लेख-समिक्षण

इस्त्रोच्या भरारीचा अन्वयार्थ

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन स्पेडेक्स मिशन ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही तर ते अंतराळातील भारताचे योगदान देखील दर्शवते. ही एक नवीन उपलब्धी आहे. या मिशनचे मुख्य कार्य दोन अंतराळ यानांना डॉक करणे (जोडणे) हे आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे कौशल्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. डॉकिंग तंत्रज्ञान ऊर्जा पर्यायांवर तसेच उच्च-तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालींवर आधारित आहे. केवळ सध्याच्या मोहिमांसाठीच महत्त्वाचे नाही, तर चंद्रावरून मातीचे नमुने परत आणण्याचे उद्दिष्ट असलेल्या चांद्रयान-4 सारख्या आगामी मोहिमांचा पायाही या मिशनच्या यशाने घातला जाईल.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने नुकतेच श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे आपली अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पाडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट ) लाँच केले आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील एका नव्या अध्यायाची सुुरवात झाली. इस्रोने आपल्या अंतराळ कार्यक्रमातील ‘माईलस्टोन’ असे म्हटले आहे. भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीवर आणि चंद्रावर जाणे, तेथे उतरणे, परत पृथ्वीवर पोहोचणे यांसह संपूर्ण चांद्रयान-4 मोहिमेचे यश यावर इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनच्या यशावर अवलंबून असेल, असे मानले जाते. याचे कारण चांद्रयान-4 मध्ये प्रत्यक्षात अनेक मॉड्यूल्स आहेत. ते दोन वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये एकत्रित केले जातील आणि वेगवेगळ्या वेळी लॉन्च केले जातील. यामध्ये पृथ्वीच्या कक्षेबरोबरच चंद्राच्या कक्षेतही डॉकिंग केले जाणार आहे. पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात दोन छोट्या यानांचे डॉकिंग करणे म्हणजेच जोडणे आणि अनडॉक करणे (वेगळे करणे) ही प्रक्रिया पूर्ण करणे हा इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश आहे.
वास्तविक, या मोहिमेत एकाच रॉकेटमध्ये उपग्रहाचे दोन भाग सोडण्यात आले आहेत. पण अवकाशात ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना एकमेकांच्या जवळ आणून जोडले जाणार आहे. चेसर आणि टार्गेट अशी या दोन उपग्रहांची नावे आहेत. या मिशनमध्ये, चेसर लक्ष्याचा पाठलाग करेल आणि त्याच्याशी डॉक करेल. टार्गेट आणि चेजरचा वेग ताशी 28 हजार 800 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. सुमारे 20 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरून चेजर स्पेसक्राफ्ट टार्गेट स्पेसक्राप्टच्या दिशेने जाईल. त्यानंतर हे अंतर कमी होऊन 5 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर दीड किलोमीटर आणि पुढे जाऊन 500 मीटर होईल. जेव्हा चेजर आणि टार्गेटच्या दरम्यानचे अंतर तीन मीटरवर येईल तेव्हा डॉकिंग म्हणजे दोन्ही स्पेसक्राफ्टच्या जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेजर आणि टार्गेट जोडल्या गेल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पृथ्वीवरून नियंत्रित केली जाणार आहे. अंतराळातील दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान आगामी काळात भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास साहाय्यभूत ठरणारे आहे. अशा प्रकारच्या स्वदेशी डॉकिंग प्रणालीद्वारे स्पेस डॉकिंग करणार्‍या देशांच्या निवडक गटामध्ये सामील होणारा भारत हा चौथा देश बनला आहे. सध्या या गटात अमेरिका, चीन आणि रशिया यांचा समावेश आहे. 16 मार्च 1966 रोजी अमेरिकेने प्रथम अंतराळात डॉकिंग केले होते. सोव्हिएत युनियनने 30 ऑक्टोबर 1967 रोजी पहिल्यांदा दोन स्पेसक्राफ्ट डॉकिंग केले होते.स्पेडेक्स मिशनसाठी प्रथमच वापरण्यात आलेल्या दोन्ही उपग्रहांची निर्मिती आणि एकत्रीकरण हे ‘एटीएल’ या खासगी उद्योगाकडून करण्यात आले आहे. बंगळूरमधील ‘एटीएल’च्या एअरोस्पेस पार्कमध्ये या उपग्रहांची निर्मिती आणि जुळवणी करण्यात आली आहे.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, उपग्रहांच्या डॉकिंगला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 7 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रयोगामुळे कक्षेतून बाहेर पडलेला आणि वेगळ्या दिशेने जाणारा उपग्रह पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञानही इस्रोला मिळणार आहे. त्याचबरोबर निर्धारीत कक्षेतच या उपग्रहांचे सर्व्हिसिंग आणि रिफ्युलिंग करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. भविष्यात उपग्रहांची दुरुस्ती, इंधन भरणे आणि अंतराळातील कचरा हटवण्यासाठीही ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे.
थोडक्यात, स्पॅडेक्स मिशन हे केवळ तांत्रिक दृष्ट्या मिळालेले यश नसून ते अंतराळ संशोधनातील भारताच्या वाढत्या प्रभावाची साक्ष देणारे आणि भविष्यातील नवी कवाडे उघडणारे आहे. दोन अंतराळ यानांना डॉक करण्याची किमया अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
डॉकिंग तंत्रज्ञान ऊर्जा पर्यायांवर तसेच उच्च-तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालींवर आधारित आहे. ते अंतराळात संवादाशिवाय कार्य करेल. हे केवळ सध्याच्या मोहिमांसाठीच महत्त्वाचे नाही, तर चंद्रावरून मातीचे नमुने परत आणण्याचे उद्दिष्ट असलेल्या चांद्रयान-4 सारख्या आगामी मोहिमांचा पायाही यामुळे घातला जाणार आहे. इस्रोने या डॉकिंग तंत्रज्ञानाला ‘इंडियन डॉकिंग सिस्टीम’ असे नाव दिले असून त्याचे पेटंटही घेतले आहे. ही मोहीम भारताच्या विज्ञान आणि नवकल्पनातील वाढत्या क्षमतेचे द्योतक असून ती भविष्यातील उपग्रह सेवा आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी महत्त्वाची ठरणारी आहे. भारतीय विज्ञान समुदायासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जागतिक स्तरावर भारतीय शास्रज्ञांची तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षमता सिद्ध करण्यास या मोहिमेने बळकटी मिळणार आहे. स्पेडेक्स मिशन हा भारताच्या अंतराळ धोरणातील एका नवीन अध्यायाचा ओनामा आहे. तो युवकांना खगोलशास्राकडे, अवकाश संशोधनाकडे आकर्षित करण्यास आणि नवीन वैज्ञानिक मानसिकतेला प्रोत्साहन देणारा आहे. सुप्रसिद्ध अंतराळवीरांणा सुनीता विल्यम्स यांनी ज्याप्रमाणे स्पेस क्रू लाइनरने पृथ्वीवरून निघून स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताला शिल्ड युनिट बनवायचे असून त्यासाठी डॉकिंगची गरज आहे.
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगाने इस्रोच्या शास्रज्ञांची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती. आता स्पाडेक्स मिशनमुळे अंतराळ संशोधकांनी नवी भरारी घेतली आहे. उपग्रह सेवा, अंतराळ स्थानक ऑपरेशन्स आणि आंतरग्रहीय शोध या क्षमता भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. अंतराळ संशोधनाच्या विकासाचे अर्थकारणही यानिमित्ताने समजून घ्यायला हवे. 2023 मध्ये 8.4 अब्ज मूल्य असलेली अंतराळ अर्थव्यवस्था 2033 पर्यंत 44 अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक 1000 कोटी रुपयांवर पोहोचली असून भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.
भारताचे अंतराळ क्षेत्र परकीय चलन कमावणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून कमावलेल्या 22 कोटी युरोंपैकी 18.7 कोटी युरो म्हणजेच‡एकूण 85 टक्के हे गेल्या आठ वर्षांत कमावले आहेत. आजघडीला इस्रोच्या सेवांचा लाभ घेणार्‍या देशांमध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान यांसारख्या प्रगत देशांसह अनेक विकसनशील देश समाविष्ट आहेत.
येणार्‍या काळात इस्रो अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात यशाची नवनवीन शिखरे गाठण्याची जोरदार तयारी करत आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये व्योममित्रा ही महिला रोबोट अवकाशात प्रस्थान करणार आहे. ती गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांसारखी कार्येहाती घेईल. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये गगनयान मिशनचे पहिले क्रू अंतराळात झेप घेतली. इस्रोच्या अंदाजानुसार 2035 मध्ये भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक प्रत्यक्षात आलेले असेल. भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षेपूर्ण होतील तेव्हा 2047 मध्ये भारताचा पहिला अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची महायोजनाही इस्रोच्या अजेंड्यावर आहे. तूर्त या महामोहिमेबाबत इस्रोच्या संशोधकांचे मनःपूर्वक अभिनंदन. -श्रीनिवास औंधकर, खगोलशास्र अभ्यासक

Check Also

एका पर्वाची अखेर

भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *