लेख-समिक्षण

पाकिस्तानवर काळ उलटला!

एकेकाळी संपूर्ण जगभरात दहशतवादी हिंसाचाराने थैमान घालणार्‍या तालिबानला अस्र-शस्रांपासून लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत सर्वतोपरी मदत करणार्‍या पाकिस्तानवर आता हा भस्मासूर उलटला आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानी राजवट परतल्यावर या टापूत आपल्याला हवे तसे आपण करू, अशा आविर्भावात पाकिस्तान होता. परंतु तालिबान्यांनी पाकिस्तानलाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 2024 या वर्षातच पाकिस्तानात आठशेहून अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात सुमारे एक हजार लोक मृत्युमुखी पडले. याच्या प्रत्युत्तरार्थ पाकिस्ताननेही मोठी कारवाई केली आहे. पण यामुळे तालिबान-पाकिस्तान यांच्यातील वितुष्ट कमालीचे वाढले आहे. याची मिमांसा करणारा आणि परिणामांची चर्चा करणारा लेख.
अनेक दशकांपासून अस्वस्थतेचा सामना करणार्‍या अफगाणिस्तानातील स्थितीचा पाकिस्तानने सामरिक फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यापासून लाभ होण्याऐवजी त्यांच्याच सुरक्षेला आव्हान मिळाले आहे. ऐतिहासिक रुपातून पाकिस्तानने अफगाणिस्तानवर प्रभाव कायम ठेवण्यासाठी तालिबानला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्रात दहशतवाद विरोधात सुरू झालेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘वॉर ऑन टेरर’ मोहिमेत वरकरणी पाकिस्तानचा सहभाग दिसत होता; पण छुप्या मार्गाने पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय तालिबानशी संधान साधून होते. पाकिस्तानातील सक्रिय क्वेटा शूराने तालिबान बंडखोरांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एकीकडे दहशतवादविरोधी प्रयत्नांचा समर्थन करण्याचा दावा करताना दुसरीकडे पाकिस्तानने गुप्त रुपाने तालिबानला मदत केली. परिणामी 2021 मध्ये तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या सत्तेत विराजमान झाले.मात्र हा विजय पाकिस्तानासाठी अत्यंत महागडा ठरला आहे.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्याने त्यांच्या विचाराशी सुसंगत वागणार्‍या तेहरिके तालिबान पाकिस्तान संघटनेचे (टीटीपी) पुनरुज्जीवन झाले आणि हे पुनरुज्जीवन पाकिस्तानच्या अक्षरशः मुळावर उठले. टीटीपीच्या भीषण दहशतवादी हल्ल्यांनी पाकिस्तानात हिंसाचाराचा आगडोंब माजला. पाकिस्तानच्या दाव्यानुसार या हिंसाचाराला अफगाणिस्तानच्या भूमीवरून चिथावणी दिली जात आहे. आता पाकिस्तान तालिबानवर टीकेच्या फैरी झाडत असून ‘टीटीपी’ला आश्रय देण्याचा आरोप करत आहे. तालिबानच्या वरदहस्तामुळेच या संघटनेने पाकिस्तानच्या सीमाभागात हल्ले वाढविले असल्याचे आयएसआयसह लष्कराचे म्हणणे आहे. यातून निर्माण झालेल्या वाढत्या तणावाच्या स्थितीमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांचे संबंध बिघडले असून या भागातील शांतता भंग पावली आहे. वास्तविक पाकिस्तान-तालिबानमधील संबंध हे आरोपा-प्रत्यारोप आणि तोडगा काढण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनीच व्यापलेले आहेत.
अलिकडेच उभय देशांतील उच्च पातळीवर चर्चा झाली. यासाठी पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील विशेष प्रतिनिधी महंमद सादिक आणि अफगाणिस्तानचे पररराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी आणि गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांच्यात काही बैठका पार पडल्या. उभय पक्षातील तणाव कमी करण्याचा हा प्रयत्न होता. यानुसार उभय पक्षांनी सहकार्य दृढ करणे आणि आव्हानांवर कुटनिती पातळीवर तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली. मात्र हे प्रयत्न सीमेवरील धुमश्चक्री आणि आरोपांत अडकले आहेत. टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या निर्वासितांवर हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप अफगाणिस्तानने नाकारला आहे. दुसरीकडे तालिबानी शासक हे पाकिस्तानच्या सैनिकी कारवायांना एकतर्फी मानतात. ही कारवाई अफगाणिस्तानच्या सार्वभौमावर हल्ले करणारी असल्याचे तालिबानने म्हटले आहे. अलिकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. ही घटना दोन्ही देशातील वाढत्या शत्रुत्वाचे प्रतीक आहेत.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरचा हा तणाव नवीन नाही. यावर्षी मार्च महिन्यांत देखील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात काही अफगाणिस्तानचे नागरिक मारले गेले. धुमश्चक्रीच्या घटनांमुळे दोन्ही देशांतून होणार्‍या चिथावणीखोर वक्तव्यांनी तणावात आणखी भर घालण्याचे काम केले. तालीबानने पाकिस्तानवर आक्रमकतेचा आरोप केला आहे तर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्षेत्रात टीटीपीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तान तालिबान हे सत्तेत आल्यानंतर टीटीपीचे बळ वाढले आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यात अलिकडेच पाकिस्तानच्या सोळा सैनिकांचा जीव घेणारा प्राणघातक हल्ल्याचा समावेश करता येईल. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने 2024 च्या प्रारंभी दहा महिन्यांत दीड हजारांपेक्षा अधिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद केली आहे. त्यात 924 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अर्थात अफगाणिस्तानला टीटीपीविरोधात कारवाई करणे कठीण आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या ताज्या अहवालानुसार, सुमारे 6500 टीटीपी दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय आहेत. अफगाणिस्तान तालिबानचे शासक हे टीटीपीला दहशतवादी संघटना मानत नसल्याचे अहवालात उल्लेख केला आहे. या भूमिकेमुळे पाकिस्तानला आपल्या सीमा सुरक्षित ठेवणे आणखी जिकिरीचे झाले आहे. पाकिस्तानकडून सीमेवर होणारे हवाई हल्ले टीटीपीची ठिकाणं नष्ट करण्यासाठी केले जात असले तरी त्यामुळे अफगाणिस्तानची जनता आणि नेतृत्व यांच्यात पाकिस्तानविरोधात भावना प्रबळ होताना दिसत आहे.
तालिबान-पाकिस्तान संघर्षामुळे दक्षिण आशियातील स्थैर्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. तालिबानला प्रोत्साहन दिल्याची फळे पाकिस्तानला भोगावी लागत आहेत. बाह्य हस्तक्षेपाला थारा न देता तालिबान आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करत आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील वाढता हिंसाचार हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या एक वर्षांत काश्मीरमधील दहशतवादी कारवायांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एका अहवालानुसार, अफगाणिस्तान सोडून जाताना अमेरिकेने सोडून दिलेल्या शस्त्रांचा वापर दहशतवाद्यांनी काश्मीरमधील हल्ल्यात केल्याचे उघड झाले आहे. अर्थात भारतीय सुरक्षा दलाने काश्मीरमधील स्थिती योग्यरित्या हाताळली. परंतु आधुनिक शस्त्रे हाती लागल्याने दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे. येणार्‍या काळात काही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या आतील भागात मोठी हानी करत त्याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करू शकतात आणि या शक्यतेने भारताला सीमेवर गस्त आणखी वाढवावी लागणार आहे आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानने अनेक वर्षांपासून त्यांच्या परराष्ट्र धोरणात दहशतवादाचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला. पण आज त्याचे भीषण परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवत नाही, तोपर्यंत तो हिंसाचार अणि अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकत राहिल. -ब्रिगेडियर हेमंत महाजन

Check Also

एका पर्वाची अखेर

भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *