लेख-समिक्षण

खरा इशारा

कामाशिवाय घराबाहेर पडू नका,’ हा सरकारी इशारा आता ‘अफवांवर विश्वास ठेवू नका,’ या सल्ल्याइतकाच सपक, निरर्थक आणि वेडगळपणाचा वाटू लागलाय. डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या युगात माहितीचा धबधबा डोक्यावर कोसळत असताना, त्यातली कोणती माहिती खरी आणि कोणती अफवा, हे ओळखण्याइतका नीरक्षीरविवेक 140 कोटी लोकांमध्ये आहे, असं गृहित का धरायचं? अफवांचं पीक येऊ नये असं वाटत असेल तर आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी माहितीतंत्राची व्याप्ती वाढवायला नको का? त्याचप्रमाणं अतिवृष्टी किंवा पूर आल्यास मूठभर अतिउत्साही लोकांचा अपवाद वगळता कामाशिवाय कोण घराबाहेर पडेल? महानगरांमधल्या रस्तोरस्ती दिसणारी गर्दी गंमत म्हणून घराबाहेर पडलेल्यांची असते का? शिवाय, जे घराबाहेर पडत नाहीत त्यांना भेटायला पुराचं पाणी घरात येतं, त्याचं काय? या लोकांची अपेक्षाही किती माफक..! धरणातून पाणी सोडण्यापूर्वी आम्हाला कळवा..! खरं तर घरात पाणी येताच कामा नये, कारण पूर ही काही आजची आपत्ती नाही. शतकानुशतकं नद्यांना पूर येतायत. परिसरविज्ञानाचा अभ्यास असलेल्या व्यक्ती पूर ही नैसर्गिक आणि आवश्यक गोष्ट मानतात. मग गेल्या काही वर्षांत असं काय घडलंय, की दरवर्षी पावसाचा जोर वाढल्यास असे निरर्थक इशारे द्यावे लागतात? की मग हा प्रश्नच टाळण्यासाठी असले इशारे देणं भाग पडतं? आपल्याला सोप्या गोष्टी उगीचच अवघड करून ठेवायच्यात, की आपली चूक झाकण्यासाठी हा खटाटोप आहे?
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये गर्भवती महिलेला झोळीत घालून, भरपावसात जीव धोक्यात घालून नदीपात्रातून पायी जाणारे लोक दिसले. त्यांना कोण आणि कोणता इशारा देणार? डोळ्यावर कातडं ओढून घेणं शहरांमध्ये सोपं आणि सोयीचं आहे. यावर्षी राज्याच्या किती शहरांमध्ये घरांत पाणी शिरलं? हाताच्या बोटांवर सुटणारं हे गणित नाही. जलवायू परिवर्तनामुळं पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी होऊन अत्यल्प अवधीत जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलंय, हे आता गुपित राहिलंय का? पावसाच्या या असमान वितरणाला तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था आपल्याला करावीच लागणार आहे. दरवर्षी ठराविक ठिकाणी ‘एनडीआरएफ’च्या टीम सज्ज ठेवणं ही तात्पुरती मलमपट्टी आहे, कारण अशी ठिकाणं दरवर्षी वाढतच जाणार आहेत. म्हणूनच आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारावे लागतील आणि त्याची प्रामाणिकपणे उत्तरंही द्यावी लागतील. सर्वप्रथम, आपल्याला कायमस्वरूपी तोडगा हवा आहे, की पावसाळ्यात पर्यायी तरंगती अर्थव्यवस्था उभारायची आहे? निसर्गाला आव्हान देण्याइतके शक्तिमान आपण नाही आहोत, हे आपल्याला मान्य आहे का? निसर्गातील घडामोडी आपण ‘विज्ञान’ म्हणून मान्य करणार का? निदान अनुभवातून तरी आपल्याला शहाणं व्हायचंय का?
निसर्गनियमांच्या विरोधात न जाता आर्थिक विकास साधता येईल, असा ठाम विश्वास असेल तर बरंच काही करता येईल. नदीचा नैसर्गिक प्रवाह मान्य करून पूररेषा, इशारारेषा या आपल्या हद्दी मानायला काय हरकत आहे? अतिक्रमणं, पूररेषेशी केलेले खेळ, हमरस्त्यांवर भराव टाकून बांधलेले पूल आणि त्यामुळं अडलेलं पाणी, घाटरस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अशास्त्रीय पद्धतीनं डोंगर पोखरल्यामुळं होणारं भूस्खलन, या गोष्टी किमान समजून घ्यायला काय हरकत आहे? समजणं, मान्य करणं आणि सुधारणं हेच शहाणपणाचे तीन टप्पे!-सत्यजित दुर्वेकर

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *