ज्ञानादी विषय प्रात्यक्षिकातून शिकावे लागतात. प्रयोग करावे लागतात आणि शाळापातळीपासूनच त्यासाठी प्रयोगशाळा असतात. अनेक शाळांमध्ये आजही प्रयोगशाळा नाहीत, हा भाग वेगळा. रसायनशास्त्रातलं एखादं संयुग किंवा भौतिकशास्त्रातलं एखादं सूत्र समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. भाषा विषय, इतिहास आदी विषयांच्या अभ्यासासाठी प्रयोग करून पाहण्याची गरज नसते. भूगोलातील काही भाग प्रयोगशील असतो आणि ऐतिहासिक स्थळी सहली काढून इतिहास अधिक अचूकपणे समजून घेता येतो. एकंदरीत, प्रयोगातून समजून घेण्याचे विषय मर्यादित असतात. ‘क्रिमिनोलॉजी’ हा काही प्रयोगातून समजून घेण्याचा विषय नाही. गुन्हे, गुन्हेगारी आणि गुन्हेगाराची मानसिकता यांचं विश्लेषण करणारा हा विषय आहे. परंतु चोरी करताना चोराची मानसिक अवस्था कशी होत असेल, हे समजून घेण्यासाठी अभ्यासकाने प्रत्यक्ष चोरी करून पाहायला हवी, असं नाही. गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत तर ‘दुरून डोंगर साजरे’ मानूनच अभ्यास करावा लागतो. परंतु एखाद्या माणसाला खून करताना कसं वाटत असेल, याचा ‘अनुभव’ घ्यायचा एवढ्याच कारणासाठी कुणी खून केला तर..? सखोल ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेला आपण ‘दांडगा अभ्यास’ म्हणतो हे खरं; पण तो इतकाही दांडगा असता कामा नये. म्हणूनच ब्रिटनमध्ये ‘क्रिमिनोलॉजी’ शाखेत शिकणार्या विद्यार्थ्यानं केलेला खून जगभरात आश्चर्याचा विषय ठरलाय. ‘मला करून पाहायचंय,’ हे लॉजिक या बाबतीत कसं चालेल?
एखाद्याचा जीव घेताना कसं वाटत असेल? हा प्रश्न पडलेला वीस वर्षांचा हा विद्यार्थी कुतूहल शमवण्यासाठी ‘शिकार’ शोधू लागला. ‘सॉफ्ट टार्गेट’ सापडताच त्याने हल्ला केला आणि 34 वर्षांच्या महिलेची हत्या केली. तिच्यासोबत असलेली 38 वर्षांची आणखी एक महिला या हल्ल्यात जखमी झाली. सावज शोधण्याच्या प्रवासात त्याने राहण्याचं ठिकाण बदललं. बर्याच दिवसांनी त्याला अपेक्षित ‘संधी’ मिळाली. वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या महिलेला धाकात घेतलं, भीती दाखवली तर आपण शक्तिशाली आहोत असं वाटतं का? हे त्याला शोधायचं होतं. ‘शिकारी’च्या दिवशी समुद्रकिनारी बसलेल्या दोन महिलांना त्याने हेरलं. दोघींना खतम करायचं ठरवून त्याने हल्ला केला. एका महिलेवर त्याने चाकूचे 10 वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला. नंतर तो भयभीत झालेल्या दुसर्या महिलेकडे वळला. पण तिच्यावर तब्बल 20 वार करूनसुद्धा ती वाचली. हल्ला केल्यावर हा विद्यार्थी तिथून पळून गेला. काही दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आपल्याला गुन्ह्यांबद्दल आकर्षण आहे हे त्यानं कबूल केलं; पण हत्येचा आरोप मात्र त्याने कबूल केला नाही.
या विद्यार्थ्याविरुद्ध खटला अजून सुरू आहे. हल्ल्यानंतर पळून जाताना त्याने घटनास्थळी फेकून दिलेला चाकू पोलिसांना सापडलाय. संशयावरून जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याने आपल्या बेडमध्ये आणि कपाटात अनेक चाकू लपवून ठेवलेले पोलिसांना दिसले. हल्ल्याच्या दिवशीच आरोपीने ‘द स्ट्रेंजर्स चॅप्टर’ नावाचा चित्रपट पाहिला होता आणि त्यात चाकूने भोसकण्याची अनेक दृश्यं आहेत, अशीही माहिती कोर्टात दिली गेली. आरोप सिद्ध झाल्यास गुन्ह्याचं कारण हाच चर्चेचा विषय असेल.
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …