विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरिब होते. घरात वीज नव्हती, शौचालय नव्हते आणि जगण्यासाठी शेती हाच एकमेव आधार होता. विल्यम लहानपणापासूनच जिज्ञासू होता, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले. २००१ साली मलावीत भीषण दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा झाला, हजारो लोक उपाशी राहू लागले. कमक्वांबा यांच्या कुटुंबालाही दिवसाचा एक वेळ खाणं मिळणंही कठीण झालं. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी शाळेची फी भरता न आल्याने त्याला शाळा सोडावी लागली. मात्र शिक्षणाची ओढ त्याने कधीच सोडली नाही. त्याने गावातली एक छोटी लायब्ररी गाठली आणि विज्ञान विषयाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली.
त्याला ‘ युजिंग एनर्जी’ हे पुस्तक सापडलं आणि त्यातून त्याने वार्याच्या शक्तीचा उपयोग करून वीज निर्माण करण्याची कल्पना आत्मसात केली. घरात कोणतीही सोय नसताना त्याने गंजलेल्या सायकलचे भाग, ट्रॅटरचे तुटलेले पंखे, स्क्रॅप लोखंड आणि लाकडाच्या फळ्या गोळा केल्या. शाळेत न गेलेल्या या मुलाने स्वतःच्या कल्पकतेने, कोणतीही औपचारिक मदत न घेता, एक विंडमिल उभारली जी त्याच्या घराला वीज देऊ लागली. वार्याच्या शक्तीवर चालणारी ही मशीन त्याने फक्त पुस्तकं वाचून आणि आपल्या निरीक्षणातून तयार केली होती. नंतर त्याने पाण्याचा पंपही तयार केला, ज्यामुळे गावातल्या लोकांना सिंचनासाठी पाणी मिळू लागलं. यामुळे केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे तर आसपासच्या गावकर्यांनाही फायदा झाला. त्याच्या या क्रांतिकारी कामाची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचली. त्याला टेलीटॉक्समध्ये बोलण्यासाठी आमंत्रण मिळालं.
२००७ मध्ये त्याचे पहिले भाषण झाले, जिथे त्याचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते, पण त्याच्या यशकथेनं संपूर्ण जगाला थक्क केलं. त्याला अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो पुन्हा आपल्या देशात परतला आणि इतर तरुणांनाही विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेसाठी प्रेरित करू लागला. त्याच्या जीवनावर आधारित ‘ द बॉय हू हारनेसड् द विंड’ हे पुस्तक जगभर प्रसिद्ध झालं आणि २०१९ मध्ये त्याच नावाने नेटफ्लिसवर चित्रपटही प्रदर्शित झाला.
आज विल्यम कमक्वांबा हा एक यशस्वी अभियंता, संशोधक आणि जागतिक प्रेरणास्रोत म्हणून ओळखला जातो. त्याने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, आत्मविश्वास आणि कल्पकतेच्या जोरावर कोणताही तरुण जग बदलू शकतो.
विद्येशिवाय वीज निर्माण करणारा विल्यम कमक्वांबा हा मुलगा आज हजारो गरिबांच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीपस्तंभ ठरला हे खरे नाही काय?
Check Also
क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात
आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक …