मनी गिव्स यू कॉन्फिडेंस’ ही इंग्रजी म्हण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील प्राची भाटिया हिला अचूक लागू पडते. तिने आपली दमदार पगार असणारी नोकरी सोडून ‘चौखट’ हा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. अर्थात, सुरुवातीला तिची कल्पना यशस्वी झाली नाही, पण आज व्यवसायात तिची लाखोची उलाढाल आहे.
खरंतर प्राचीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेची आवड होती. दरम्यान, ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या 6 महिने आधी तिला नोकरी मिळाली. परंतु त्यात काम इतकं असायचं की तिला रात्री दोन वाजेपर्यंत जागं राहावं लागायचं. यानंतर तिने आपली नोकरी बदलली, पण त्यातही तिला समाधान मिळाले नाही. अशा दोन ते तीन ठिकाणी नोकरीचा वाईट अनुभव आल्यावर तिला तिच्या भविष्याबद्दल चिंता वाटू लागली. पण हिंमत न हरता तिने स्वतःला स्वत:ला शांत ठेवण्यासाठी स्केच काढायला सुरुवात केली. या दरम्यान काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार तिच्या मनात आला.
यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये तिने ‘चौखट’ हा गृहसजावटीशी संबंधित कलात्मक वस्तूंचा स्टार्टअप सुरू केला. सुरुवातीला फक्त 10 उत्पादनांसह प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता.
प्राची भाटियाने सांगितले की, मी व्यवसाय सुरु केला होता, पण ग्राहक येत नव्हते. कधी-कधी महिनाभर एकही ऑर्डर मिळत नव्हती. अनेकदा विचार आला की व्यवसाय सोडून पुन्हा नोकरी करावी पण मग स्वतःलाच धीर आणि प्रोत्साहन दिले. यानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. लोकांना ही कल्पना आवडली आणि हळूहळू ऑर्डर्स वाढू लागल्या. आज महिन्यात 200 हून अधिक ऑर्डर्स येत असून या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न 20 ते 40 लाख आहे.
वास्तविक, कॉलेजमध्ये असताना, प्राचीने तिच्या पालकांचा भार हलका करण्यासाठी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, तिच्या फेसबुक पेजद्वारे फोटो अल्बम, फोटो प्रिंटेड दिवे, हस्तनिर्मित कार्ड आणि हाताने बनवलेले गुलाब यासारख्या हस्तनिर्मित भेटवस्तू विकल्या होत्या.
प्राची भाटियाच्या मते, घर सजवण्यासाठी डिझायनर होम डेकोर खूप महाग आहेत, जे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बजेटच्या बाहेर जातात. अशा स्थितीत घर सजवण्यासाठीची कलाकुसर असणारी उत्पादने, वस्तू स्वस्तात मिळावीत आणि लोकांपर्यंत पोहोचावीत असा चौखटच्या माध्यमातून तिचा प्रयत्न आहे.
प्राचीने सुरुवातीपासूनच तिच्या व्यवसायाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि सामान बांधण्यापासून ते वेबसाईट हॅण्डल करण्यापर्यंत सर्व गोष्टी ती स्वतः पाहते.