कल्पना करून पाहा अशा जगाची, जिथे प्रत्येकाला आपल्या मृत्यूची तारीख माहीत आहे. काय-काय होईल? कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला आपण कधी ‘जाणार’ हे ठाऊक असल्यामुळं ती प्रॉपर्टीचं व्यवस्थापन करणं टाळतेय किंवा केलंच तरी ते कुणाला सांगत नाहीये.अशा परिस्थितीत मुलं त्या व्यक्तीची ‘मनोभावे’ सेवा करतील? वयानं लहान असूनही आपण आधी जाणार हे ज्याला माहीत आहे, तो कसं वागेल? पती आणि पत्नी आपापल्या मृत्यूची तारीख एकमेकांना शेअर करतील का? लग्नं जुळवताना पत्रिकेतच मृत्यूची तारीख टाकण्याचा आग्रह उभय पक्षांकडून होईल का? झाल्यास लग्नं जुळतील का?
पाप-पुण्य, स्वर्ग-नरक आदी संकल्पनांवर विश्वास असलेली माणसं साधेपणानं वागतील की अधिकाधिक सुखलोलुप होतील? भूतपिशाच्च आदी संकल्पनांवर विश्वास असलेली माणसं तेही प्लॅनिंग आधीच करून ठेवतील का? पुढील सात पिढ्यांचं कमावून ठेवण्याची भूक कमी होईल की वाढेल? मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या प्रमुखांची काय स्ट्रॅटेजी राहील? एकचालकानुवर्तित्व असलेल्या राजकीय पक्षांचे प्रमुख ‘आपल्यानंतर पक्षाचं काय,’ हा प्रश्न कधी आणि कसा सोडवतील? जमीनजुमल्याचे कज्जे-खटले कोर्टाबाहेर सोडवण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल का? मृत्यूची प्रमाणपत्रं हयातीतच मिळवून ठेवण्याची सोय उपलब्ध होईल का? त्यानुसार सरकारी कचेर्यांमधील कामकाजात गतिमानता आणता येईल का? ही सगळी ‘फॅण्टसी’ वाटू शकेल; परंतु आजची फॅण्टसी उद्याची रिअॅलिटी ठरावी, असे धक्के तंत्रज्ञान रोज देतंय.
‘उपरवाले का बुलावा कब आएगा,’ हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगणार आहे म्हणे! त्यासाठी संशोधकांनी ‘डेथ क्लॉक’ तयार केलंय आणि ‘अॅप’ स्वरूपात ते उपलब्धही झालंय. ते तयार करणारे कॅलिफोर्नियातील संशोधक ब्रॅट फ्रॅन्सन यांच्या म्हणण्यानुसार, पाच कोटी लोकांच्या ‘लाइफ एक्स्पेक्टन्सी डेटा’चा अभ्यास करून हे अॅप डेव्हलप केलंय. सव्वा लाख लोकांनी ते डाउनलोडही केलंय म्हणतात! म्हणजे, त्यांची झाकली मूठ सव्वालाखाची राहिलेली नाही. ‘यूजर’चं सध्याचं वय, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तो किती तास झोपतो, व्यायाम करतो की नाही, सिगारेट-दारू आदीचं सेवन करतो का, त्याच्या आजारांचा इतिहास अशी माहिती हे अॅप आपल्याला मागणार आणि आपल्या मृत्यूची संभाव्य तारीख सांगणार. वास्तविक ‘लाइफ एक्स्पेक्टन्सी’ हा वैद्यकशास्त्राचा विषय. शिवाय, आपल्या सवयींवरून आपल्यालाही थोडीबहुत कल्पना असतेच; पण तारखेच्या स्वरूपात ही वेळ समोर आली, तर दचकायला होणारच! हे योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक हा विषय आता राहिलेला नाही. तंत्रज्ञान ही विकण्याची वस्तू आहे आणि निर्णय खरेदीदाराने घ्यायचाय. तारीख ऐकून हार्ट अॅटॅक येण्याची भीती वाटणारे अॅपपासून दूर राहतील.
एआय तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात प्रवेश (किंवा घुसखोरी) करून आता बरेच दिवस झाले. आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा प्रभाव पडेल, असं म्हणता-म्हणता त्याने आपलं जीवन व्यापून टाकायला सुरुवातही केली. पण आता ते आपल्या मरणापर्यंत पोहोचलं. हे चांगलं की वाईट, हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण तंत्राने जीवनातली मजा हिरावून घेऊ नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. कालचा दिवस इतिहासजमा झाला. उद्याची खात्री देता येत नाही. फक्त आजचा दिवस ‘आपला’, एवढंच माहीत असण्यात जगण्यातली खरी मजा आहे.
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …