लेख-समिक्षण

एका रात्रीत झाले सुपरस्टार…

पहिल्याच नजरेत एखाद्या व्यक्तीतील कलागुण हेरण्याचे कौशल्य सर्वांनाच असते असे नाही. मात्र बॉलिवुड असो किंवा हॉलिवुड या दोन्ही ठिकाणी यशाचे शिखर गाठणारे कलाकार हे दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी त्यांना पहिल्याच नजरेत हेरले आहेत. सुभाष घई, यश चोप्रा, सुरज बडजात्या यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी अनेक बडया कलाकारांचे अभिनय कौशल्य ओळखून त्यांना आपल्या चित्रपटात ब्रेक दिला आणि ते एका रात्रीत सुपरस्टार झाले.
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा किस्सा सांगता येईल. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची हौस. युनायटेड प्रोड्यूसर्स आणि फिल्मफेअरच्या बॅनरखाली 1965 मध्ये नवीन अभिनेत्याच्या शोधासाठी एक स्पर्धा आयोजित केली. यात दहा हजार मुले सहभागी झाले होते आणि त्यापैकी आठ मुले अंतीम फेरीत पोचले. यात राजेश खन्ना होते. या स्पर्धेमुळे त्यांना 1966 मध्ये ‘आखिरी खत’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तेथूनच या स्टारपर्वाला सुरुवात झाली. कृष्णधवल जमान्यातील मेगास्टार अशोक कुमार यांचा बॉलिवुडमधील प्रवेश देखील रंजक आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा अधिक चित्रपट साकारले. वास्तविक ते 1934 मध्ये न्यू थिएटरमध्ये एक लॅब असिस्टंट म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मेहुण्याने मुंबईला बोलावले. 1936 मध्ये बॉम्बे टॉकीजचा चित्रपट ‘जीवन नैया’ साकारत असताना मुख्य अभिनेता आजारी पडला. यादरम्यान बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू रॉय यांची नजर अशोक कुमार यांच्यावर पडली. तेव्हा हिमांशू यांनी अशोककुमार यांना चित्रपटात काम करण्याची विनंती केली आणि अशा रितीने पहिला ब्रेक मिळाला.
बीग बी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण घ्या. गीतकार जावेद अख्तर यांनी अनेकदा यासंदर्भात म्हटलयं की “ अमिताभ बच्चन यांना पाहताच मी म्हटलो होतो की हा तरुण भविष्यातील सुपरस्टार आहे.” ही गोष्ट त्यांचे सहलेखक सलीम खान यांनीही मान्य केली आहे. तत्पूर्वी अमिताभ यांच्याविषयीचे भाकित त्यांना पहिला ब्रेक देणारे ख्वाजा अहमद अब्बास यांनी देखील केले होते. कारण त्यांनी ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटात अमिताभ यांना ब्रेक दिला होता, हा चित्रपट फारसा चालला नाही. तरीही लेखक आणि दिग्दर्शक अब्बास यांनी अमिताभ यांचा खर्जनीतील आवाज आणि व्यक्तिमत्त्व पाहता त्यांच्यातील ‘स्पार्क’ ओळखला होता. त्यानंतर लवकरच अमिताभ यांनी ‘जंजीर’ चित्रपटात अँग्री यंग मॅनची भूमिका साकारत अब्बास यांचे म्हणणे सार्थ ठरविले. जीवंत अभिनयाच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनी बॉलिवुडवर छाप पाडली. आज त्यांची ओळख बॉलिवुडचे महानायक म्हणून आहे.
हॉलिवुडमध्ये देखील उदाहरण
असाच किस्सा हॉलिवुडचे महान अभिनेते मार्लन ब्रँडो यांचा आहे. ब्रँडो यांना नाटक ‘ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’ (1947) मध्ये स्टॅनली कोव्हास्कीचे पात्र साकारताना प्रसिद्ध दिग्दर्शक एलिया कझान यांनी पाहिले. त्यांना ब्रँडो यांच्या अभिनयाची उंची कळाली. हा व्यक्ती हॉलिवुडचा स्टार होऊ शकतो, असे त्यांना वाटले. कझान यांनी तेच नाटक 1961 मध्ये चित्रपटाच्या रुपात आणले आणि त्यात मार्लन ब्रँडो यांना प्रमुख भूमिका दिली. पहिल्याच चित्रपटातच ब्रँडो यांनी अभिनयाची छाप पाडली आणि ती प्रेक्षकांना नैसर्गिक आणि वास्तववादी वाटली. नंतर ब्रांडो यांच्या अभिनयाने ‘द गॉडफादर’ अजरामर ठरला.
शाहरुख खानचा किस्सा
बॉलिवुडचा किंग शाहरुख खानसमवेत देखील असेच घडले. शाहरुख खानला पहिल्यांदा ब्रेक टिव्ही मालिका ‘फौजी’च्या रुपातून मिळाला. 1988 मध्ये प्रसारित झालेल्या मालिकेत शाहरुख खानने लेफ्टनंट अभिमन्यू रायची भूमिका केली होती. या पात्राने शाहरुख खानला जबरदस्त ओळख मिळाली. परंतु सुरुवातीला या भूमिकेसाठी शाहरुखची निवड झालेली नव्हती. शााहरुखला लेफ्टनंट अभिमन्यु रॉयची भूमिका देण्याचे ठरल्यानंतर दिग्दर्शक राजकुमार कपूर यांनी मालिेकतील पटकथेत बरेच बदल केले. मूळ मालिकेत शाहरुखची भूमिका अतिशय किरकोळ होती. पण चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी कपूर यांचा मूड बदलला आणि त्यांनी प्रमुख पात्र म्हणून शाहरुख खानला देण्याचे निश्चित केले. या मालिकेने शाहरुख खानला ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांच्याकडे टिव्ही मालिकांची रांग लागली. मात्र दोन मालिका करताच शाहरुख खान मुंबईला आले. शाहरुख खानचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ 1992 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जायेगे, ‘डर’सारख्या चित्रपटांनी सुपरडुपर कामगिरी केली.
खिलाडीकुमारचा फोटो पाहिला अन ब्रेक दिला
खिलाडीकुमार अक्षयकुमारचा बॉलिवुडमधील संघर्ष सर्वांनाच ठाऊक आहे. 1987 मध्ये ‘आज’ नावाच्या चित्रपटात अक्षयकुमारची भूमिका केवळ 17 सेकंदाची होती. कालांतराने हाच कलाकार बॉलिवुडचा बेताज बादशहा होईल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. ती भूमिका कराटे प्रशिक्षकाची होती. प्रारंभीच्या काळात मॉडेलिंगसाठी त्याने बरीच मेहनत घेतली. बंगळूरमध्ये रॅप वॉक करण्याची ऑफर मिळाली आणि त्यासाठी त्याला मुंबईहून सकाळी सहाची फ्लाइट पकडायची होती. परंतु ते विमान हुकले. हा मुक्काम त्याच्या पथ्यावर पडला. त्याने कामासाठी नटराज स्टुडिओत चक्कर मारण्यास सुरुवात केली. तेथे अक्षयकुमारची भेट प्रमोद चक्रवर्ती कंपनीचे मेकअप आर्टिस्ट नरेंद्र यांच्याशी झाली. नरेंद्र यांनी अक्षयकुमारचे फोटो निर्माते प्रमोद यांना दाखविले. प्रमोद यांना अक्षयचे फोटो एवढे आवडले की त्यांनी पुढचा चित्रपट ‘दीदार’मध्ये आघाडीच्या भूमिकेसाठी निवडले. त्याचवेळी त्यांनी पाच हजार हजाराचा धनादेश दिला.
कंगना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी
पहिल्याच नजरेत शोधल्या जाणार्‍या तारकांची मोठी यादी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची चित्रपटातील वाटचाल खुपच खडतर राहिली आहे. ते बॉलिवुडमध्ये संधी मिळावी यासाठी धडपडत असताना नुसता स्क्रिन टेस्ट घेण्यासाठी देखील कोणीही तयार होत नसत. मात्र एक दिवस अनुराग काश्यप यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. या चित्रपटाने नवाजुद्दीन यांना असामान्य अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे तत्पूर्वी आमीर खानच्या सरफरोश चित्रपटात नवाजुद्दीनची केवळ दोन मिनिटांची भूमिका आहे. पण ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटाने नवाजुद्दीन सिद्दीकींची दुनिया बदलली. अशीच नजर महेश भट्ट यांची कंगना राणावतवर पडली आणि त्यांनी कंगनाला ‘गँगस्टर’मध्ये भूमिका देत बॉलिवुडला नवा चेहरा मिळवून दिला. पहिल्याच चित्रपटात तिची अभिनय क्षमता पाहून प्रेक्षकांनी तिला सुपरस्टार मानले. त्यानंतर कंगनाने ‘क्विन’, ‘तनु वेड्स मनु’ मधील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशीच गोष्ट हॉलिवुडची मेरिल स्ट्रिपची आहे. शिवाय अलिकडच्या काळातील बॉलिवुडचा कलाकार राजकुमार राव याला देखील पहिल्याच नजरेत हंसल मेहताने ‘शाहिद’ चित्रपटासाठी निवडले आणि महत्त्वाची भूमिका दिली. या चित्रपटातून त्याने राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला. अभिनयक्षमता पाहून निर्मात्यांनी राजकुमार रावला अनेक चांगले चित्रपट दिले. आज तो अभिनयातील ‘राजकुमार’ म्हणून ओळखला जातो अगदी लिओनार्दोडिकेप्रियोप्रमाणे. लिओनार्दोचे सुरवातीचे चित्रपट ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ आणि ‘इनसेप्शन’ हे त्याच्या अभिनय कौशल्याची पावती देणारे ठरले.
एकंदरीतच बॉलिवुड असो किंवा हॉलिवुड दोन्ही ठिकाणी काही महानायक आणि महानायिका पहिल्याच नजरेत गवसल्या आहेत आणि त्यांनी आपल्या अभिनयातून ते सत्य अधोरेखित केले आहे.- सोनम परब

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *