नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात 1 डीकेएसझेडसीएम, 3 डीव्हीसीएम, 2 एसीएम व 4 दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 86 लाख 5 हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणार्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.
दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम, सुरेश उईके उर्फ चैतू उफर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उफर्फ भारती उफर्फ मदनी (डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी. के. झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक 10, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर 32 यांचा आत्मसमर्पण करणार्यांमध्ये समावेश आहे. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आता 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचे काम होत असल्याचे फडणीवस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सांगितले की, नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतीत केला. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोलीसुद्धा होईल.गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री पुर्णामासी जानी, पद्मश्री परशूराम खूणे, लॉईड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन प्रामुख्याने उपस्थित होते.
Check Also
एका पर्वाची अखेर
भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली …