‘चंदू चॅम्पियन’ या कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटाच्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर यांचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील पेटकर यांचा जीवनप्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी घालणारा हिरो हा त्यांच्यासाठी कसा खरोखरचा हिरो ठरतो, हे पाहून प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होतात.
भाग मिल्खा भाग, 1983, मेरी कोंम, सुलतान, मैदान आणि आता चंदू चॅम्पियन या आणि यांसारख्या दर्जेदार आणि अर्थपूर्ण चित्रपटानी खेळाला, क्रीडा क्षेत्राला आणि उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्याचे जरुरी काम केले आहे, हे मान्य करावेच लागेल. एका ग्रामीण भागातून आलेला आणि असंख्य अडचणींचा अन् अडथळ्यांचा डोंगर पार करत, पुढील आयुष्यात भारतीय सैन्य दलात कामगिरीवर असताना झालेला शत्रू राष्ट्राकडून हल्ला आणि अपघात, आजारपण, निराशा झेलत तर कधी नैराश्यामुळे आयुष्य संपवण्याचा असफल प्रयत्न करणारा, संकटात संधी शोधत मार्गक्रमण केलेल्या मुरलीकांत पेटकर यांचा प्रवास नक्कीच सोपा, सरळ नव्हता. भारतीय सैन्यामधून बॉक्सरपासून सुरू झालेला मुरलीकांत यांचा प्रवास शत्रू राष्ट्राने भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ला केल्यावर आणि त्यात ते गंभीर जखमी होऊन तब्बल दोन वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्यावर अर्थात अपंगत्व आल्यावर हा प्रवास कसा बदलतो, मरणासन्न आयुष्य वाट्याला आल्याने त्यांच्या मनाची होणारी घालमेल, त्यानंतर प्रशिक्षक आली यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत देशाला पहिलं गोल्ड मेडल कसं प्राप्त करून देतात, याचा जितका धगधगता तितकाच प्रेरणादायी इतिहास मांडण्यात ‘चंदू चॅम्पियन’चे लेखक, दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. दिग्दर्शनातील, सादरीकरणातील काही गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्याला भाग पाडतो. देश प्रेमाचे स्फुलिंग मनामनात चेतवणारा चंदू चॅम्पियन म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात घर करतो, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.
महाराष्ट्रमधील सांगली- इस्लामपूर सारख्या ग्रामीण भागातून एका सर्वसामान्य कुटुंबातील स्वप्नाळू मुलगा ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेऊन भारताला गोल्ड मेडल मिळून देण्याचं स्वप्न पाहतो काय आणि त्या दिशेने प्रवास सुरू ठेवतो काय आणि शेवटी उत्कंठावर्धक, साहसी प्रवासानंतर आपले लक्ष्य साध्य करतो काय, हे सारंच नाट्यपूर्ण आणि खरंतर अविश्वसनीय आहे, हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.
‘चंदू चॅम्पियन’ हा कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित सिनेमा आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मांडणी केलेला हा त्यांचा जीवन प्रवास कधी डोळ्यांचे पारणे फेडतो, तर कधी श्वास रोखून धरायला लावतो, कधी मुरलीकांत पेटकर यांच्या यशामध्ये प्रेक्षकांनाही सहभागी करायला लावतो तर कधी चित्रपटाच्या शेवटी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आणि स्वतःची लढाई स्वतः लढून अशक्यप्राय विक्रमाला गवसणी घालणारा हिरो हा त्यांच्यासाठी कसा खरोखरचा हिरो ठरतो, हे पाहून प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होतात, भावनिक होतात. मुरलीकांत यांचा जीवन संघर्ष पाहून एकाच वेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांतून हसू आणि आसू दोन्ही निघतात. ज्या वयात शिक्षण घेऊन पुढील करीयर करण्याचे वय असते, त्याच वयात मुरलीकांत हे कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचे ध्येय बाळगतात. शिक्षणात यथातथा असणारा हा मुलगा चुणचुणीतही असतो. मात्र, त्याच्या कुस्ती खेळन्याच्या वेडाला त्याच्या वडिलांचा तीव्र विरोध असतो. पण या विरोधाला न जुमानता तो कुस्तीत सहभागी होतो. त्याच असं होतं की, एकेदिवशी गावातील स्थानिक कुस्ती स्पर्धेत तो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने बलवान असलेल्या पैलवान याचेशी त्याच्या वस्ताद याच्या सांगण्यावरून भिडतो आणि त्याला धोबीपछाड करतो. मात्र, गावातील प्रतिस्पर्धी संघ त्यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप करत विनाकारण मुरलीकांत आणि त्याच्या गटातील कुस्तीपटूंच्या हात धुऊन मागे लागतात आणि मुरलीकांत जीव मुठीत घेऊन डोंगर दर्यातून, नदीतून धावत सुटतो.
नंतर तो एका धावत्या रेल्वेमध्ये चढतो पुढे एका समवयस्क मित्राच्या मदतीने आणि साथीने सैन्यात भरती होण्यात यशस्वी देखील होतो. तेथील अवघड असे प्रशिक्षण पूर्ण करतो. त्यांना ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारतीय संघाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचे असते. त्यासाठी तो ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचं आपले स्वप्न सैन्यातील काही सहकारी यांना बोलून दाखवतो.
मात्र काही गैरसमजातून एक सहकारी आणि त्याच्यामध्ये वादावादी होते. यामध्ये तेथील वरिष्ठ अधिकारी सर्वप्रथम मुरलीकांत यांना सैन्य दल सोडून तिथून बाहेर जाण्यास सांगतात, मात्र मुरलीकांत आपलं मिलिटरी मध्ये भरती होण्यामागे खरं काय ध्येय आहे ते त्यांना स्पष्ट करत देशसेवा करण्यावर ठाम राहतो. जीवनात येऊन काहीतरी ठोस मिळवण्याची, करण्याची धग आणि जिद्द जागी असल्याचे पाहून सैन्य दलातील एक वरिष्ठ अधिकारी मग त्यांना बॉक्सिंगचे ट्रेनिंग घेण्यास सांगतात. मुरलीकांत हे तेथील बॉक्सिंग प्रशिक्षक अली यांचं मन जिंकून घेतात. पुढे आपल्या जिगरबाज खेळाने मुरलीधर लक्षवेधक कामगिरी करतात. टोकियो येथे आयोजित गेम मध्ये सहभागी होण्याची त्यांना संधी मिळते. या संधीचे सोनं करण्याचा ते प्रयत्न करतात. पहिल्या फेरीत काही खेळाडूंना पराभूत करून ते पुढची फेरी गाठतात. पण मोक्याच्या क्षणी मात्र मातब्बर खेळाडूकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो. त्यांच्या पराभवामुळे त्यांचे प्रशिक्षक आली हे देखील नाराज होतात. त्यानंतर 1965 रोजी शत्रू राष्ट्र भारताच्या काश्मीर येथील एका मिलिटरी कॅम्पवर अचानक हल्ला करतो. या हल्ल्यात मुरलीकांत यांना नऊ बंदुकीच्या गोळ्या लागतात आणि ते अधू होतात, विकलांग होतात. तेथून त्यांचे विश्व बदलते. त्यांच्या कुटुंबाचा अपेक्षित पाठिंबा त्यांना न मिळाल्यामुळे आणि गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न भंग पावल्यामुळे पराभूत मानसिकता घेऊन ते जगू लागतात. यातून एके दिवशी ते आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. मात्र एके दिवशी त्यांचे प्रशिक्षक अली त्याला भेटतात आणि त्याच्या मनात पुन्हा नव्या ध्येयाने जीवन जगण्याची इच्छाशक्ती निर्माण करतात आणि ते विकलांग असले तरी ते पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवू शकतात, या बदल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात.
महत्तप्रयासाने मुरलीकांत पेटकर यांना भारताकडून पॅरा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते. मात्र म्युनिख येथे गेल्यावर तिथे आयोजित केलेली ही स्पर्धा दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द केली जाते. ही स्पर्धा पुढे जर्मनीत इतर ठिकाणी आयोजित केली जाते. या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर आपल्या जीवाची बाजी लावतात, प्रयत्नाची शर्थ करतात आणि आपले ध्येय, आपले स्वप्न पूर्ण करतात, ते स्वप्न असते भारताला ऑलम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून द्यायचे, स्पर्धा ऑलिंपिकची असते, फक्त मुरलीकांत यांच्या विकलांगपणामुळे भारताला पहिलं गोल्ड मेडल पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत ते मिळवून देतात. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा, विस्मयकारी आणि रोमांचकही आहे. मुळात केवळ आपल्या गावाच्या पायाभूत विकासासाठी अर्जुन पुरस्काराची अपेक्षा करणारे मुरलीकांत पेटकर यांचे प्रकाश झोतात न आलेले जीवन कार्य प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होते. त्याची दखल शासनाला घ्यावी लागते. राज्यकर्तेत्यांच्याकडे येऊन त्यांना पद्मशी पदक बहाल करण्याची घोषणा करतात.
एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा संधी मिळाल्यावर आपल्या परिस्थितीवर कशी मात करतो, अनंत अडचणीवर मात करून विजुगिषू कसा खेचून आणतो, वडिलांचा विरोध असूनही आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून तो कशी वाटचाल करतो, विकलांगपणामुळे आत्मविश्वास गमावलेला तरुण योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर विजयाला पुन्हा कशी गवसणी घालतो, त्यासाठी किती जीतोड मेहनत करतो, लौकिक अर्थाने सर्व काही गमावूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे तो कशी झेप घेतो, आपल्या गावाच्या विकासासाठी कसा झटतो, कसा योगदान देतो, चंदू चॅम्पियन ही त्यांची कथा आहे, म्हटलं तर वंडर बॉयची.
या चित्रपटात पोलीसाची भूमिका शेयस तळपदे यांनी, पत्रकाराची भूमिका सोनाली कुलकर्णी आणि पत्रकार नयन ताराची भूमिका भाग्यशी बोरसे यांनी तर मुरलीकांत यांच्या आईची भूमिका अभिनेत्री हेमांगी कवी यांनी चांगली वठवली आहे. एकंदरीत मराठमोळ्या कलाकारांची यात फौजच आहे.
याशिवाय राजपाल यादव यांची भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. मुरलीधर यांचे प्रशिक्षक अली टायगर यांची भूमिका विजय राज यांनी बखुबीने निभावली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेत अक्षरशः जान ओतली आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सकस अभिनय आणि ताकतीने त्या त्या भूमिका निभावल्याने कथेतील पात्र जिवंत असल्याचा भास होतो. – एम. जी. गावडे , ज्येष्ठ पत्रकार