आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसायला भाग पाडणारा अभेनेता अंशुमन विचारे यानं अचूक पंच काढत कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमधून चाहत्यांना रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळवून देणार्या अंशुमन विचारेला मनोरंजन विश्वात कोणताही गॉडफादर नव्हता. साहजिकच, या क्षेत्रात त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. आता वेगवेगळ्या विनोदी नाटकांमधून सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार्या अंशुमनने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पहिल्या कामाचा किस्सा सांगितला.
आपल्या प्रत्येकाला लहानपणी आपण अॅक्टर व्हावं असं वाटत असतं. चाळीत राहणार्यांकडे तर दर तिसच्या घरात एक अॅक्टर असतो. मी तर कोकणस्थ आहे. त्यामुळे मी तर पहिल्यापासूनच अॅक्टर आहे. आपल्या आईवडिलांशी आपण कसं बोलतो इथपासूनच अॅक्टींग येते ना.. पण मला सुरुवातीला आपण हॉटेल मॅनेजमेंट करावं असं फार मनात होतं, असं अंशुमन म्हणाला. पण या कोर्सची फीस न परवडल्यानं ग्रॅज्युएशनच्या दरम्यान नाटक एकांकीकांकडे वळल्याचं तो सांगतो.
आपण जेंव्हा क्षेत्रात नवे असतो. आपल्यामागे कोणताही गॉडफादर नसतो तेंव्हा काम कसं मिळवायचं हा मोठा स्ट्रगल असतो. मग याच्याकडे भीक माग, त्याच्याकडे भीक माग हे होतं. सोबत या क्षेत्रात येऊ इच्छिणारे हा आपल्याला चान्स देईल असं म्हणले म्हणून एकाकडे गेलो. तो ही म्हणला चान्स देतो. मी सध्या शाहरुखसोबत काम करतोय वगैरे बर्याच थापा त्यानं मारल्या..मग म्हणाला काम मिळवायचं असेल तर पैसे भरावे लागतील. मग मी त्याचा नाद सोडला आणि एकांकिका स्पर्धा..याला भेट त्याला भेट असं करत करत पहिला रोल मिळाला तो एका नाटकात. तोही दगडाचा! दगडाचा रोलही भीक मागूनच मिळाला. पण कामासाठी मी चिकटा असल्याचं अंशुमन म्हणतो. मन लावून काम केलं आणि दगडाच्या रोलसाठी उत्तेजनार्थही मिळालं.
एकांकिका, नाटक, सिनेमा, गाणं अशा सगळ्याच कामात कामानं स्वत:ला सिद्ध केलेल्या अंशुमनची चमक फु बाई फु या विनोदी शोनं घराघरात पोहोचवली. रात्री टीव्हीवर लागणार्या या कार्यक्रमातून अंशूमन घरोघरी पोहोचला. वरात आली घरात, भरत आला परत अशा अनेक सिनेमांमधूनही अंशूमननं त्याच्या कामाची छाप सोडली. एका कामातून दुसरं काम शोधत आता विनोदी विश्वात आघाडीचा नट म्हणून तो ओळखला जातो.- प्रियांका जाधव
Check Also
छप्परफाड कमाई
‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स …