खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे अभ्यासाचं कारण असतं. कधीतरी घराबाहेर असलेल्या छोट्या-मोठ्या धोक्यांचं निमित्त असतं. कधी पाऊस तर कधी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. मुलांचं आरोग्य बिघडेल, अशी काळजी आईवडिलांना वाटत असते. नैसर्गिक धोक्यांबरोबरच मानवनिर्मित धोकेही असतात. या व्यतिरिक्तही कारणं असू शकतात. परंतु पोरांना ‘खेळू नका’ म्हणण्याचं एक अजब कारण पुढे आलंय. केवळ अजबच नव्हे तर हृदयद्रावक! प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारं! पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही. मिळण्याची शक्यताही धूसर आहे. अशा स्थितीत मुलं खेळली तर त्यांना चक्कर येईल, या काळजीपोटी पोरांना ‘खेळू नका’ म्हणारे आईबाप किती कमनशिबी असतील! ही भयंकर परिस्थिती युद्धग्रस्त पॅलेस्टाइनमधली आहे. बॉम्बवर्षावात घरं बेचिराख झालेली. तात्पुरता आसरा उभा करण्यासाठीही जवळ काही उरलेलं नाही. खाण्यासाठी बिस्किटाचा एखादा पुडा शिल्लक आहे; पण ही बिस्किटं दहा-बारा पोरांमध्ये कशी वाटायची, असा प्रश्न आहे. पोरांना नेहमीचे सवंगडी समोर दिसतायत. पण छप्पर कुणाच्याच डोक्यावर नाही. काही दिवसांपूर्वीच ही पोरं जिथं धुमाकूळ घालत होती, त्या गल्ल्या जशाच्या तशा आहेत; पण बाजूची घरं मात्र नेस्तनाबूत झालीयेत. खरं कोण, खोटं कोण?योग्य काय, अयोग्य काय? याची पुसटशीही कल्पना नसलेल्या या पोरांचा गुन्हा काय?
इस्रायल-हमास युद्धाला चौदा महिने उलटून गेलेत. सात ऑक्टोबर 2023 रोजी हमासने पहिला हल्ला केला आणि भीषण युद्धाला तोंड फुटलं. ताज्या संघर्षाला जबाबदार कोण? कुठला देश कुणाच्या पाठीशी? युद्धाची व्याप्ती कुठवर वाढणार? संघर्षाचा अंत कधी होणार? संघर्षाचा इतिहास काय? भूतकाळात कुणी जास्त चुका केल्या? अशा असंख्य प्रश्नांचा ऊहापोह जगभरात अनेकांनी केला. युद्धखोर नेमकं कोण, हे ठरवण्याचा आटापिटाही केला. रशिया-युक्रेन युद्धाबाबत हेच घडलं. त्याही युद्धाची व्याप्ती पुन्हा वाढत चाललीये. परंतु ज्या अश्रापांचा युद्धाशी काडीचा संबंध नाही, त्यांच्या नरकयातनांवर कुणी फार बोललं नाही. ज्यांना ना इतिहास ठाऊक, ना भूगोलाचं ज्ञान अशा लेकरांच्या आजूबाजूला बॉम्ब पडतात. घरदार नष्ट होतं. आईबाप डोळ्यांसमोर मरतात. दिवसेंदिवस पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही. अन्नाचा तर पत्ताच नाही. असंख्य मुलं जायबंदी होतात; अपंग होतात आणि स्वतःला माणूस म्हणवणारे आपण केवळ चूक कुणाची, यावर चर्चा करत राहतो. आता तर युद्धग्रस्त भागात वेगळंच संकट आलंय. मदत साहित्य घेऊन येणारे ट्रक वाटेतच लुटले जातायत. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप!
गाझामध्ये काही टोळ्या मदतीचे ट्रक लुटत असताना इस्रायलचा या टोळ्यांना पाठिंबा आहे, असा आरोप हमासने केलाय. याउलट हमासचे दहशतवादीच ट्रक लुटत आहेत, असं इस्रायलचं म्हणणं आहे. खरं-खोटं काहीही असेल; पण असंख्य आया कचर्यातून अन्न वाचून आपल्या पोरांना भरवतायत, हे जळजळीत वास्तव कुणीच पुसू शकणार नाही. उपाशी पोरांना ‘खेळू नका’ म्हणणारे अगतिक आईबाप एकीकडे आणि साध्या लुटारूंना आवर घालू न शकणारे तथाकथित शक्तिशाली युद्धखोर दुसरीकडे. कोण कुणाशी खेळतंय? ‘खेळू नका’ असं कुणी कुणाला म्हटलं पाहिजे?
– सत्यजित दुर्वेकर
Check Also
मानाचा तुरा
मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य क्षेत्रातील …