हॉटेलात मिळतात तसे खमंग पदार्थ घरच्या किचनमध्ये शिजावेत असं वाटणं आणि ‘घरच्यासारखं जेवण’ मिळणारं हॉटेल शोधत फिरणं, ही विसंगती मजेशीरच नव्हे तर प्रातिनिधिक आहे. याच विसंगतीने माणसाला यंत्र आणि यंत्राला माणूस बनवलं. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्रासारखा आवाज काढून बोलणार्या रोबोंचा जमाना मागे पडला आणि हुबेहूब माणसासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे ‘एआय ह्यूमनॉइड्स’ आपल्या दिमतीला हजर झाले. माणसाचं काम हलकं करण्यार्या नवयुगाचा बिगूल वाजला; पण माणसानं आठवड्यात 48 तासांऐवजी 72 तास काम करावं, अशी ‘वाढीव अपेक्षा’ही कानावर पडली. ही विसंगती समजण्याइतके आपण शहाणे होण्यापूर्वीच यंत्रमानव आपल्यापेक्षा शहाणा झालेला असेल, हीच भीती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्मात्यासह अनेकांनी व्यक्त केली होती. नवतंत्रज्ञान स्वागतार्हच; पण ती नवअंधश्रद्धा ठरू नये, यासाठी त्याचा ‘वापर’ महत्त्वाचा ठरतो. आजवरच्या इतिहासाकडे एकवेळ डोळेझाक करता येईल; पण भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवताना वर्तमानातल्या दोन प्रातिनिधिक घटनांची दखल घ्यावीच लागेल. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने मिळवलेला दणदणीत विजय ऐतिहासिक आहेच; पण या निवडणुकीत आणखी एक ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे, ब्राइटन पॅव्हेलियन मतदारसंघातून चक्क एका एआय उमेदवाराने निवडणूक लढवली. पारंपरिक राजकारणाचा उबग आलेल्या स्टीव्ह एन्डाकॉट नावाच्या उद्योगपतीने आपला ‘एआय अवतार’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. असो, तिकडच्याही राजकारणात तोचतोपणा आहे, हेही या निमित्ताने समजलं.
वास्तविक, एआय उमेदवार विजयी झाला तर खुद्द स्टीव्ह एन्डाकॉटच संसदसदस्य म्हणून पद स्वीकारतील, असं निवडणूक अधिकार्यांनी आधीच जाहीर केलं होतं. पण प्रश्न ‘राज्यकर्ता’ निवडण्याचा होता आणि ‘इडा पिडा टळो, रोबोचं राज्य येवो,’ असं म्हणण्याची हिंमत कोण करेल? कॉन्झर्व्हेटिव्ह आणि मजूर दोन्ही पारंपरिक पक्षांना नाकारून या प्रांतातल्या जनता जनार्दनाने ग्रीन पार्टीच्या सियान बेरी यांच्या पदरात सत्तर टक्के मतं टाकली; पण एआय उमेदवाराकडे ढुंकून बघितलं नाही. बिचार्या कृत्रिम बुद्धिमत्तेला अवघी 179 म्हणजे 0.3 टक्के मतं मिळाली. स्थानिक मुद्दे आणि नवकल्पना अशा 10 हजार विषयांवर मतदारांशी भाष्य करू शकणारा ‘एआय स्टीव्ह’ शून्यावर बाद होऊन ‘पॅव्हेलियन’मध्ये परतला. दुसरीकडे, दक्षिण कोरियात एका रोबोने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी जगभर वार्यासारखी पसरली. निर्जीवाने जीव दिल्याची ही जगातली पहिली घटना. खुमी शहराच्या नगरपालिकेत ‘कर्मचारी’ म्हणून नेमलेल्या या रोबोचं नाव ‘सायबोर्ग’ होतं. होय… ‘होतं’! कारण रोबो चिरंजीव नाही, हे त्यानं दाखवून दिलंय. कार्यालयाच्या पायर्यावरच तो ‘मृतावस्थेत’ सापडला. वर्षभर सेवा करून त्याने स्वतःला ‘डिस्मेन्टल’ केलं.
या रोबोच्या कथित आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी त्याची अमेरिकन निर्माती कंपनी आता त्याचं ‘शवविच्छेदन’ करणार आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार, कामाचा ताण असह्य झाल्यामुळं या रोबोने स्वतःला संपवलं. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, त्याने स्वतःला जिन्यावरून खाली झोकून दिलं. कदाचित, हा अपघातही असू शकेल; पण खरंच जर त्याने कामाच्या ताणामुळं आत्महत्या केली असेल, तर यंत्र कधीच थकत नाही, या मान्यतेला तडा जाईल. यंत्राने यंत्रासारखं काम करणं अपेक्षित आहेच; पण त्याआधी माणसाने माणूस व्हायला हवं.
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …