चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी केवळ वास्तव दाखविले असे नव्हे, तर ते उत्कटपणे दाखविणारे कलावंतही त्यांनी घडविले. समाजातील प्रवाहाबाहेरच्या माणसांना पडद्यावर आणण्याबरोबरच या चित्रपटांनी समाजातील कुप्रथाही चव्हाट्यावर आणल्या.
अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन, जुनून या चित्रपटांची नावे घेताच कलात्मक चित्रपटांच्या दुनियातील श्याम बेनेगल या चिंतनशील दिग्दर्शकाची आठवण होते. ‘आरोहण’ या चित्रपटासाठी 1982 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणार्या श्याम बेनेगल यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मोजके 25 हून अधिक चित्रपट केले. त्याचबरोबर सुमारे चाळीस माहितीपटांची निर्मितीही त्यांनी केली. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना 1976 मध्ये पद्मशी आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बेनेगल यांना 2005 मध्ये प्रदान करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्या खात्यात 8 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. श्याम बेनेगल हे केवळ त्यांच्या प्रतिभेसाठीच नव्हे तर ठाम सामाजिक आणि राजकीय भूमिकेसाठी ओळखले जात. या ठोस भूमिका त्यांच्या चित्रपटांमधूनही प्रकर्षाने आणि उत्कटतेने जाणवल्या.
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटाची रचनाशैली अद्वितीय होती. टीकाकारही त्यांच्या प्रतिभेमुळे स्तिमित होत असत. राजकीय चित्रपटांची मागणी जर समाजाकडून होत असेल, तरच असे चित्रपट बनविले जाऊ शकतात, असे बेनेगल यांचे मत होते. त्याचप्रमाणे सामाजिक चित्रपटांबद्दलही त्यांची ठाम भूमिका होती. चित्रपट समाजात फार मोठे बदल घडवून आणू शकत नाहीत. परंतु सामाजिक चेतना आणि गांभीर्य निर्माण करण्याची अफाट ताकद चित्रपट माध्यमात आहे, असे ते म्हणत. हे केवळ बोलून ते थांबले नाहीत, तर आपल्या चित्रपटांमधून तसा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी केला. समाजाच्या निद्रिस्त चेतना जागृत करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. चित्रपटाचे माध्यम त्यांनी त्या दृष्टीने जबाबदारीने हाताळले. भारतातील समांतर चित्रपटांच्या प्रवर्तकांपैकी ते एक मानले जातात. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना नवविचार देणार्या चित्रपटांच्या परंपरेचे पाईक मानले जाते. सत्यजित राय यांच्यानंतर त्यांचा वारसा बेनेगल यांनी पुढे चालविला आणि त्याला समकालीन संदर्भ प्रदान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय चित्रपटांची विभागणी दोन विभागांत होऊ शकते. सत्यजित राय यांच्या उदयापूर्वीचे आणि त्यानंतरचे चित्रपट अशी ही विभागणी आहे, असे ते मानत. असे असल्यास भारतातील अर्थवाही चित्रपटांची मालिकाही बेनेगल यांच्याच आसपास फिरताना दिसते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय चित्रपटांची वाटचाल एकात्म स्वरूपात झाल्याचे दिसते. मात्र, सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत चित्रपटांचे दोन प्रवाह प्रामुख्याने दिसतात. व्यावसायिक चित्रपटांच्या जोडीला एक समांतर चित्रपट परंपरा या काळात निर्माण झाली. याला चित्रपटांमधील आंदोलनाचा काळ मानता येईल. मनोरंजनाचे सर्व सरधोपट फॉर्म्युले या समांतर चित्रपटांनी नाकारले. लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याचे माध्यम म्हणून या काळात काही दिग्दर्शकांनी चित्रपटाकडे पाहिले. या दिग्दर्शकांचे मार्गदर्शक ठरले श्याम बेनेगल. कारण चित्रपटाला केवळ एक मनोरंजनाचे माध्यम मानणार्यांपैकी ते नव्हते. 1974 मध्ये त्यांनी तयार केलेला ‘अंकुर’ चित्रपट पूर्वीच्या सर्व व्याख्या बदलणारा ठरला. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने आणि त्याच्या रचनेच्या दृष्टीने अंकुर पूर्णपणे वेगळा ठरला. बर्लिन महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठी या चित्रपटाची निवडही झाली होती. समीक्षकांनीही या चित्रपटाविषयी भरभरून चर्चा केली. सत्यजित राय यांच्या चित्रकृतींनी बेनेगल प्रभावित असले, तरी त्यांनी चित्रपटाकडे केवळ कलाकृती म्हणून पाहिले नाही, तर त्याला राजकीय आणि सामाजिक वक्तव्याचे माध्यम बनविले.
चित्रपटाला समाजाचा आरसा मानले जाते. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी केवळ वास्तव दाखविले असे नव्हे, तर ते उत्कटपणे दाखविणारे कलावंतही त्यांनी घडविले. समाजातील प्रवाहाबाहेरच्या माणसांना पडद्यावर आणण्याबरोबरच या चित्रपटांनी समाजातील कुप्रथाही चव्हाट्यावर आणल्या.
1934 मध्ये आंध्र प्रदेशात जन्माला आलेल्या बेनेगल यांचे चित्रपटाशी जुने नाते होते. दिग्दर्शक, अभिनेते गुरुदत्त यांची आजी आणि बेनेगल यांची आजी या सख्या बहिणी होत. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी एवढे पुरेसे होते, तरीही बेनेगल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरातीच्या फिल्मसाठी स्क्रिप्ट रायटर म्हणून केली. पहिला चित्रपट तयार करण्यापूर्वी त्यांनी 900 अॅड फिल्म्स केलेल्या होत्या. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटासमोर मोठी आव्हाने उभी राहिली होती. समांतर चित्रपटांसाठी पैसा गोळा करणे दुरापास्त होते. कुणी पैसा पुरविला, तर त्याला अपेक्षित बदल चित्रपटात करताना तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येत असे. भारतात नवचित्रपटाच्या पायाभरणीचा हा कालखंड होता. या नवचित्रपटाला चेहरा देण्याचे श्रेय बेनेगल यांनाच जाते. सिद्धांतांशी तडजोड न करता त्यांनी हे करून दाखविले. त्यासाठी को-ऑपरेटिव्ह फंडिंगची संकल्पना त्यांनी मांडली आणि मंथन नावाच्या चित्रपटात ती वास्तवात उतरवून दाखविली. हा चित्रपटदुधाचा व्यापार करणार्या छोट्या गावांवर आधारित होता. या चित्रपटासाठी पाच लाख गावकर्यांनी प्रत्येकी दोन रुपये वर्गणी दिली. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ही मंडळी तिकिटे काढून तो पाहायला आली. समाजातील वंचित घटकांना पडद्यावर आणण्यासाठी त्यांनी वापरलेली ही युक्ती खूपच चर्चेत राहिली. अंकुर, निशांत अशा चित्रपटांमधून त्यांनी महिलांच्या दयनीय स्थितीचे चित्रण केले, तर दुसरीकडे ‘भूमिका’ चित्रपटात असमंजस महिलेचे पात्रही तितक्याच ताकदीने रेखाटले. ‘अंतर्नाद’ चित्रपटाच्या माध्यमातून मच्छिमारांच्या समस्यांचे दर्शन त्यांनी घडविले. दलित समूहांमध्ये समान अधिकारांच्या मागणीसाठी चेतना जागृत करण्याचे काम त्यांनी ‘समर’ या चित्रपटाद्वारे केले. महिलांच्या अधिकारांविषयी खुलेपणाने भाष्य करणारा त्यांचा ‘हरी-भरी’ हा चित्रपटही चर्चेत राहिला. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बेनेगल यांच्या दिग्दर्शनाद्वारेच केली आणि त्यांची ताकद चित्रपटसृष्टीला उमगली. समाजात बंड करून उठणार्या महिलेची कहाणी बेनेगल यांनी सरदारी ‘बेगम’ चित्रपटात रेखाटली. मम्मो, सरदारी बेगम, जुबैदा हे चित्रपट मुस्लिम महिलांच्या सद्यःस्थितीविषयी खुली चर्चा घडवून आणणारे ठरले.
केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर छोट्या पडद्यावरही बेनेगल यांनी असेच प्रयोग केले. रामायण, महाभारत यांसारख्या झगमगाटी मालिकांनी टीव्हीचा पडदा व्यापलेला असतानाच सरकारने भारताचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बेनेगल यांचीच त्यासाठी निवड करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात लिहिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाच्या आधारे त्यांनी भारत एक खोज या नावाने मालिका तयार केली. भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात हे एक महत्त्वाचे वळण मानले जाते. चित्रपट समाज बदलू शकत नाहीत, परंतु अभिव्यक्तीचे आणि वंचित घटकांकडे लक्ष वेधण्याचे ते एक प्रभावी माध्यम ठरते, हे बेनेगल यांनी अनुभवाने सिद्ध केले. हिंसाचार, नाचगाणी आणि सुमार अभिनयाने भरलेल्या मसालापटांच्या गर्दीत बेनेगल यांच्यासारखे मोजके दिग्दर्शक उठून दिसतात, ते त्यांनी चित्रपट माध्यमाच्या केलेल्या प्रभावी हाताळणीमुळे आणि चित्रपटांना दिशा देण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे. सध्या कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यांच्यातील अंतर घटते आहे, असे म्हटले जाते. काही बाबतीत ते खरेही आहे. परंतु अभिरुची घडविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या तपश्चर्येचेच हे फलित आहे, हे निश्चित. श्याम बेनेगल हे त्यापैकी महत्त्वाचे दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने एका महान दिग्दर्शकाला सिनेसृष्टी आणि भारतीय समाजमानस कायमचे मुकले आहे. – मानवेंद्र उपाध्याय, चित्रपट समीक्षक