कोणत्याही कार्यामागील, कर्मामागील कार्यकारणभाव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये वैयक्तिक हिताचा उद्देश असेल तर त्याला स्वार्थ म्हणतात आणि लोककल्याणाचा उद्देश असेल तर त्याला परोपकार म्हणतात. बहुतेकांचा जीवनातील जास्तीत जास्त काळ हा स्वार्थासाठीच व्यतीत होतो. त्यातून आनंद मिळत असेलही; पण त्यापेक्षाही आंतरीक आनंद हा परोपकारातून मिळतो. स्वामी विवेकानंदांची ही कहाणी यासाठी उद्बोधक आहे.
एकदा स्वामी विवेकानंद प्रवासात अलवरला पोहोचले. अल्वरचे महाराज स्वामीजींच्या ज्ञानाने आणि व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाले. ते विवेकानंदांना म्हणाले, ’स्वामीजी, तुम्ही मोठे विद्वान आहात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकाच ठिकाणी राहून पैसे कमवू शकता आणि शक्य तितक्या चांगल्या मार्गाने तुमचा उदरनिर्वाह करू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता. मग हिंडून, फिरुन भिक्षा मागून का जगता?
महाजारांचे बोलणे ऐकून स्वामीजी म्हणाले, ’मी तुम्हाला उत्तर देण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही राजे आहात. आपल्या प्रजाजनांची योग्य काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे सरकारी काम सोडून इंग्रज अधिकार्यांसोबत शिकारीत का व्यस्त राहता? स्वामीजींचा प्रामाणिक आणि कटू प्रश्न ऐकून तेथे उपस्थित दरबारींना आता महाराज संतापतील अशी भिती वाटू लागली. पण महाराज हसले आणि म्हणाले, ’स्वामीजी, मला शिकार करायला आवडते. म्हणूनच मी त्यात व्यग्र राहतो.
स्वामी विवेकानंद म्हणाले, ’तुम्हाला जशी शिकार करायला आवडते, तशाच प्रकारे मला भिक्षा मागून जगायला आवडते. पण आपल्या दोघांच्या आनंदी वाटण्यात खूप फरक आहे.
हे ऐकून महाराज थक्क झाले आणि म्हणाले, ’स्वामीजी, फरक? तो कसला? स्वामीजी म्हणाले, ’तुझे आनंदी वाटणे निरुद्देश आहे; पण माझ्या आनंदी वाटण्यामागे एक अर्थपूर्ण हेतू आहे. समस्त नागरिकांनी एकमेकांवर प्रेम करावे, सर्व शिक्षित आणि समान असावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी ही भ्रमंती करत असतो. हे ऐकून अलवरच्या महाराजांनी स्वामी विवेकानंदांचे पाय धरले आणि म्हणाले, ’आज तुम्ही माझे डोळे उघडले.’
प्रत्येक व्यक्तिच्या आवडीमागील उद्देश्यावरुनच अर्थपूर्ण हेतू स्पष्ट होतो हे खरे नाही काय?
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …