लेख-समिक्षण

नवविस्थापित

री करणारे ती एक कला मानतात आणि बर्‍याच प्रमाणात ती असतेही! कडेकोट बंदोबस्तात जपून ठेवलेला ऐवज हातोहात लांबवणं सोपं नसतं. पण बर्‍याच वेळा काय चोरावं, हे चोरांना कळत नाही आणि हाताला लागतील त्या वस्तू ते पळवून नेतात. त्यामुळं कधी-कधी चोरीला गेलेल्या ऐवजाच्या यादीत पैसाअडका, सोनंनाणं याबरोबरच अशा काही वस्तू दिसतात, ज्यांचा चोरांना काही उपयोग नसतो आणि त्या विकताही येत नाहीत. बंगळुरूमधून आलेल्या चोरीच्या अशाच एका तक्रारीनं लक्ष वेधून घेतलंय. एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा पासपोर्ट चोरीला गेलाय. त्यावर अमेरिकेचा व्हिसाही लागलेला होता. खरंतर एखाद्याचा पासपोर्ट पळवून चोराला काय मिळणार? पण यामागे स्टोरी वेगळीच आहे… आणि ती थेट पोहोचते आजकालच्या बहुचर्चित शब्दापर्यंत- लेऑफ! सीईओचा संशय एका माजी कर्मचार्‍यावर आहे. लेऑफमुळं नोकरी गमावल्यामुळं त्याने आपल्याला त्रास देण्यासाठी पासपोर्ट चोरला, असं त्याचं म्हणणं आहे. तोट्यातली कंपनी फायद्यात आणण्यासाठी गुंतवणूकदारांच्या दबावामुळं लेऑफचा मार्ग स्वीकारला. त्यामुळं नोकरी गमावलेल्याने पासपोर्ट चोरला. आता नवीन गुंतवणूक आणण्यासाठी अमेरिकेला जाता येत नाही, असा विचित्र, चक्राकार घटनाक्रम इथे दिसतो. अर्थात, कर्मचार्‍यानेच पासपोर्ट चोरला, हा दावा खरा ठरला तर! याखेरीज टेक कंपन्या आणि एकूणच उद्योगविश्वातल्या एका भयाण वास्तवाकडे लक्ष वेधणारी ही घटना ठरते. चूक नसताना अचानक नोकरी जाणं!
तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या या देशात रोजगाराची स्थिती काय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. या स्थितीचे आर्थिक, राजकीय, सामाजिक अर्थ लावणारे, विश्लेषण करणारे लोकही बेसुमार आहेत; पण त्यामुळं परिस्थिती बदलत नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती, स्टार्टअप्सची धूम, आयटीतली ऐटबाज नोकरी, टेक कंपन्यांचं वेगळंच विश्व यामुळं या क्षेत्रांत चढाओढ लागते. मेहनत आणि खर्च पणाला लावून तांत्रिक ज्ञान हासील केलं जातं. सरकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नोकर्‍या रोडावण्याच्या काळात आपण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालो, याचं समाधान मिळतं. शहरात फ्लॅट बुक केला जातो. ईएमआय चालू होतो. लग्न-बिग्न होतं आणि एके दिवशी कंपनीत ‘कॉस्ट कटिंग’ची वार्ता येते. कोण जाणार, कोण राहणार याची चर्चा सुरू असतानाच लेऑफची कुर्‍हाड अचानक कोसळते. नव्या संसाराचं काय होणार आणि ईएमआय कुठून भरणार, हे प्रश्न डोक्यावर बसतात. नवा जॉब मिळाला तर ठीक, नाहीतर भविष्याच्या चिंतेसोबत मानसिक विकार डोक्यात शिरतात. लेऑफच्या एका फटकार्‍यानं विस्थापित होणार्‍यांच्या विषयावर फारसं गांभीर्याने बोललं जात नसलं, तरी ही डोकेदुखी साधी नाही.
जगभरातल्या अनेक मोठ्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत लेऑफ जाहीर करून हजारो कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवलाय. कोविडकाळात त्यासाठी एक कारण तरी होतं; आता तेही नाही. अफाट पसारा असलेल्या कंपन्यांनी काही पदंच कायमची रद्द केलीयेत. कुणी सहा हजार, कुणी चार हजार तर कुणी तब्बल पंचवीस हजार कर्मचार्‍यांना एकाच वेळी नारळ दिलाय. हजारो कुटुंबांची जगण्याची दिशाच अचानक बदललीये. बेरोजगारीची समस्या मुळातच बिकट असताना या नवविस्थापितांचं काय करायचं, याचा विचार गांभीर्याने
व्हायला हवा.-हिमांशू चौधरी

Check Also

खेळू नका!

खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्‍याचदा यामागे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *