हेरगिरीसाठी पशुपक्ष्यांचाही वापर करणे ही काही नवलाईची बाब नाही. त्यामुळे एका पांढर्या बेलुगा व्हेल माशालाही असेच रशियाचा ‘गुप्तहेर’ मानले जात होते. या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला.
या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षेतर वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. मोठ्या बोटीच्या धडकेने हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. ह्वाल्दिमीर व्हेलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. 2019 मध्ये जगाला याची प्रथमच माहिती मिळाली. हा बेलुगा व्हेल रशियापासून 415 किमी अंतरावर नॉर्वेमधील इंगोया बेटाच्या किनार्यावर सर्वप्रथम दिसला. या भागात बेलुगा व्हेल आढळत नाही. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले. व्हेलची जवळून पाहणी केल्यावर गळ्याभोवती एक पट्टा दिसला. ज्या शरीरावर रशियन शहर सेंट पीटर्सबर्गचे नाव लिहिले होते, त्या शरीरावर कॅमेर्यांसह मशिन्सदेखील बसविण्यात आल्या होत्या. रशियन नौदल व्हेलला प्रशिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. यामुळेच ती रशियाची गुप्तहेर व्हेल मानली जाऊ लागली.
पाश्चात्त्य माध्यमांमध्ये ह्वाल्दिमीरबद्दल दावा करण्यात आला होता की, प्राण्यांना हेर बनवण्याच्या रशियन प्रकल्पाचा भाग होता. मात्र, रशियाने हे कधीच मान्य केले नाही. व्हेलला नॉर्वेमध्ये ‘ह्वाल’ म्हणतात. यानंतर व्हेल आणि रशियन राष्ट्राध्यक्षांची नावे एकत्र करून सोशल मीडियावर त्याला ‘ह्वाल्दिमीर’ स्पाय व्हेल म्हटले जाऊ लागले. बेलुगा व्हेल सामान्यतः थंड आर्क्टिक महासागरात राहतात. पण ह्वाल्दिमीर माणसांमध्ये सहज राहात असे. ती माणसांसोबत डॉल्फिनसारखी खेळायची. ह्वाल्दिमीरचे संरक्षण करणार्या नॉर्वेजियन एनजीओ मरीन माइंडने सांगितले की, या व्हेलला गेल्या काही वर्षांत अनेक किनारी भागात पाहिले गेले आहे. ही खूप शांत स्वभावाची व्हेल होती हे लवकरच आमच्या लक्षात आले. या व्हेलला लोकांशी खेळायला आवडायचे. तिने हाताच्या संकेतांवरही प्रतिक्रिया दिली. नॉर्वेतील हजारो लोकांचे तिच्यावर प्रेम होते. तिचा मृत्यू हृदयद्रावक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …