जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं जगतेच आहेस; आम्हाला जन्माला घालतेच आहेस. खरंच, कमाल आहे तुझी! पण स्वतःसारखी जननी जन्माला घालण्याची परवानगी तुला कुणी दिली? पहिल्यांदा… दुसर्यांदा… आता तिसर्यांदाही मुलगीच झाली? मग तू जगून काय उपयोग? काय अर्थ तुझ्या जगण्याला? वंश चालवणारा, प्रॉपर्टी सांभाळणारा किंवा मोडून खाणारा नर तुला जन्माला घालता येणार नसेल, तर अत्यंत भयावह मृत्यू हेच तुझं प्राक्तन. स्त्रीभ्रूणहत्यांची काळीकुट्ट पार्श्वभूमी ठाऊक असूनसुद्धा तीन-तीन मुलींना जन्म देण्याची तुझी हिंमत झालीच कशी? असेल आम्हाला पुरोगामीत्वाचा इतिहास. होऊन गेले असतील इथं फुले-शाहू-आंबेडकर. उघडली असेल सावित्रीमाईंनी मुलींसाठी शाळा. केला असेल आगरकरांनी विधवेच्या केशवपनाला विरोध. मोडली असेल बालविवाहाची प्रथा. दिला असेल इथं जिजाऊंनी स्वराज्याला आकार. झेपावली असेल कल्पना चावला अवकाशात. झाल्या असतील इथं महिला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. पण म्हणून आम्ही आमची मानसिकता का बदलायची? कुणाचा विचार जपण्यासाठी नव्हे; आमचा स्वार्थ जपण्यासाठी जन्माला आलोय आम्ही. तू फक्त साधन आहेस आम्हाला जन्माला घालण्याचं. आमच्यासारखे स्वार्थी, आत्मकेंद्री, आत्ममग्न नर जन्माला घातलेस की तुझं जीवितकार्य संपलं. पण मुख्य काम सोडून तू पाठोपाठ मुलीच जन्माला घालत राहिलीस, तर तुझं आयुष्यच संपलं म्हणून समज!
मराठवाड्याला नेहमी ‘मागास’ म्हणून हिणवलं जातं. पण परभणीसारख्या जिल्ह्यात, गंगाखेड नाक्यासारख्या ठिकाणीसुद्धा आता सीसीटीव्ही लागलेत म्हटलं! मुली जन्माला घालण्याची शिक्षा म्हणून तुला पेटवून मारल्याचं दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पेट्रोल महाग असलं म्हणून काय झालं? तुला जाळून मारायला रग्गड पेट्रोल मिळवू आम्ही. करायच्यात काय इतक्या पोरी? यूपी-बिहारला नावं ठेवणार्या या आधुनिक महाराष्ट्रात त्यांनी करायचं तरी काय? बदलापूर किंवा कल्याणमधल्या मुलींसारखे प्रसंग ओढवून घ्यायचे? पोरवयात स्वतःचे लचके तोडून घ्यायचे? हाल-हाल होऊन मरायचं? राजगुरूनगरमध्ये जे घडलं ते घडू द्यायचं? बंद, घोषणा, मोर्चे, उपोषण अशा अराजकाला आमंत्रण द्यायचं? इथे रोजचं जगणं कठीण झालंय. त्यात असले प्रसंग ओढवून घेण्याची हौस कोण बाळगणार? इतक्या लहान वयात मुलींना कुणी मारून टाकणार असेल, तर मुळात त्यांना जन्मालाच का घालायचं? तुझ्या पोटातूनच त्या गायब होणं अधिक चांगलं नाही का? सुदैवानं आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे; तंत्रज्ञ आहेत आणि सामग्रीसुद्धा आहे. मुख्य म्हणजे, मागास म्हणवले जाणारे भाग या तांत्रिक करामतीतसुद्धा आघाडीवर आहेत बरं का!
अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर तू आरडाओरडा का केलास? धावाधाव का केलीस? त्यामुळं घर आणि दुकान पेटून उगीचच नुकसान झालं. शिवाय, दोघं-तिघं तुला वाचवायला पुढं आले. 99 टक्के जळूनसुद्धा तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. ‘मुलींना तू मार नाहीतर मी मारतो,’ असं तुझा नवरा म्हणत होता ना? तू मुलींना मारलं नाहीसच; उलट आणखी एक मुलगी जन्माला घातलीस. असो, आता गेलीयेस तर पुन्हा जन्माला येऊ नकोस. राज्यकर्त्यांनी ‘लाडकी’ म्हटलं म्हणून तू आमची लाडकी होणार नाहीयेस, लक्षात ठेव!
Check Also
मानाचा तुरा
मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील …