तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे सिनेमांचे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन, सादरीकरण यात आमूलाग्र बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आल्यानंतर प्रेक्षकांना कृष्णधवल चित्रपटांचा विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादानेच कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपट कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच झाली. मात्र त्यातील आजही काही चित्रपट आवडीने पाहिले जातात.- सोनम परब
——–
हिंदी सिनेमाने शंभर वर्षाच्या इतिहासात अनेक चढउतार अनुभवले. यातील काही संघर्षाचे, तर काही वाईट तर काही वेळा सुवर्णकाळही अनुभवला. प्रारंभीच्या काळात चित्रपट तयार करणे हे महाकठीण काम होते. कालांतराने तंत्रज्ञान विकसित झाल्याने निर्मात्यांच्या निर्मितीत वैविध्यपणा आला. तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे चित्रिकरण, संगीत आणि दिग्दर्शन यात खूप बदल झाला. प्रारंभीच्या काळात कृष्णधवल असणारे चित्रपट कालांतराने इस्टमनकलर झाले. चित्रपटात वास्तवांतील रंग आले तेव्हा लोकांना कृष्णधवल चित्रपटांचा एकप्रकारे विसरच पडला. नव्या पिढीतील मुले अपवादात्मक कृष्णधवल चित्रपट पाहतात. मात्र त्या काळातील चित्रपटांचे आकलन केल्यास कथानक, दिग्दर्शन, चित्रिकरण आणि अभिनयाची ताकद या आघाडीवर आजही ते चित्रपट सरस मानले जातात. 1970 च्या दशकानंतर कृष्णधवल चित्रपटांची निर्मिती जवळपास बंदच झाली. मात्र त्यातील आजही काही चित्रपट आवडीने पाहिले जातात.
कृष्णधवल चित्रपटांत आयुष्यातील सत्य दाखविण्याबरोबरच सामाजिक मुद्द्यांवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आजही बावन्नखणी मानला जातो. लोकप्रिय चित्रपटांच्या मालिकेत 1949 चा चित्रपट ‘महल’ याचा आवर्जुन उल्लेख करता येईल. कमाल अमरोही दिग्दर्शित चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला यांनी भूमिका साकारली. पुनर्जन्मावर आधारित रहस्यमय चित्रपट हा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता. त्याचवेळी दोन प्रेमवीरांचे मिलन आणि विरहाचे कथानकही होते.
गरिबी, हतबलता आणि अन्याय
1951 मधील राजकपूर यांच्या ‘आवारा’ चा उल्लेख करता येईल. या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी न्यायाधीशाची भूमिका बजावली. याच वर्षी झळकलेला ‘अलबेला’चे दिग्दर्शन मास्टर भगवान यांनी केले होते. गीताबाली आणि मास्टर भगवान यांची या चित्रपटात भूमिका होती. चित्रपटाचे कथानक एका गरीब व्यक्तीवर केंद्रीत होते. तो बहिणीच्या लग्नसाठी पैसे गोळा करू शकत नाही. घरातून बाहेर पडताना श्रीमंत होऊनच परत येण्याचा निर्धार करतो. परंतु तो जेव्हा परत येतो तेव्हा आई जीवंत नसल्याचे लक्षात येते. बिमल रॉय यांचा चित्रपट ‘दो बिघा जमीन’ (1953) मध्ये बलराज साहनी, मुराद, निरुपमा रॉय यांनी भूमिका केली आहे. या चित्रपटात गरीब शेतकरी शंभू महतोचा (बलराज सहानी) संघर्ष आणि जबरदस्तीने वसूली केली जाणार्या स्थितीचे दर्शन घडविले आहे.
राजकपूर यांच्या चित्रपटांचा डंका
1954 मध्ये प्रकाश अरोरा दिग्दर्शित ‘बुटपॉलिश’ मध्ये कुमारी नाज, रतनुकमार, चंदा बुर्के आणि डेव्हिड होते. बहिण भावाची कहानी असलेल्या या चित्रपटात आईच्या मृत्युनंतर दुष्ट काकू कमला देवी (चंदा बुर्के) या भाऊ आणि बहिणीला रस्त्यावर भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतात. तत्कालिन काळातील गरिबीची विदारक स्थिती या चित्रपटात दाखविली गेली आहे. कृष्णधवलच्या जमान्यातील राजकपूर यांचा अभिजात श्री 420 (1955) ची आजही आठवण काढली जाते. यात राजकपूर यांच्यासमवेत नर्गिस, नादिरा होते. चित्रपटातील कथानक गावातील मुलगा रणबीर राजवर बेतलेले होते. तो आपले नशिब आजमवण्यासाठी शहरात येतो. तेथे त्याला विद्यावर (नर्गिस) प्रेम होते. राज हा शहरातील अनेक लबाड लोकांशी भेटतो आणि ते त्याला लबाडी शिकवतात. हा चित्रपट रशियात खूप गाजला.
रशियातही ब्लॉकब्लस्टर
1956 मध्ये गाजलेल्या ‘जागते रहो’ चे दिग्दर्शन अमित मित्रा यांनी केले. यात राजकपूर, प्रदीप कुमार, स्मृति बिस्वास आणि नर्गिस होते. चांगल्या जीवनाची आस बाळगून असलेल्या एका गरीब व्यक्तीवरचे कथानक साकारण्यात आले होते. ‘जागते रहो’ हा भारताचा अभिजात चित्रपट मानला जातो. त्याला रशियातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. 1957 मध्ये ‘प्यासा’ हा गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात वहिदा रेहमान, माला सिन्हा यांची भूमिका होती. यात एका कवीचा संघर्ष दाखविला आहे. कविता प्रसिद्ध करण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात, हे सादर करण्यात आले आहे.
सदाबहार मधुमती आजही चर्चेत
1957 मध्ये झळकलेला बी.आर. चोप्रा यांचा नया दौर हा आजही तितकाच लोकप्रिय आहे. दिलीपकुमार, वैजयंती माला, अजित यांनी भूमिका साकारल्या होत्या. या कथेत शंकर (दिलीपकुमार) हा घोडागाडी चालवत उदरनिर्वाह करत असतो. मात्र घरमालक सेठ जीचा (नजिर हुसेन) लहान मुलगा कुंदनला (जीवन) शंकर आणि त्याचे साथक्षदार धमकवतात. कारण त्याने त्याच मार्गावर बस सुरू केलेली असते. कृष्णधवल जमान्यातील आणखी एक सदाबहार मधुमती (1958) चा उल्लेख करता येईल. त्याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते आणि यात दिलीपकुमार, वैजयंती माला, प्राण आणि जॉनी वॉकर होते. मधुमती हा सदाबहार रोमॅटिंक चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा पुनर्जन्मावर आधारित चित्रपट होता. 1959 मध्ये गुरुदत्त यांचा ‘कागज के फुल’ देखील दर्जेदार चित्रपट. यात गुरुदत्त यांच्यासमवेत वहिदा रेहमान आणि वीणा सप्रू होते.
‘मुगल ए आझम’चा दबदबा
हिंदी चित्रपटातील सर्वाधिक अभिजात चित्रपटांपैकी ‘मुघल ए आझम’चा (1960) उल्लेख करावा लागेल. त्याचे दिग्दर्शन के. आसिफ यांनी केले. यात पृथ्वीराज कपूर, मधुबाला, दिलीपकुमार, अजित, दुर्गा खोटे यांची भूमिका आहे. चित्रपटात प्रेम आणि वडिलांचा जिद्दी स्वभाव आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी दाखविली आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या खर्जिन्यातील आवाजातील ‘हम मोहब्बत के दुश्मन नही, पर उसुल के गुलाम है’ हा संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहे. मुघल राजपुत्र सलीम आणि दरबारातील अनारकली यांची प्रेम कहानी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटातील काही दृष्य रंगीत होते. ‘प्यार कियॉ तो डरना क्या हे’ गाणे रंगीत करण्यात आले होते. कालांतराने संपूर्ण चित्रपट डिजिटल तंत्रज्ञानाने रंगीत केला गेला. दिग्दर्शन विजय आनंद यांचा ‘काला बाजार’ (1960) मध्ये देव आनंद, वहिदा रेहमान आणि नंदा होते. हा विजय आनंद यांचा यशस्वी कृष्णधवल चित्रपट मानला जातो. 1961 मधील ‘काबुलीवाला’चे दिग्दर्शन हेमेन गुप्ता यांनी केले होते. त्यात बलराज सहानी, बेबी सोनू, बेबी फरीदा यांनी अभिनय केला होता.
या अभिजात चित्रपटांना तोड नाही
गुरुदत्त यांचा ‘साहिब बीबी और गुलाम’चे (1962) लेखन आणि दिग्दर्शन अबरार अल्वी यांनी केले. यात मीनाकुमारी, गुरुदत्त, रेहमान यांचा समावेश होता. चित्रपटात अनेक फ्लॅशबॅक आहेत. यातील अनेक संवाद संस्मरणीय ठरले. असाच एक अजरामर चित्रपट ‘बंदिनी’चा (1963) उल्लेख करता येईल. त्याचे दिग्दर्शन विमल रॉय यांनी केले होते. यात अशोक कुमार, नूतन आणि धर्मेंद्र होते. हा चित्रपट महिला कैदी नूतन आणि डी देवेंद्र (धर्मेंद्र) वर केंद्रीत होता. बंदिनी ही एक महिला कैद्याची दु:खद आणि भावनात्मक कहानी आहे. 1963 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराव्यतिरिक्त या चित्रपटाने 1964 मध्ये अनेक श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळवले. याशिवाय आणखी काही कृष्णधवल चित्रपटांचा उल्लेख करता येईल. अनमोल घडी, आरपार, देवदास, चोरी चोरी, चलती ना काम गाडी, हावडा ब्रिज आदी.
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …