लेख-समिक्षण

पडद्यावरचा दीपोत्सव

दिवाळीचे वेध लागताच युट्यूबपासून ब्लूटूथपर्यंत एकच गाणे वाजत राहते, ते म्हणजे ‘अष्टविनायक’ चित्रपटातील मधुसुदन कालेलकर यांचे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी…’ . अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने प्रत्येक दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. मराठी पडद्यावरच नाही तर हिंदीच्या पडद्यावरही कलाकारांनी दिवाळीच्या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांत दिवाळीचे फटाके कमी फुटताना दिसतात. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाचा ट्रेंड कायम राहत असला तरी दिवाळीला होळीच्या सणाच्या तुलनेत कमी महत्त्व दिले गेले आणि आता तर ते आणखीनच कमीच झालेले दिसून येते.

दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव. दिव्यांची आरास असलेला, उत्साह, आनंदमय, मंगलमय आणि प्रसन्नमय वातावरणाचा अनुभव देणार्‍या उत्सवाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. दिव्यांशिवाय, प्रकाशाशिवाय दिवाळीला महत्त्व नाही. या कारणांमुळेच चित्रपट निर्माते लाइट्स कॅमरा, अ‍ॅक्शनबरोबरच दिवाळीच्या झगमगटाचेही महत्त्व चांगल्या रितीने ओळखून आहेत. म्हणूनच भव्यदिव्य दिवे, पितळाचे दिवे, एलईडी लाइट्स आणि मेणबत्तीचा वापर करत चित्रपटात दिवाळीचे दृश्य उजळून टाकण्यात येते. याच पद्धतीने ब्लॉक ब्लस्टर ‘कभी खूशी कभी गम’ मध्ये जया बच्चन यांनी दिव्यांसह सादर केलेले दिवाळीचे गीत संस्मरणीय ठरले. अर्थात हा आनंददायी दिवस सर्वांनाच प्रसन्न करतो असे नाही. ‘तारे जमीन पर…’ या चित्रपटात दार्शिल सफारीवर साकारलेले गाणे आठवा. शाळेच्या सुट्या संपताच त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जाते. त्याच्या मनातील उदासिनता प्रेक्षकांना हुरहुर लावणारी असतेे. ‘राजू बन गया जंटलमन’ चित्रपटात दिवाळीच्या दिवशी सपूर्ण वस्ती सद्भभावाचे दर्शन घडविते. यात शाहरुख खान आणि जुही चावला झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांसमवेत फुलबाज्या उडवताना दिसतात आणि त्यांच्याशी असणारे नाते अधोरेखित करतात. आणखी एक चित्रपट आठवा तुषार कपूरचा ‘मुझे कुछ कहना है’. यात करिना कपूर रस्त्यावर नायक आणि मुलांसमवेत भुईनळे उडविताना दाखविले आहे. तो तिच्या प्रेमात पडतो. अशा लहानसहान प्रसंगातून दिवाळीच्या सणाचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला आहे. केवळ मनोरंजन करणेच चित्रपटाचा हेतू नसून समाजात जनजागृती करणे देखील चित्रपटांची जबाबदारी असते. ‘चिराग’ चित्रपटात फटाक्यांमुळे मोठी दुर्घटना घडते आणि आशा पारेखचे डोळे जातात. म्हणून फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घेण्याचा संदेशही या दृश्यातून दिला गेला. मुद्दा इथेच थांबत नाही. दिवाळीच्या दिवशी आरोपी असो किंवा पोलिस, दोघेही आनंदाचा क्षण द्विगुणीत करण्याची संधी सोडत नाहीत. चित्रपटातील कथानकात या सर्व गोेष्टी परस्पर प्रेम, सद्नभाव वाढविण्यासाठी दाखविल्या जातात. म्हणूनच ‘वास्तव’ मध्ये संजय दत्त हा दिवाळीला जुन्या चाळीत जातो आणि मिठाई वाटतो.
कथा, गीत आणि दृश्यात दिवाळी महत्त्वाची
चित्रपटात अनेक उत्सव, सणांची पार्श्वभूमी असलेले दृश्य सादर केले जातात. चित्रपटातील उत्सव ‘कभी खुशी कभी गम’ व्यक्त करण्याचे माध्यम असतात. यात होळी, राखी, करवा चौथबरोबरच दिवाळी ही अग्रस्थानी आहे. उत्सव आणि चित्रपटातील पटकथा यांचे दीर्घकाळापासून नाते आहे. कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर वेळोवेळी दिवाळी साजरी केली गेली आहे. पण गेल्या दोन दशकांपासून दिवाळीची रौनक पडद्यावरून गायब होताना दिसत आहे. उत्सवाचे स्वरुप अणि प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलल्याने दिवाळीवरचे दृश्य आता कमी झाले आहेत. क्वचितच एखाद्या चित्रपटात दिवाळीच्या दृष्याचा समावेश असतो. दुसरीकडे 1960-70 च्या दशकांत अनेक चित्रपट दिवाळीभोवती घुटमळताना दिसतात. जयंत देसाई दिग्दर्शित दिवाली (1940) हा या परंपरेचे सादरीकरण करणारा चित्रपट . त्यानंतर 1955 मध्ये ‘घर घर मे दिवाली’ आणि त्यानंतर वर्षभरानंतर आलेला ‘दिवाली की रात’ देखील दिवाळी हा मध्यवर्ती विषय होता.
उत्सवाचे जुने कनेक्शन
काही काळापासून पडद्यावरून प्रकाशाचा उत्सव गायब झाला. आता कथानकांचा मूळ गाभा बदलत आहे. पडद्यावर उत्सव साजरा करणे हे पटकथेच्या मागणीनुसार ठरविले जावू लागले. निर्माते हे नेहमीच नव्या गोष्टींचा अंगिकार करत देशाबरोबरच जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणार्‍या विषयांवर चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करणार्‍या यश चोप्रा यांच्या चित्रपटांत होळीचाच बोलबाला राहिला. शोलेसारखा ब्लॉकब्लस्टर चित्रपटांत ‘होळी’ तून गब्बर सिंहचे क्रौर्य प्रेक्षकांना कळाले. होळी तर बॉलिवूडचा आवडता सण. तुलनेने दिवाळी हा पडद्यावर आवडीचा सण कधीही झाला नाही. दिवाळीवर प्रदर्शित होणारे चित्रपट हे यशाची हमी देतात. परंतु अलिकडच्या काळात दिवाळीचा निर्मात्यांना विसर पडलेला दिसतो. सर्व कलाकार, निर्माते एकत्र येंऊन दिवाळी साजरा करतात. मात्र पडद्यावर साकारण्यास मागेपुढे पाहतात. बडजात्या यांच्या ‘हम आप के कौन’ चित्रपटात दिवाळीची झलक दाखविली आहे.
कृष्णधवलमध्ये दिवाळीचा प्रकाश
दिवाळी केवळ रंगीत चित्रपटांना ‘चार चाँद’ लावणारी नाही तर कृष्णधवल काळातही या उत्सवाचे महत्त्व होते. 1961 मध्ये राजकपूर, वैजयंतीमाला यांच्या ‘नजराना’ चित्रपटात दिवाळीतील दृष्यांना प्राधान्य दिले. या चित्रपटात ‘मेले है चिरागो के रंगीन दिवाली है’ हे गीत लता मंगेशकर यांनी म्हटले होते. दिवाळीच्या आनंदपर्वाचे हे कृष्णधवल युगातील अजरामर गीत. प्रारंभापासून ते शेवटपर्यंत फटाक्यांची आतषबाजी दिसून येते. 1962 मध्ये ‘हरियाली और रास्ता’ मध्ये देखील दिवाळीच्या दृश्यात नायक आणि नायिकांचा विरह दाखविला आहे. वैजयंतीमाला, दिलीपकुमार यांचा ‘पैगाम’ आणि ‘लीडर’मध्ये देखील दिवाळीच्या माध्यमातून चित्रपटातील पात्रांना जोडण्याचे काम केले. 1972 मधील ‘अनुराग’ मध्ये परस्पर विश्वास वाढविण्याचे काम दिवाळीच्या दृश्याने केले आहे.
दिवाळीच्या दृश्यातून कथानकात ट्विस्ट
चित्रपटातील दिवाळी ही दिवे, फटाक्यांपुरतीच मर्यादित राहत नाही. कथानकात ट्विस्ट आणण्यासाठी देखील दिवाळीच्या दृश्यांचा वापर केला गेला आहे. फटाक्यांच्या आवाजात गोळीबाराचा आवाज दाबला जातो आणि संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचे दृश्य ‘जंजीर’ मध्ये साकारण्यात आले. अर्थात ‘जंजीर’चा खलनायकाचा शेवट देखील दिवाळीच्या रात्री होताना दाखविला आहे. धर्मेंद्रचा ‘यादो की बारात’मध्ये तीन मुलांसमोर वडिलांची हत्या होते आणि तीही दिवाळीच्या दिवशी. कमल हसन यांचा 1998 मध्ये ‘चाची 420’ मध्ये दिवाळीच्या दिवशी मुलगी जखमी झाल्याचे दाखविले. आदित्य चोप्रा यांंचा मोहब्बते (2000) मध्ये दिवाळी महत्त्वाची दाखविली. करण जोहर यांचा 2001 मध्ये ‘कभी खुशी कभी गम’चे टायटल साँग हे एकप्रकारे दिवाळीचेच गीत आहे. जया बच्चन या दिवाळीनिमित्त पूजा करताना गीत गातात.
गाण्यातही दिवाळीचा रंग
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या काही गाण्यांनी बरीच लोकप्रियता मिळवली. ‘नजराना’ चे ‘एक वो भी दीवाली थी’, ‘शिर्डी के साईबाबा’ मधील ‘दीपावली मनाई सुहानी’ या गीतांबरोबरच ‘खजांची’मधील ‘आयी दिवाली आयी, कैसी खुशहाली लायी’, ‘पैगाम’मधील दिवाळीचे गीत ‘कैसे मनाए हम लाला दिवाली’ आणि काही वर्षांपूर्वीचा गोविंदाचा ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’मधील गीत ‘आई है दिवाली, सुनो जी घरवाली ’यासारखे गाणे दिवाळीला केंद्रस्थानी ठेवूनच साकारले. याशिवाय ‘नमक हराम’चे गीत दिये जलते है फुल खिलते है’ हे अविस्मरणीय दृष्याबद्धल आजही लक्षात आहे. रतन (1944) मधील ‘आयी दीवाली दीपक संग नाचे’ ‘पतंगा’ मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीत नौशाद यांनी विरह भाव असणार्‍या गीताची रचना केली. महाराणा प्रताप (1946) मध्ये ‘आयी दीवाली दीपो वाली’च्या पारंपरिक गीत ऐकावयास मिळाले. त्याचवेळी शिशमहल (1950) मधील ‘आयी है दीवाली सखी आयी रे’ गीत वसंत देसाई यांनी पारंपरिकदृष्ट्या साकारले.-सोनम परब

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *