लेख-समिक्षण

क्रिकेटच्या राजकारणात पाकिस्तान ‘बोल्ड’

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षा कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तानचे दौरे रद्द केले आहेत. भारत आणि आयसीसीव्यतिरिक्त ब्रॉडकास्टर्सनी देखील पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसल्याचा मुद्यावरून आकांडतांडव करू नका, असे बजावले आहे. स्पर्धा रद्द झाली तर सर्वाधिक आर्थिक फटका हा पकिस्तानलाच सहन करावा लागेल. भारताच्या मागणीची दखल घेत आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओके टूरवर केवळ बंदीच घातली नाही तर पुन्हा वेळापत्रक करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे भारताविरोधातील नापाक इरादे पुन्हा धुळीस मिळाले आहेत.
केट हा अनिश्चिततेचा खेळ. पण त्याच्या राजकीय खेळपट्टीवर पराजय निश्चित असतानाही पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शड्डू ठोकून खेळण्याचा डाव आखलेला दिसतो. पाकिस्तानच्या नेत्यांच्या इशार्‍यावर ‘पीसीबी’ डावपेच आखत आहे. अर्थात तो स्वत:च अडकला आहे. पुढील वर्षी पाकिस्तानात होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून ‘पीसीबी’ नवनवीन क्ल्युप्त्या लढविताना दिसत आहे. मात्र या आघाडीवर त्याची पूर्णपणे पिछेहाट झाली आहे. जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचा टूर आयोजित केला असून तो पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) शहरात घेण्याची घोषणा केली. तसेच भारताला पाकिस्तानात येऊन खेळावे लागेल, अशीही अट घातली. पण भारत, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील (आयसीसी) आणि ब्रॉडकार्स्टस या तिघांच्या दबावामुळे पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षा कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तानचे दौरे रद्द केले आहेत. 2009 मध्ये श्रीलंका संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर असताना मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारीपर्यंत कराचीत खेळला गेला आणि तो अनिर्णित राहिला. दुसरा सामना लाहोरमध्ये होता. एक मार्च ते पाच मार्चपर्यंत तो सामना खेळण्यात येणार होता. परंतु यादरम्यान तीन मार्चला श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर जगभरातील संघांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. तत्पूर्वी सुरक्षा कारणाचा हवाला देत 2021 मध्ये न्युझीलंडचा क्रिकेट संघ हा पाकिस्तानच्या दौर्‍यावर येऊनही कोणताही सामना न खेळता मायदेशी परतला होता. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्ताच्या दौर्‍यावर महिला आणि पुरुष संघाला पाठविण्याचा निर्णय रद्द केला. भारताचा क्रिकेटचा संघ शेवटचा धोनीच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये पाकिस्तानला गेला होता.पण त्या वर्षी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. तेव्हापासून या दोन्ही संघाचे सामने आयसीसी आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतच होताना दिसतात.
बर्‍याच प्रयत्नांती आणि 29 वर्षानंतर पाकिस्तानला एखाद्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली. असे असतानाही पाकिस्तानचे नापाक इरादे बाहेर येंत आहेत. सुरक्षेच्या कारणावरून बीसीसीआयने ‘आयसीसी’कडे आपले सामने हायब्रिड मॉडेलनुसार अन्य देशांत ठेवण्याचा आग्रह केला. मात्र पीसीबीने हायब्रीड मॉडेलचा स्वीकार करण्यास नकार दिला. यावर आयसीसीने तंबी देत म्हटले, की या जिद्दीमुळे पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफीच रद्द केली जाईल. अर्थात भारताशिवाय क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेचा विचार करता येणार नाही. म्हणून भारत आणि आयसीसीव्यतिरिक्त ब्रॉडकास्टर्सनी देखील पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसल्याचा मुद्यावरून आकांडतांडव करू नका, असे बजावले आहे. स्पर्धा रद्द झाली तर सर्वाधिक आर्थिक फटका हा पकिस्तानलाच सहन करावा लागेल.
प्रत्यक्षात ब्रॉडकास्टर्सचा आयसीसीसमवेत 2024 ते 2027 पर्यंत सर्व सामन्यांसाठी तीन अब्ज डॉलर म्हणजे 2534 कोटी रुपयांचा करार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द हेत असेल तर ब्रॉडकास्टर्सचे प्रचंड नुकसान होणार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतून ब्रॉडकास्टर्सची तीन हजार कोटींची कमाई झाली होती. म्हणून ब्रॉडकास्टर्सनी आयसीसीवर दबाव आणला आहे. ही स्पर्धा कोणत्याही स्थितीत व्हावी, मग भारतीय संघ कोणत्याही देशात का खेळेना, याबाबत आग्रह केला आहे. पीसीबीच्या अधिकार्‍यांनी अडेलतट्टू भूमिका घेण्याऐवजी स्पर्धेतून होणार्‍या फायद्याचा विचार करावा, असे आयसीसीने सांगितले आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतून बीसीसीआयला सुमारे 11,637 कोटी रुपयांची कमाई झाली. याप्रमाणे 2022 च्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत 358 कोटी रुपयांपेक्षा अधिक फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.
अगदी काही काळापर्यंत पाकिस्तानचे अनेक माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर हायब्रीड मॉडेलचा अंगीकार न करणे आणि स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी करत होता. परंतु आता आर्थिक नुकसान पाहता त्यांचे सूर बदलले आहेत. शेवटी पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. आता भारताचे सामने हायब्रीड पद्धतीनुसार यूएईमध्ये होतील आणि यावर मतैक्य झाले आहे. याशिवाय उपांत्य सामना अणि अंतीम सामना देखील तेथेच खेळला जाईल. कारण भारताने या फेरीपर्यंत मजल मारली तर पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे हायब्रीड मॉडेलच्या विरोधावर अडून बसलेल्या पाकिस्तानने खेळाच्या राजकारणात पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा तापविला. पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे 25 नोव्हेंबरपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यात म्हटले,“तयार व्हा पाकिस्तान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा टूर इस्लामाबादहून सुरू होईल. यात स्कार्टू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबादसारख्या पर्यटनस्थळाचा देखील दौरा केला जाईल.” अर्थात पीसीबीने जाणीवपूर्वक जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील या चार शहरांचा दौरा आयोजित केला आहे. भारताने मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. हा आमचा भाग असून पाकिस्तानने तो जबरदस्तीने बळकावला असल्याचे म्हटले आहे. अशा भागात जाणीवपूर्वक दौर्‍याचे आयोजन करण्याचा मुद्दा समर्थनीय नाही. त्यामुळे भारताने जोरदार विरोध केला. त्याचबरोबर बीसीसीआयने या मुद्यात आयसीसीला तातडीने हस्तक्षेप करण्यास सांगत व्याप्त काश्मीरमधील दौरा रद्द करण्याची मागणी केली. भारताच्या मागणीची दखल घेत आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओके टूरवर केवळ बंदीच घातली नाही तर पुन्हा वेळापत्रक करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे भारताविरोधातील नापाक इरादे पुन्हा धुळीस मिळाले आहेत. — नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Check Also

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *