लेख-समिक्षण

दिल्लीत काँग्रेसविरुद्ध इंडिया आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीची परीक्षा घेत आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतून काँग्रेस आता जवळपास बाहेर काढल्या गेली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढाई सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी (आप)ला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी समर्थन जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेसनेदेखील नुकतेच ‘आप’ला समर्थन दिले असून केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींचे आभार मानले आहेत.
हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशावर बोट ठेवत दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी दुभंगल्याचे दिसत आहे. दिल्लीत त्रिशंकू निवडणूक होत असून, आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसला झटका दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. बुधवारी यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींचे आभार मानले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. मी वैयक्तिकरित्या ममता दीदींचा आभारी आहे. धन्यवाद दीदी, तुम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला पाठिंबा दिला आहे. केजरीवालांच्या ट्विटनंतर तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे ते म्हणाले.
हरयाणात काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोबत घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर दिल्लीतही इंडिया आघाडी दुभंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे इंडिया आघाडीचे घटक आहेत. पण, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर इंडिया आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसने अदानीचा मुद्दा लावून धरला होता. त्यावरून संसदेत आणि संसदेच्या बाहेर प्रचंड गोंधळ आणि निदर्शने करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण धक्काबुक्कीवरही गेले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या 2 खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला. तसेच त्यांच्या विरोधात पोलिस तक्रारही दाखल झाली. देशाच्या विविध राज्यातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि अदानींचा मुद्दा बाजुला ठेवावा असे इंडिया आघाडीतील अनेक पक्षांना वाटत होते. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडली होती. अधिवेशन आटोपल्यानंतरही काँग्रेसचा विजनवास संपलेला नाही. इंडिया आघाडीतील शिवसेना (उबाठा) तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला समर्थन जाहीर केले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांवर काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि भाजपा अशी तिरंगी लढत आहे. दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Check Also

इस्त्रोच्या भरारीचा अन्वयार्थ

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन स्पेडेक्स मिशन ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही तर ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *