शालेय जीवन असो किंवा व्यावसायिक करियर असो आपल्या अंगी चिकित्सक, विश्लेषक कौशल्य, चौकस बुद्धी अत्यावश्यक आहे. या वृत्तीमुळे आपण कोणत्याही अडचणींवर, प्रश्नांवर सहजपणे मात करू शकतो. सध्याच्या व्यावसायिक जीवनात अॅनालिटिकल स्किलला अत्यंत महत्त्व आले आहे. अनेकांना कौशल्य विकास करायचा असतो, परंतु तो कसा करावा, याचे तंत्र अवगत नसते. आपल्या अंगी विश्लेषक कौशल्य वाढवण्यासाठी आजघडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेळोवेळी आपण स्वत:चे कौशल्य पडताळून आणि चाचपणी केल्यास आपले व्यक्तीमत्त्व आणि कौशल्य आणखी वृद्धींगत होत राहते. कधी कधी व्यावसायिक पातळीवर काम करताना आपण अचानक उदभवलेल्या परिस्थितीने गडबडून जातो. काही जण अशा स्थितीला सामोरे जाण्याचीही तयारीही ठेवतात. अशा स्थितीत आजघडीला कर्मचार्याला अशा प्रकारचे कौशल्य येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एखादा निर्णय घेताना सर्वप्रकारची माहिती गोळा करणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याबाबत सक्षम असणे काळाची गरज बनली आहे. जर आपल्याकडे विश्लेषक वृत्ती असेल तर आपल्यावर कोणतीही नकारात्मक बाब परिणाम करत नाही. याअनुषंगाने विश्लेषक कौशल्य किंवा वृत्ती वाढवण्यासाठी काही टिप्स इथे सांगता येतील.
सक्रिय दृष्टीकोन बाळगा : विश्लेषक कौशल्य वाढवण्यासाठी सक्रिय दृष्टीकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. आपण एखाद्या गोष्टीवर मार्ग काढू शकतो, असा विश्वास मनात असणे महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचाराने कोणत्याच प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही. त्याचबरोबर किचकट, क्लिष्ट बाबी सोडवण्यासाठी गणीत सोडवणे हा एक चांगला मार्ग आहे. गणित हा सर्वप्रकारची कोडी सोडवण्यास मदत करतो. गणितीय सूत्रे ही उत्तर काढण्यासाठी उपयुक्त असतात. या गणितीय क्षमेतेने कौशल्य विकास होण्यास हातभार लागतो. कॉलेज पातळीवर अनेक प्रकारचे गणितीय अभ्यासक्रम चालवण्यात येतात. या माध्यमातून आपण करियरला कौशल्याची जोड देऊ शकतो.
बुद्धिला चालना देणारे खेळ : विश्लेषक, चिकित्सक वृत्ती वाढवण्यासाठी ब्रेन गेम्स खेळणे हे एक चांगले माध्यम मानले जाते. या खेळामुळे आपल्या अंगी विश्लेषण करण्याची वृत्ती वाढत जाते. या खेळातून मेंदूची एकप्रकारे मशागत होते. खेळातील कोडी किंवा उत्तर शोधताना आपण अनेक बाजूने विचार करतो. उदा. शब्दकोडी, सुडेको, बुद्धीबळ यासारख्या खेळातून आपल्या बुद्धिला, विचारांना चालना मिळते. यातून वैचारिक क्षमता वाढत जाते आणि प्र्रत्येक प्रश्नाचे, चालीचे विश्लेषण आपण करत राहतो. बुद्धिबळाच्या सरावातून एकाग्रता वाढते आणि एखादी समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारची एकाग्रता महत्त्वाची ठरते.
वादविवाद स्पर्धा : शालेय, महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक पातळीवर विविध प्रकारच्या वादविवाद, परिसंवाद आयोजित होत असतात. वैचारिक मशागत करणार्या स्पर्धेत किंवा कार्यक्रमात सहभागी होऊन वैचारिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा. सर्वांगिण आणि सर्वंकष बाजूंनी विचार करण्याची सवय वाढते. कोणताही निर्णय घेताना आपण सर्वबाजूंनी विचार करून त्यावर अंमल करतो. केवळ एकतर्फी विचाराने प्रश्न सुटत नाही किंवा समाधानकारक तोडगा निघत नाही. प्रत्येक निर्णयाचे चांगले वाईट परिणाम काय होतील याचा विचार करूनच निर्णय घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम होतात.
ज्ञानाची कक्षा वाढवा: विश्लेषक कौशल्य वाढवण्यासाठी ज्ञानाची कक्षा, व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. आज जगात प्रचंड ज्ञान असून ते कसे आत्मसात करता येईल, याचा विचार करायला हवा. इंटरनेटमुळे एका क्लिकवर जगाचे ज्ञान सामावले आहे. या माध्यमातून आपण माहितीची कक्षा वाढवू शकतो. इंटरनेटच्या अगोदर, वर्तमानपत्र, ग्रंथ, कांदबरी, लेखमाला, चर्चासत्र, रेडिओ, टेलिव्हिजन या माध्यमातून ज्ञानाची भूक भागवली जात असे. आता घरबसल्या आपण शंभर वर्षापूर्वीचा व्हीडिओ, चर्चासत्र पाहू शकतो. या माध्यमातून आपण विश्लेषण कौशल्य वाढवू शकतो. जेवढे अधिक ज्ञान असेल, त्याप्रमाणात वैचारिक प्रगल्भता वाढेल. वाचन, लिखाण, मनन यामुळे ज्ञानाची खोली अधिक वाढते.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …