तबला या वाद्यसंगीतातील महत्त्वाच्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि सन्मान मिळवून देण्याचं अद्वितीय कार्य करणार्या पंडित झाकीर हुसेन यांच्या निधनाची वार्ता अखेरच्या क्षणापर्यंत अफवा ठरावी असं असंख्य जणांना वाटत होतं. पण अखेर ती खरी ठरली आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यातून हिरावून नेला. तबला म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन हे समीकरण वर्षानुवर्षं आपल्याकडं पहायला मिळतं यातच त्यांचं श्रेष्ठत्व दडलेलं आहे. त्याचबरोबर कलाकारानं कसं वागावं, कसं वावरावं आणि रंगमंचावरुन कसं बोलावं याचा आदर्श झाकीरभाईंनी घालून दिला आणि मला वाटतं तो प्रत्येक कलाकारासाठी त्यांच्या पश्चातही खूप मोठी शिकवण म्हणून पाहिला गेला पाहिजे.
वाद्यसंगीतातील तबला या वाद्याला वैश्विक पटलावर लोकप्रियता, सन्मान, प्रसिद्धी मिळवून देण्याचे अद्वितीय कार्य करणार्या पंडित झाकीर हुसेन यांच्या जाण्याचं वृत्त दुर्दैवानं खरं ठरलं आणि नियतीनं एक महान तबलावादक आपल्यापासून हिरावून नेला. सत्तरीनंतरच्या काळात संगीतक्षेत्रात, कलाक्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात अशी काही व्यक्तिमत्व पाहायला मिळाली जी त्या क्षेत्राला, प्रकाराला समानार्थी शब्द बनून गेली. उदाहरणार्थ, त्या काळात क्रिकेट म्हटलं की गावसकर- कपिल देव असं समीकरण होतं. तशाच प्रकारे संगीत ऐकणार्यांमध्ये, तबलाप्रेमींमध्ये किंवा अगदी सर्वसामान्य माणसांमध्ये तबला या वाद्याला समानार्थी शब्द हा पंडित झाकीर हुसेन हा झाला. पंडितजींनी तबला या वाद्याला केवळ ओळख मिळवून दिली नाही तर त्याच्या नादातली, तालातली जादूही अनुभवण्यास दिली. सामान्य माणसापर्यंत एखादं वाद्य कसं पोहोचतं याचं हे अद्वितीय उदाहरण म्हणावं लागेल. तबला हे साथीचं वाद्य न राहता त्याला स्टेजवरील मधली जागा मिळणं हे सौभाग्य पंडितजींमुळं लाभलं. भारतामध्ये तबलावादकाला ग्लॅमर मिळण्याची प्रक्रियाच मुळी पंडित झाकीर हुसेन यांच्यापासून सुरू झाली आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे, असं मला वाटतं. झाकीरभाईंना तबलावादनाचे संस्कार कुटुंबातूनज झाले. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी उस्ताद अल्लारक्खा खान यांच्याकडून ते पखवाज वाजवायला शिकले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार जागतिक मैफलीत भाग घेण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार होते.
पंडितजींचं आणखी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तबला हा केवळ शास्रीय संगीतामधलं किंवा सिनेसंगीतामधलं एक वाद्य म्हणून पाहिला जात होता. पण एका इंटरनॅशनल कोलॅबरेशनमध्ये तबला हे वाद्य आणि तबला व ड्रम्स यांसारखी इतर वाद्यं एकत्र वाजणं आणि त्याला ग्रॅमीसारखे नामांकित अॅवॉर्डस् मिळणं यातून जगभरात तबल्याचा नाद प्रस्थापित होणं, त्याला वैश्विक दर्जा मिळणं हे पंडितजींमुळं शक्य होऊ शकलं. सातासमुद्रापार जगभरातल्या लोकांच्या कानात तबल्याचा ध्वनी प्रस्थापित करण्यामध्ये पंडितजींचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. अन्यथा, आंतराष्ट्रीय पातळीवर तबला हे केवळ क्लासिकल म्युझिकमधलं वाद्य म्हणूनच ओळखला गेला असता. पण आज तशी स्थिती नाहीये. परदेशी संगीतांमध्येही तबल्याचा वापर केला जातो आणि विदेशातील अनेक जण तबला तन्मयतेनं शिकताना, वाजवताना आणि ऐकताना दिसतात. जसं पंडित रविशंकरजी यांनी सतारवादनाला वैश्विक ओळख मिळवून दिली तशाच प्रकारे झाकीरभाईंनी तबल्याला ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. माझ्या मते, शिव हरी यांनी ज्याप्रमाणं चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला तशाच प्रकारे झाकीरभाईंनीही पूर्णपणाने संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रावर फोकस केलं असतं तर ते संगीतकार म्हणूनही ते तितकेच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले असते. पण त्यांनी प्रामुख्यानं वाद्यसंगीत, फ्युजन याकडे अधिक लक्ष दिलं. त्याऐवजी शब्दप्रधान संगीताकडं लक्ष दिलं असतं तर ते उत्कृष्ट शब्दप्रधान गीतांच्या चालीही करु शकले असते. कारण पंडितजींच्या संपूर्ण कुटुंबालाच काव्यं, रचना, उपशास्रीय संगीत याचीही खूप उत्तम जाण होती.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, कलाकारानं कसं वागावं, कसं वावरावं आणि रंगमंचावरुन कसं बोलावं याचा आदर्श झाकीरभाईंनी घालून दिला आणि मला वाटतं तो प्रत्येक कलाकारासाठी त्यांच्या पश्चातही खूप मोठी शिकवण म्हणून पाहिला गेला पाहिजे. मैफिलींमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये केवळ गायक अथवा संगीतकाराचा परफॉर्मन्स उत्तम असणं पुरेसं नाही. परफॉर्मन्सव्यक्तिरिक्त कलाकार जे बोलतो, सहकलाकारांशी, इंजिनिअरशी, संयोजकांशी संवाद साधतो तो कसा असायला हवा याबाबत पंडित झाकीर हुसेन यांचे व्हिडिओज सर्वांसाठी मार्गदर्शक असतील. कारण झाकीरभाई आणि त्यांचे वडील ज्यावेळी एकत्रित परफॉर्मन्स करायचे, त्यावेळी ते ज्या अदबीनं बसायचे इथपासून ते मी माझ्या गुरुवर्यांसोबत वाजवतो आहे याचा पंडितजींच्या वागण्या-बोलण्यामध्ये दिसणारा जाणीवभाव हा खरोखरीच एक संस्कार असायचा. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ‘मला तुम्ही ग्लॅमर देऊ नका, मी शिष्य आहे,’ असं ते प्रेक्षकांना सांगताना मी ऐकलं आहे. अशा प्रकारचे संस्कार नकळतपणानं तुमच्या वावरामधून करत असता. ही संस्कारांची पेरणी अनेक वर्षांची तपश्चर्या, साधना आणि कमालीची नम्रता, कृतज्ञता या मूलतः अंगी असणार्या स्वभावगुणांमधून होत असते. अशा व्यक्तिमत्वाचं असणं हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं. किंबहुना अशी माणसं आपल्या डोळ्यासमोरुन कधीच हलू नयेत असं वाटत राहतं. त्यामुळंच त्यांना लाईव्ह कार्यक्रमांमध्ये ज्यांना पाहता आलं नाही, त्यांच खरोखरीच खूप नुकसान झालं असं मला वाटतं. पण त्यांच्या मुलाखती, कार्यक्रमांचे व्हिडिओ यांमधून हे संस्कार सदैव होत राहतील. कला आणि विद्वत्तेबरोबरचं वागण्याची पद्धतही आहे, असं फार कमी लोकांमध्ये आढळतं. पण अल्लारखाँसाहेब आणि झाकीरभाई, त्यांचे भाऊ तौफिकजी हे दोघंही या तिन्ही गुणवैशिष्ट्यांच्या त्रिवेणी संगम होते. यामुळंच जेव्हा झाकीरभाईंच्या निधनाचं वृत्त समोर आलं तेव्हा अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाच्या मनात येत होतं की ही अफवा असावी. एखाद्याच्या मृत्यूची बातमी अफवा असावी, असं वाटण्यासाठी लोकांमध्ये कासावीसता असावी यावरुन त्या व्यक्तिमत्वाची उंची किती मोठी होते हे लक्षात येतं. सुदैवानं, मी झाकीरभाईंचे अनेक कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले आहेत आणि त्यातून मंत्रमुग्ध होण्याची संधीही मला मिळाली. लहान असताना सवाई गंधर्व महोत्सवामध्ये जायचो तेव्हापासून त्यांच्या तबलावादनाचे अवीट ध्वनी माझ्या कानावर पडत आले आहेत. यामध्ये सोलो परफॉर्मन्सही पाहिले आहेत आणि साथही पाहिली आहे. पण साथीच्या वेळी साथ आणि सोलोच्या वेळी सोलो हे झाकीरभाईंना अचूकरित्या जमत होतं. त्यांना शब्दांपासून सगळ्याचीच जाण असल्यामुळं ठुमरीला कशी साथ द्यायची, गझलला कशी साथ द्यायची आणि वाद्यसंगीताला कशी साथ द्यायची याची अचूक जाण त्यांना होती. यामुळं त्यांचं वाजवणं कधीच बोजड आणि तांत्रिक वाटलं नाही. अशा या महान तबलावादकाचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याचा योग आता कधीच येणार नाही, याची सल मनाला सतत राहील आणि तालाचं हे आवर्तन समेवर येण्यापूर्वी असं का थांबलं, हा प्रश्न बोचत राहील. -डॉ. सलील कुलकर्णी, प्रख्यात संगीतकार
(शब्दांकन ः हेमचद्र फडके)
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …