लेख-समिक्षण

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी असतात. तरीही प्रत्येकालाच आपण दुसर्‍या कुणासारखे असावे असं वाटत असतं. ‘त्या माणसाकडे अमुक किती चांगलं आहे?’ ‘तमका किती बुद्धीमान आहे!‘ ‘तो किती यशस्वी आहे!’ अशा पद्धतीचे असंख्य तुलनात्मक विचार प्रत्येक माणूस करतोच. आपणही वेगळे आहोत. आपणही कुणाचा तरी आदर्श असू शकतो. कुणाला तरी आपल्यासारख बनायचं असतं, यावर माणूस विश्वास ठेवत नाही. शिवाय आपल्याला नेमकं काय करायचंय हेच दुसर्‍यांकडे पाहण्याच्या नादात विसरून जातो. स्वतःची गुणवत्ता तपासणं राहूनच जातं. त्यात ‘जग काय म्हणेल?’ ‘मी असा काहीतरी वेगळा प्रयोग करू इच्छितो, पण लोक काय म्हणतील? या काळजीने मनोमन अनेक उमललेल्या कल्पना कधी कोमेजून जातात काही समजत नाही.
समाजाला आवडेल, रूचेल असा मुखवटा घालून फिरताना आपण खरे कसे आहोत, हेच विसरून जातो. म्हणूनच प्रत्येकानं ‘आय डोन्ट केअर असे स्वतःच्या मतावर ठाम राहून, दुसर्‍यांच्या नको त्या मतांना महत्त्व न देण्याची कला शिकून घ्यायला हवी. लोक काय म्हणतील? हे पालुपद मनाशी उजळवत बसण्यापेक्षा, मी काय करू शकतो, माझ्यातील गुणवत्ता कशी पुढे येईल? प्रगतीच्या वाटेवर जाण्यासाठी स्वतः बद्दल जजमेन्टल न होता काय करता येईल हे पहायला हवे. स्वतःच्या गुणवत्तेवर स्वतःच विश्वास ठेवला तर काय होऊ शकते, याचे एक उदाहरण सांगते.
एक मध्यमवयीन स्त्री, जिची मुले मोठी होऊन नोकरी, व्यवसाय करणारी. घरात दोन सुना, नातवंड वगैरे असली तरी तिला आपणही काहीतरी वेगळं करायला हवं असं वाटायचं. आतापर्यंत घरच्या जबाबदार्‍या निभावत इतकी वर्ष गेली, की स्वतःच्या मनासारखं काही करावं हा विचारला आला की दरवेळी बासनात गुंडाळून ठेवावा लागे. मात्र आता असं काही करावं असं तिला वाटत होतं. एक दोन वेळा मुलांपाशी तिनं बोलूनही पाहिलं, पण मुलं म्हणाली ‘एवढे वर्ष कष्ट केलेस, आता आराम कर. कशाला हवंय काही करायला?’ सुनांचंही म्हणणं साधारण अशाच प्रकारचं. म्हणजे ‘या वयात सासूूला कामाला लावलं असे आरोप कुणीतरी करेल, त्यापेक्षा तुम्ही घरात काहीतरी करा!’ असा सल्ला मिळाला.
तिला आता काय करावेे समजेना. एकदा एका मैत्रिणीला तिने आपली इच्छा सांगितली. त्या मैत्रिणीने तिला विचारले ‘काहीतरी करायचंय, म्हणजे नेमके काय ते सांगा !’ चर्चेतून भग शिवणकला चांगली असल्याने त्याचा आधार घेऊन कार्य करता येईल याची चर्चा झाली. आणि युनिकनेस असलेल्या गोधड्या शिवता येतील यावर एकमत झालं तिने मग शिवणकामातून उरलेल्या कापडाच्या तुकड्यातून एक डिझाईन तयार करून त्याला योग्य ने कापड पाठीमागे लावून एक सुंदर अशी गोधडी शिवली. त्यावर पुन्हा पांढ्या दोर्‍याने डिझाईनच्या भोवती बॉर्डर केली. त्यामुळे ती गोधडी कम दुलई अतिशय सुंदर दिसू लागली. तिच्या मैत्रिणीने लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचा फोटो शेअर केला. आणि अशा प्रकारचे प्रॉडक्ट हवे असल्यास हवे ते डिझाईन, म्हणजे कस्टमाईज करून मिळेल अशी नोटही टाकली. गंमत म्हणजे त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आज त्या दोघी मिळून हा बिझनेस चालवतात. हाताखाली माणसं ठेवून त्यांचा बिझनेस छान सेट झाला आहे.
या दोघींनीही ‘जग काय म्हणेल?’ याला अजिबात महत्व न देता, स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला. एकदा तरी ‘या जुन्या तुकड्यांचा या बिझनेस करणार म्हण !’ अशासारख्या काँमेन्टही त्यांना ऐकावे लागले. परंतु त्या स्वतःच्या मनावर ठाम राहिल्या आणि यशस्वी झाल्या. त्यामुळे जर स्वतःला काहीतरी करून दाखवायचं असेल तर या काही मुद्यांकडे जरूर लक्ष द्या. स्वतःकडे नेमके वेगळेपण काय आहे, याची आधी दखल करा घ्या. स्वतःला हे जमणार नाही, जमत नाही, अशी वाक्ये मनात सुध्या उच्चारु नका. आपल्यातत्या प्रत्येकाकडे वेगवेगळी स्ट्रेंग्थ असते, दृष्टिकोन असतो. वेगळा अनुभव असतो. आपले वेगळे व्यक्तिमत्व, ओळख असते. ती जाणून घ्या. तसेच तुमचे काही वीक पॉइन्टस असतात. कमतरता, तसंच उणीवा असतात. त्यावर मात करून कसे पुढे जाता येईल ते बघा. दुसर्‍यांच्या यशाशी स्वतःची तुलना करायची सवय सोडून द्या. यशस्वी लोकांच्या आत्मचरित्रात, त्यांच्या अनुभवांबद्दल, तुम्ही वाचलेलं, ऐकलेलं असेलच की ते कधीच ‘हा काय म्हणेल?’ ‘तो काय म्हणेल?’ असल्या विचारांना मनात जागाच देत नाहीत.
आपण काय करायचेय, याचान फक्त विचार करतात. बहुतांश वेळा एखादी नवी गोष्ट सुरु करताना आपण आपल्याकडे काय नाही. हेच आधी पाहतो. त्यामुळे नकोसे विचार, निराश करणारे विचार येत राहतात. म्हणून ‘काय आहे’ तेच पहायचे. शिवाय जे जे चांगले आहे, त्याबद्दल कृतज्ञता बाळगून काम सुरू करायचे, हे लक्षात ठेवले पाहिजे. यश ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नसतेच. ती एक प्रोसेस आहे. तुम्ही जे करणार आहात किंवा सुरु केले आहे, ते एकदम टॉपला पोचेल हे शक्य नाही. त्यामुळे या प्रवासातही दुसर्‍यांच्या नकारात्मक कॉमेन्टकडे सरळ दुर्लक्ष करायचे आणि छोट्या छोट्या का असेना, पण चांगल्या बदलांची नोंद होत पुढे जात रहायचे. ही गोष्ट एकदाच करून चालत नाही तर रोज हे काम करावे लागते. पहित्याच प्रयत्नात यश मिळेल असे नाही. पण त्यामुळे खचून न जाता, पुनः पुन्हा प्रयत्न करण्यासाठी स्वतःच्या मनाला सांगत रहायला लागते. अपयशाची भीती मनात असतेच, ती आपल्या मनावर स्वार होणार नाही, याची ही काळजी घ्यायला लागते. आपले काम करताना, त्यात अनेक हातांचा सहभाग असतो हे विसरून चालत नाही. बहुतांश कार्यात टीमवर्क असते. त्यामुळे फक्त आपलाच फायदा न बघता इतरांचेही नुकसान होत नाही ना, हेही बघणे गरजेचे आहे. आपले ध्येय ठरवणे कधीही चांगले.
‘मी अमुक अमुक गोष्ट इतक्या कालावधीत मिळवणार आहे’ असे ठरवणे योग्य आहे. पण अशक्य अशी ध्येये समोर ठेवण्यापेक्षा आपली कुवत, पात्रता लक्षात घेऊन मग पुढे जायला हवे, नाहीतर अगदी लगेचच निराशा पदरी पडू शकते. या सगळ्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास.

Check Also

फेसबुकवरुन व्यवहार करताना…

फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *