राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीचे खर्या अर्थाने जनक. 2019 च्या विधानसभा निवडणुकात गलितगात्र झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी एकहाती ऊर्जित अवस्थेत आणला आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाराष्ट्रात ही लाट एकहाती थोपवून धरली ती देखील शरद पवार यांनी. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपेक्षा असलेला नेता आणि पक्ष म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस. पण या निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाचा अक्षरशः धुव्वा उडाला.
पवार यांच्या गटाला साधारणपणे 45 ते 50 जागा मिळतील असा जाणकारांचा अंदाज होता तर अजित पवार यांच्या गटाला बारा ते पंधरा जागा मिळतील असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात उलटेच घडले. यामुळे शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला पवार यांची फूस असल्याचा संदेश सत्ताधार्यांकडून व्यवस्थितपणे पसरवण्यात आला. त्यामुळे ओबीसी मतदार शरद पवार यांच्यावर बर्यापैकी नाराज होता. तसेच उलेमांनी केलेल्या अनाठायी मागण्यांना शरद पवार यांच्या गटाने संमती दिल्याचा संदेश देखील सोशल मीडियावर पसरला. त्याचा फटका देखील शरद पवार यांच्या गटाला बसला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात केलेली विधाने आणि सुप्रिया सुळे यांनी या योजनेची उडवलेली खिल्ली पवार गटाच्या अंगलट आल्याचे सांगितले जात आहे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा भाजपने दिला होता आणि तो व्यवस्थित चालवण्यात आला. हिंदू मतदारांचा आणि महिलांचा महायुतीकडे वाढलेला कल रोखण्यात शरद पवार यांना अपयश आले. तसेच, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवले होते, त्यावर मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती.
अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे करून शरद पवारांनी आपल्या पुतण्याच्या चुकीची पुनरावृत्ती केली, जी लोकांना आवडली नाही. पवार हे मोठे नेतृत्व असले तरी स्थानिक पातळीवर बलाढ्य असलेले आमदार अजित पवार यांच्यासोबत होते. त्या त्या मतदारसंघावर स्थानिक आमदारांचा वरचष्मा होता. लोकसभेला दुरंगी असलेली लढत यावेळी तिरंगी झाली होती तर काही ठिकाणी ती चौरंगीही झाली होती. त्याचा अचूक लाभ महायुतीने घेतला आणि शरद पवार यांचे सगळे डाव एका मागोमाग एक उलटे पडत गेले.- राकेश माने
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …