लेख-समिक्षण

कोट्याधिश कृषीसखी

दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकर्‍यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धानं हे शिवधनुष्य पेललं. आज ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावातील धवन कुटुंब जनावरांची खरेदी विक्री करतात. छोटाच व्यवसाय. अल्पभूधारक. दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत शद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. सुट्टीच असल्यानं वडिलांसोबत जनावरांच्या बाजारात जायला लागली. म्हैस कशी ओळखायची, म्हैस खरेदी करण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवं, जनावरांचा लिलाव कसा करतात, योग्य किंमत कशी ओळखायची अशा छोट्या-छोट्या गोष्टी तिनं शिकून घेतल्या. या सगळ्या अनुभवांमधून व्यवसायाचं प्रशिक्षणच तिला मिळत होतं.
2013 मध्ये तिनं ठरवलं की घरीच गायी म्हशी पाळून दुधव्यवसाय सुरु करायचा. हा तिचा निर्णय तिच्यासाठी कलाटणी देणारा ठरला. पण अभ्यास थांबवून हे सगळं तिला करायचं नव्हतं. मग एकीकडे अभ्यास, दुसरीकडे व्यवसाय असा ताळमेळ साधत तिनं या व्यवसायात उडी मारली. वडिलांचं संशोधन, अभ्यास आणि तिचं अद्ययावत ज्ञान अशी जोड देत तिनं व्यवसायाला सुरुवात केली. तोपर्यंत तिची 11 वी सुरु झाली होती. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. हळूहळू गायी, म्हशींची संख्या वाढवली, कामगार वाढवले आता तिच्याकडे एकूण 130 म्हशी आहेत. स्टार्टअपपेडीयाला दिलेल्या मुलाखतीनुसार, पोस्टऑफिस आणि वेगवेगळ्या दुकानांमधून राज्यभरात ती दुधापासून बनवलेले प्रॉडक्ट पाठवते. यामध्ये तूप, लोणी, लस्सी , ताक आणि दही याचा समावेश आहे. नैसर्गिक पद्धतीनं ही सर्व उत्पादनं ती बनवते.
आज श्रद्धा फार्मचा एक टन बायोगॅसचा प्लांटही आहे. जिथं सेंद्रिय खत बनवलं जातं. हे खत शेतकर्‍यांना तसेच कृषी कंपन्यांना विकलं जातं. अजूनतरी तिच्या स्टार्टपमधील उत्पादनं इकॉमर्सवर नसली तरी भारतभर इमेलच्या माध्यमातून तिला ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तिनं वर्षभरात या व्यवसायातून एक कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कल्पकतेने उद्योग कसा करावा ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *