लेख-समिक्षण

अपार मेहनतीला पर्याय नाही

‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात आलो. स्थिरावलो. आजवरच्या प्रवासावरून मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की, एका रात्रीत हिरो होण्यासाठीसुद्धा कित्येक रात्री मेहनत घ्यावी लागते.- सिद्धार्थ जाधव, अभिनेता
———–
लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. शाळेत असताना मी वेगवेगळ्या नाटकांमध्ये भाग घ्यायचो. पहिली ते चौथी नगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो नंतर हायस्कूलमध्ये गेलो. नववीत असताना अभिनय साधना शिबिरात सहभागी झालो होतो. त्यामधून अभिनयाबद्दलचे काही धडे गिरवता आले; पण तरीही मला नट व्हायचं नव्हतं. मला पोलिस खात्यात जायचं होतं. गुन्हेगारांवर वचक ठेवणारा खाकी वर्दीतला पोलिस इन्स्पेक्टर व्हावं असं माझं लहानपणापासून माझं ते स्वप्न होतं. अभिनय मी केवळ छंद म्हणून करत होतो.
त्या काळात माझा भाऊ त्यावेळी बातमीदार म्हणून काही कव्हरेज करायचा. त्याने मला सांगितलं की, नाटकासाठी तू रुपालेल कॉलेजला प्रवेश घे. कारण त्या कॉलेजमध्ये बरीच नाटके होत असतात. कॉलेजमध्ये असताना देखील माझे स्टेज नाटक सुरूच होते. त्यानंतर मी ‘सुपरस्टार’ नावाचा एक रिअ‍ॅलिटी शो केला. या शोनंतर मला ‘तुमचा मुलगा करतो काय’ हे नाटक मिळाले. त्यामध्ये पॅडी म्हणजे पंढरीनाथ कांबळे माझ्यासोबत होता. पॅडीशी ओळख झाल्यानंतर माझी ओळख केदार शिंदे यांच्याशी झाली. त्यावेळी ते ‘लोच्या झाला रे’ हे नाटक करत होते. त्यामध्ये त्यांनी मला भूमिका साकारायला संधी दिली. सुदैवाने त्यावेळी ‘लोच्या झाला रे ’ हे नाटक चांगलेच लोकप्रिय झाले. या नाटकाच्या यशामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढायला मदत झाली.
पुढे केदार सरांनी ‘अग बाई अरेच्या’ हा चित्रपट करायला घेतला. या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती. असं असलं तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच माझा पहिला चित्रपट आहे. ‘लोच्या झाला रे’ या नाटकाने मला एक ओळख दिली, तर ‘अगं बाई अरेच्या’ने चित्रसृष्टीत पर्दापणाचा आनंद दिला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्वतःला पडद्यावर पाहताना झालेला आनंद खरोखरीच शब्दातीत होता. यामध्ये माझ्यावर फार कमी दृष्य चित्रित झाली असली तरीही आयुष्यातील पहिल्या चित्रपटाचा आनंद काही वेगळाच होता.
त्यापूर्वी दूरचित्रवाणीवर बर्‍याच मालिका केल्या होत्या. त्यामुळे कॅमेर्‍यासमोर उभं राहणं हे माझ्यासाठी नवं नक्कीच नव्हतं; पण तरीही मोठ्या पडद्याची गंमत काही वेगळीच असते. भूमिका लहान असल्यामुळे या चित्रपटात स्क्रीनवर येण्यासाठी आम्ही अक्षरश: धडपड करायचो. आजही ते दिवस मला आठवतात. मला आठवतंय, या चित्रपटातील ‘चमचम करता है’ या गाण्याची कोरियोग्राफी फराह खान यांनी केली होती आणि हे गाणं सोनाली बेंद्रेवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना प्रत्येक शॉट झाल्यानंतर आम्ही मॉनिटवर बघायला जायचो आणि गाण्यामध्ये कुठे जागा आहे ते शोधायचो. पुढच्या दृष्याच्या वेळी जिथे जागा असेल तिथे उभं राहून नाचायचो. माझ्याबरोबर त्यावेळी कमलाकर सातपुते होता. त्यावेळी या दृष्यामध्ये आपण दिसणं खूप महत्त्वाचं वाटत होतं आणि त्यासाठी हे सारी धडपड चालू होती.
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी एका दृष्यामध्ये कॅमेरा आमच्या वरील बाजूने जाणार होता. त्यामुळे संवाद म्हणताना मी त्यामध्ये दिसणार नव्हतो. साहजिकच, ही बाब मला लक्षात आली होती. पण तरीही मी दृष्यात दिसावं म्हणून कॅमेरा वरून सरकताना मी डोकं वर करून ‘आपण सॉलेड मजा करणार यार’ हा डायलॉग म्हटला होता. थोडक्यात काय, तर पहिल्याच चित्रपटात आपण पडद्यावर स्पष्ट दिसावं यासाठी ही सगळी धडपड होती. पहिला चित्रपट करतानाही एक गोष्ट डोक्यात पक्की होती ती म्हणजे भूमिकेची लांबी लहान असली तरी ती लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे. या दृष्टीकोनातूनच ही लहान भूमिका मी अतिशय आनंदाने आणि मजा घेत साकार केली. तेव्हापासूनच्या आजवरच्या प्रवासात मी अनेक चित्रपट केले; पण त्यावेळच्या भावना, ती मजा आजही मी विसरलेलो नाही आणि विसरणारही नाही.
माझी मोठी भूमिका असलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. ‘लोच्या झाला रे’ मुळे केदार सरांची आणि माझी चांगली ओळख झाली होती. डोंबिवली येथील एका कार्यक्रमात मला आणि भरत सरांना केदार सरांनी ‘जत्रा’ चित्रपटाचं कथानक सांगितलं. या चित्रपटात मला भरत सरांच्या मित्राची भूमिका साकारायची आहे, असं सांगितले. हे ऐकल्यानंतर साहजिकच मला खूप आनंद झाला. कारण एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आपण बरोबरीने भूमिका साकारणार याचं खूप अप्रूप वाटत होतं. या भूमिकेत मी सिद्धू नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारणार होतो. केदार सरांनी माझे मूळ नावच कायम ठेवण्याचं ठरवलं. कारण मला घरात, मित्र परिवारात सर्वजण सिद्धू म्हणूनच बोलवतात, ओळखतात. तेच नाव चित्रपटातही असणार हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. कारण बरेच कलाकार चित्रपटांमधील नावामुळे ओळखले जातात, असं मला वाटायचं. त्यामुळे चित्रपटात सिद्धू नावानेच वावरायचं आहे हे ऐकून मी खुश होतो. ‘जत्रा’ यशस्वी झाल्यामुळे मी सिद्धू याच नावाने प्रसिद्ध झालो. याच चित्रपटातल्या भूमिकेमुळे माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं.
‘जत्रा’च्या चित्रिकरणाच्या वेळी मी खूप मन लावून काम केलं. या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होतो. त्यावेळी मी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातही बराच बदल केला होता. केसही रंगवले होते. कारण हे करणं ही कथानकाची आणि व्यक्तिरेखेची गरज होती. या चित्रपटाच्या वेळी मी सर्वप्रथम डबींग केलं. त्यासाठी संपूर्ण एक महिना खर्ची घातला. नाटकांमध्ये आजवर काम करणार्‍या माझ्यासारख्या कलाकाराला डबिंगविषयी ऐकून माहिती होतं; परंतु प्रत्यक्षात स्वतःवर करण्याची वेळ आल्यावर त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव मला झाला. त्यावेळी माझा आवाज सारखा बसायचा. ‘आता बरा आहे मी’ असं एक वाक्य मला बोलायचं होतं; परंतु या संवादांसाठी जो टोन केदार सरांना अपेक्षित होता तो काही येत नव्हता. आवाज बसल्यामुळे प्रयत्न करूनही तो टोन आणणं मला कठीण जात होतं. प्रत्येक वेळी स्टुडिओत गेल्यानंतर केदार सर मला हे वाक्य म्हणायला लावत असत. माझा आवाज ऐकून पुन्हा घरी जा, असे सांगायचे. अशा बर्‍याच आठवणी आहेत.
या चित्रपटाचे पहिले दृष्यही माझ्यावरच चित्रीत करण्यात आले आहे आणि शेवटचे दृष्यही ! त्यामुळे माझ्या मनावर थोडंसं दडपण असायचं. पण प्रत्येक वेळी भरत सर मला मार्गदर्शन करत असतं. हा पंच असा घे, हे दृष्य अशा प्रकारे दे, हावभाव असे असले पाहिजेत वगैरे… त्यांच्या या मार्गदर्शनामुळे माझ्या मनावरचं दडपण अलगद दूर होत असे. आजही मी जो काही आहे, मी जे काही यश मिळवलं आहे त्यामागे माझे कुटुंब आणि मित्र तर आहेतच; पण त्यांच्या इतकाच केदार सर आणि भरत सर यांचा वाटा आहे.
यानंतर मी बरेच चित्रपट केले; पण जत्राचं महत्त्व कायमच राहील. त्यात मला लहान भूमिका मिळाली असली तरी ती लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. हाच दृष्टीकोन मी आजही बाळगून आहे. किंबहुना, चित्रपट स्वीकारताना मी काही निकष ठरवून घेतले. एक म्हणजे भूमिका लहान असो वा मोठी ती प्रेक्षकांच्या मनात रेेंगाळली पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यातून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन झाले पाहिजे, असा विचार मी आजही करतो. प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या; पण त्यांचं ओझं असं मला कधी वाटलं नाही.
किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात आलो. स्थिरावलो. पण अजून खूप प्रवास करायचा आहे. अभिनेता किंवा चित्रपटात हिरो होण्यासाठी आवश्यक कोणतीही शरीरसंपदा माझ्याजवळ नसताना रसिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम दिल्यामुळेच विनोदी भूमिकांबरोबरच वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. ‘आईचा घो’ चित्रपटातील भूमिका, ‘शिवाजी’मधील मी रंगवलेला खलनायक किंवा अ‍ॅक्शन, इमोशनचा भरपूर मालमसाला असलेल्या ‘हुप्पा हुय्या’तील मी साकारलेला हिरो, केदार शिंदेंच्या ‘हसा चकटफू’ या विनोदी मालिकेतील भूमिका, दे धक्का मधील अभिनय, माझा नवरा तुझी बायको, उलाढाल या चित्रपटातील भूमिका, ‘लालबाग परळ’ मधील स्पिडब्रेकरची भूमिका, सिटी ऑफ गोल्ड तसेच हिंदीतील गोलमाल, गोलमाल रिटर्न्स या चित्रपटातील भूमिका या सर्वांमध्ये मी भूमिकेचा रंग वेगळ ठेवण्याकडे लक्ष दिले. विनोदी भूमिकांमधील विनोदाचे विविध कंगोरे अधोरेखीत केले. ते प्रेक्षकांनाही भावले.
लहानपणी मी परिस्थितीचं गांभीर्य नसलेला मुलगा होतो. छोट्याशा घरात राहून अपेक्षा खूप होत्या. मला सायकल हवी होती, त्यासाठी मी जेवलो नव्हतो. तेव्हा माझे बाबाही तीन दिवस जेवले नव्हते. तेव्हा आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही वडिलांनी मला सायकल दिली होती. दादाच्या एमबीबीएस शिक्षणासाठी बाबांनी कर्ज काढलं होतं. मुलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ खूप काही शिकवून जाते.आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण शिवडीनं दिली. मला माणुसकी त्या चाळीनंच शिकवली. भूक लागल्यावर चाळीतल्या कोणत्याही घरी हक्कानं जेवून यायचो. हा अनुभवही मिळालाय.मी ज्या भागात लहानाचा मोठा झालो, तिथून ही ऊर्जा, उत्साह माझ्या अंगी भिनला आहे. मुंबईला शिवडी भागात राहत असताना शेजारधर्म, माणुसकी काय असते हे मी अनुभवलंय. एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, सुख-दु:खात सहभागी होणं, लग्नकार्यात मदतीचा हात देणं हे सगळं शिवडीत व्हायचं. अशा उत्साहपूर्ण वातावरणातून आल्यानं, ती ऊर्जा आजही टिकून आहे. खरं तर, ही ऊर्जा, उत्साह माझ्यात उपजतच आहे.. मला मोजूनमापून अजिबात वागता येत नाही. जे काही वागणं-बोलणं आहे, ते अगदी मनमोकळं आणि दिलखुलास. आयुष्याच्या प्रवासात हे दिलखुलास क्षण वेचतो आणि ते घेतच पुढं जातो. एकामागून एक काम करत गेलो आणि आरोग्याची हेळसांड झाली. तेव्हा माझा भाऊ लवेशने सांगितलं, ‘तू जेवढा फिट राहशील तेवढी जास्त कामं करू शकशील’. मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही. त्यामुळे माझं शरीर आतून स्वच्छ आहे.
अभिनय क्षेत्रात खूप अस्थिरतेच्या लाटांवरून प्रवास करावा लागतो असं म्हंटलं जातं मात्र; चित्रपट किंवा अभिनय क्षेत्रात केवळ टॅलेन्ट किंवा नशिब असून चालत नाही. तर अविरत काम करीत राहण्याचे पेशन्स लागतात हे नक्की. एका रात्रीत हिरो होण्यासाठीसुध्दा कित्येक रात्री मेहनत घ्यावी लागते. अभिनयातील बारकाव्यांचा अभ्यास करावा लागतो. हे सर्व करताना घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही ही वाटचाल यशस्वी करू शकत नाही, हेही तितकेच खरे.
(आदित्य फीचर्स)

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *