कोलेस्टेरॉलमुळे केवळ हृदयविकाराचाच धोका संभवतो असे नाही. मानवी शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उपउत्पादनामुळे एस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांची वाढ होते व परिणामी अनेक प्रकारचे स्तनांचे कर्करोग यामुळे होतात, असे एका अभ्यासात दिसून आलेले आहे. डुक कर्करोग संस्थेच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, स्टॅटिनसारखी कोलेस्टेरॉल प्रतिबंधक औषधे एस्ट्रोजेनच्या रेणूंचा परिणाम नष्ट करतात. या अभ्यासाने प्रथमच कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण व विशेषत: रजोनिवृत्तीनंतर स्तनांचा कर्करोग यांचा संबंध जोडला गेला आहे. आहारातील बदलांमुळे कोलेस्टेरॉलला आळा घालून अशा प्रकारच्या कर्करोगाची शक्यता कमी करता येते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
लठ्ठपणा व स्तनांचा कर्करोग यांचा संबंध दाखवणारे अनेक अभ्यास आतापर्यंत झाले असून, कोलेस्टेरॉलवाढीमुळे स्तनांच्या कर्करोगास अप्रत्यक्षपणे मदत होत असली, तरी ते नेमके कसे घडून येते हे माहीत नव्हते, त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे औषधशास्त्र व कर्करोग जीवशास्त्र विभागाचे डुक येथील अध्यासन प्रमुख डोनाल्ड मॅकडोनेल यांनी सांगितले. थेट कोलेस्टेरॉल नव्हे, तर त्याच्या चयापचयातून निर्माण झालेला ‘27 एचसी’ हा घटक एस्ट्रोजन संप्रेरकाची नक्कल करतो व स्वतंत्रपणे स्तनांच्या कर्करोगवाढीस कारण ठरतो. स्तनांच्या 75 टक्के कर्करोगात एस्ट्रोजेनचे वाढते प्रमाण हे कारण असते. 27 हायड्रॉक्सिकोलेस्टेरॉल किंवा 27 एचसी हा पदार्थ अगदी एस्ट्रोजेनसारखी भूमिका पार पाडतो. उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात 27 एचसी या घटकाचा संबंध स्तनांच्या कर्करोगाशी मोठा प्रमाणात असल्याचे दिसून आले. एस्ट्रोजेनविरोधी टॅमोक्सिफेन या औषधाची परिणामकारकताही त्यामुळे कमी होत जाते. स्तनांच्या कर्करोगावर वापरल्या जाणार्या अॅरोमेटस इनहिबिटर औषधांचा परिणामही 27 एचसी या पदार्थामुळे कमी होतो असे दिसून आल्याचे ‘सायन्स’ या नियतकालिकात म्हटले आहे.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …