लेख-समिक्षण

नैतिक अधःपतन

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यातून होणार्‍या हत्या या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे भीषण दर्शन आहे. राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराने आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह ड्रममध्ये लपवण्यात आल्याच्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वासना भागवण्यासाठी लहान बालिकांची अतिशय अमानुष हत्या करणारा नराधम व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरतोच कसा? त्याच्या काही दिवस आधीच चक्कीनाका भागातील 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचारानंतर तिची भिवंडीतील बापगाव येथे हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गवळीवर यापूर्वीही विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन गुन्ह्यात त्याला तडीपाराची शिक्षा झाली होती. अक्षय शिंदे या नराधमाचा खात्मा एन्काउंटरच्या रूपाने पोलिसांनी केल्यानंतर आता विशाल गवळीलाही ढगात पोहोचवले जाईल का, असा सवाल केला जात आहे. पण प्रश्न असा आहे की, प्रत्येक प्रकरणात असे उपाय करणे कितपत योग्य आहे? या घटनांनी समाजाच्या नीतिमत्तेला आणि सुरक्षिततेला तडे दिले आहेत. कल्याण प्रकरणातील विशाल गवळी हा आधीच गुन्हेगार असूनही तो मोकाट का फिरत होता? नागरिक म्हणून आपणही आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्यात कमी पडत आहोत. आपल्या सभोवतालच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांना कळवणे, मुलांच्या भावनिक आरोग्याची काळजी घेणे, त्यांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे आणि शिक्षण व्यवस्थेतून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे ही आपलीच जबाबदारी आहे. सरकारनेही आता विलंब न करता लैंगिक अत्याचारांविरुद्ध जलद न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची प्रभावी यंत्रणा उभारावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी. याशिवाय, पोलीस यंत्रणेचे सक्षमीकरण, बालकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मनोवैज्ञानिक विकृतीने ग्रस्त व्यक्तींसाठी पुनर्वसनाची सोय या गोष्टी करायला हव्यात. बालकांवरील लैंगिक अत्याचार केवळ गुन्हा नाहीत, तर समाजाच्या अपयशाचा प्रतीकात्मक आरसा आहेत. त्याचा फटका समाजाला प्रगतीच्या प्रत्येक स्तरावर बसत राहील. राजगुरुनगरमधील चिमुकल्या बहिणींच्या डोळ्यांतील निरागसता परत आणणे आपल्यासाठी कधीच शक्य होणार नाही. कल्याणमधील निरागस बालिकेला तिच्या पालकांच्या कुशीत कधीच देता येणार नाही आणि भंगार वेचणार्‍या चिमुकल्याच्या मनावर झालेले घाव कधीही बुजवता येणार नाहीत. परंतु दुसर्‍या कोणत्याही घरात हे दु:ख येऊ नये, म्हणून आताच उपाययोजना नक्कीच करता येतील! नराधमांना मोकळे रान मिळता कामा नये.- राकेश माने

Check Also

मानाचा तुरा

मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *