव्य तारखा आता दिल्या जात आहेत, त्यासंबंधी कुणीही ठोस विधान केलेलं नाही. सर्वकाही शक्यता आणि गृहितकांच्या पातळीवर आहे. नासा या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेनं अशी एखादी घटना घडणार आहे, असं ‘गृहित धरून’ केलेल्या अभ्यासाची बातमी अनेकांसाठी भीतीदायक ठरली आहे.
बारा वर्षांनंतर एखादा लघुग्रह जर पृथ्वीच्या दिशेने वेगात येऊ लागला, तर संभाव्य हानी टाळण्यासाठी काय करता येईल, या विषयावर शंभर तज्ज्ञांनी अभ्यास केला. परंतु या तारखेला खरोखर लघुग्रह पृथ्वीला धडकणारच असं गृहित धरल्यामुळं सोशल मीडियावर घबराट पसरली. अशा माहितीची शहानिशा कशी करायची? असा प्रश्न पडत असेल तर मुळात शहानिशा करूच नये. आलाच असेल शेवट जवळ तर तो टाळणं आपल्या हातात नाही; पण शेवट गोड करणं आपल्याला नक्की शक्य आहे. -कीर्ती कदम

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *