पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी टीका मोदी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, नेहरू ते आत्ताच्या काँग्रेस नेतृत्वापर्यंत सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला. काँग्रेसने निवडणुकीमध्ये डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करून त्यांचे राजकारण संपवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी पूजनीय आहेत. त्यांच्या पंचतीर्थांचे दर्शन घेऊन मी नतमस्तक झालो. या ठिकाणी काँग्रेस नेते गेले होते का? काँग्रेसने जाती-जातींमध्ये फूट पाडली. मागासवर्गीय जातींची एकजूट होऊ दिली नाही. अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींमध्ये भांडणे लावून स्वत:चा राजकीय फायदा करून घेतला. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत असताना कर्नाटकातील मद्यविक्रेत्यांकडून 700 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक ही तीन राज्ये गांधी कुटुंबीयांचे एटीएम आहेत,’ असा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेसचे घोषणापत्र नव्हे, तर घोटाळापत्र आहे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने शेतकर्यांचे हीत जपले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत दीड कोटी शेतकर्यांना फायदा झाला, असे मोदी म्हणाले. ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, गांधी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या तरी अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. महाविकास आघाडी म्हणजे विनाश, आणि महायुती म्हणजे विकास हे स्पष्ट झाले असल्याने महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी सांगितले की, याच महाविकास आघाडीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केला, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विरोध केला, 370 कलम रद्द करण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध केला. वक्फ कायद्याच्या मनमानीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथील परिस्थिती देश अनुभवत असून गावेच्या गावे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. शेकडो वर्षे जुनी मंदिरे, शेतकर्यांच्या शेतजमिनी आणि लोकांची राहती घरे देखील बघता-बघता वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत. आता महाआघाडीवाले वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयासही विरोध करत आहेत, त्यामुळे सावध रहा आणि काँग्रेस व आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. विनाश करणार्यांच्या हाती राज्याची सत्ता द्यायची की विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीकडे सत्ता द्यायची याचा निर्णय मतदारांनी करावयाचा आहे, असे ते म्हणाले.
भाजप सरकार दिलेली आश्वासने कधीच पाळत नाही : मल्लिकार्जुन खर्गे
लातूर व अक्कलकोट येथील सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नाही. नरेंद्र मोदी कृषी मालावर जीएसटी लावून शेतकर्यांची लूट करत आहेत, पण सोयाबीन, कापसाच्या एमएसपीमध्ये वाढ करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला 6000 रुपये प्रतिक्विंटल एमएसपी देऊ, असे सांगितले होते मात्र ते दिले नाही. भाजप सरकार दिलेली आश्वासने कधीच पाळत नाही. देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते बटेंगे-कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा आरएसएसमधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही परंतु देशाच्या एकता व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान मनुस्मृतीच्या तत्वावर आधारीत नाही म्हणून भाजपा आरएसएसने रामलिला मैदानात संविधान जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा, असे आवाहनही खर्गे यांनी केले आहे.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …