त्रासदायक, दुःखद, भयावह घटना लवकरात लवकर विसरून जाण्याची आणि सुखद घटना दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची नैसर्गिक शक्ती आपल्याला मिळाली आहे. अतोनात नुकसान करणार्या आणि दीर्घकालीन प्रभाव असणार्या गोष्टीही काळाच्या ओघात आपण विसरून जातो. कारण अशा घटन घडल्या म्हणून आयुष्य थांबत नसतं. त्या घटना विसरून नव्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. सुखद घटना आपल्याला त्यासाठी शक्ती देतात, म्हणून आपण त्या आपल्या स्मृतीत जपतो. परंतु त्रासदायक घटनांमधून काहीतरी शिकावं, हीसुद्धा आपली नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण शक्य तेवढी काळजी घेतो. जवळच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर वाहन जपून चालवतो. एखाद्याचा हृदयविकाराने अकाली मृत्यू झाला तर आरोग्याची काळजी घेतो, व्यायाम सुरू करतो. परंतु त्यात सातत्य राहत नाही, कारण दुःखद घटना लवकर विस्मृतीत जातात. 2020-21 मध्ये संपूर्ण जगाला बंदिस्त करून ठेवणारा कोविड विषाणू अवघ्या तीन वर्षांत आपण विसरून गेलो. जीवनक्रम सुरळीत होताच लॉकडाऊनमधील हालअपेष्टा विसरून गेलो. कोविडचा विषाणू चीनमधील एका प्रयोगशाळेतून ‘चुकून’ बाहेर पडल्याचं सांगितलं गेलं. परंतु त्यामुळे आपण सावध झालो का? त्यातून काही धडा घेतला का? ऑस्ट्रेलियातील ताज्या घटनेवरून तरी तसं वाटत नाही. तिथल्या एका प्रयोगशाळेतून कोविडपेक्षाही भयानक असे तब्बल 223 विषाणूंचे नमुने चक्क ‘बेपत्ता’ झालेत.
उघड्या डोळ्यांनी न दिसणारे हे विषाणू बेपत्ता होणं प्रसंगी किती धोकादायक ठरू शकतं, याचा अंदाज आपण कोविडच्या जागतिक साथीवरून बांधू शकतो. क्विन्सलँडच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतून हे नमुने गायब झाल्याची घोषणा स्थानिक सरकारने केली आणि जगभरात भीतीची लाट उसळली. अर्थात, लाटा उसळण्याच्या आणि लगेच विरून जाण्याच्या सध्याच्या काळात या भीतीची तीव्रता तूर्त तरी फारशी दिसत नाही. तरीसुद्धा, ‘बायोसिक्युरिटी’ प्रणाली असताना हे विषाणू गायब कसे झाले? मुळात ते गायब झाले की केले गेले? हे कृत्य कुणी मुद्दाम केलं असल्यास त्यामागील हेतू काय? हे विषाणू चुकीच्या व्यक्तींच्या हातात तर पडणार नाहीत ना? प्रयोगशाळेतून बाहेर काढल्यानंतर संबंधिताने हे विषाणू कुठे ठेवले असतील? आपल्या आसपास तर ते नसतील ना? असे अनेक प्रश्न जगाच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करणार्यांना पडलेत. ‘हेन्ड्रा’, ‘हेंटा’ आणि ‘लिसा’ या आत्यंतिक खतरनाक विषाणूंचा यात समावेश आहे. ‘हेन्ड्रा’ विषाणूमुळे एन्फ्लुएन्झाचा धोका असतो. यामुळे स्ट्रोक, हृदयविकार आणि माणूस कोमात जाण्याची भीती आहे. डोळ्यांच्या स्नायूंवर परिणाम होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.
‘लिसा’ विषाणू पिसाळलेल्या जनावरांमुळे पसरतो आणि त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर आघात होऊ शकतो. ‘हेंटा’ विषाणूचा फैलाव उंदरांमार्फत होतो आणि त्यामुळे अनेक घातक आजार होऊ शकतात. ‘बायोसिक्युरिटी प्रोटोकॉलचे अक्षम्य उल्लंघन’ म्हणून या घटनेकडं पाहिलं जातंय. हा धोका कुणी चोरला तर नसेल? असल्यास कशासाठी? हा अदृश्य धोका सध्या कुठल्या देशात असेल? आपल्या जवळपास तर नसेल? हे प्रश्न मेंदू कुरतडणारे आहेत. या घटनेचा छडा तातडीने लावला नाही, तर निर्माण होणार्या परिस्थितीची कल्पनाही करता येणार नाही.
Check Also
खेळू नका!
खेळू नका,’ असा हुकूम प्रत्येक पालकाने आपल्या अपत्याला कधी ना कधी सोडलेला असतोच. बर्याचदा यामागे …