भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने अनुराधाताईंच्या गर्भरेशमी स्वरांना गौरवण्यात येणार आहे याचा मनापासून आनंद होत आहे. लतादीदी आणि आशाताई या दोन अजोड आणि जगामध्ये कुठंही न आढळणार्या वैशिष्ट्यांमध्ये टिकून राहात आपला वेगळा आवाज निर्माण करण्याचं आव्हान पेलताना अनुराधा पौडवाल यांनी नक्कीच मेहनत घेतली असणार. जवळपास 40 संगीतकारांकडे 300 हून अधिक गाणी आम्ही एकत्र केलेली आहेत. त्या काळात मी त्यांचं समर्पण, शब्दांवरचं त्यांचं प्रेम, घरामधील त्यांचं आतिथ्य, भक्तीमयता आणि शालीनता, परमोच्च टोकाला जाऊनही असणारी हसतमुखता, स्वागतशीलता मी जवळून पाहिली. लावणी, मुजरा, अंगाई, भक्तीगीतं, लोकगीतं, ओव्या असा गाण्याचा कोणताही प्रकार त्यांच्या स्वरांना वर्ज्य नव्हता.
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाचा भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार जाहीर होणं हा त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा यथोचित सन्मान आहे. जवळपास 30 ते 35 वर्षेकधी गीतरचनेच्या निमित्तानं, कधी त्यांचे पती अरुण पौडवाल यांच्यासोबत गाणं लिहिताना त्यांची पत्नी म्हणून, गायिका म्हणून, कविता आणि आदित्य या मुलांची आई म्हणून अशी अनेक रुपं मी अगदी जवळून पाहिलेली आहेत. गाण्याबद्दलची निस्सीम भक्ती, स्वरांबद्दलचं समर्पण या सर्वांमुळं त्यांना हा पुरस्कार मिळायलाच हवा होता. लतादीदी, आशाताई आणि मंगेशकर कुटुंबं, सुमनताई कल्याणपूर यांच्या एका महत्त्वाच्या प्रचंड मोठ्या अवकाशानंतर त्यांच्याच बरोबरीनं स्वतःच्या आवाजाची सिद्धता सिद्ध करणं हे अत्यंत मोठं आव्हान अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांनी पेललं. कल्पवृक्षाच्या खाली आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारं झाड होणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळं अनुराधाताईंचं विशेष अभिनंदन करावंसं वाटतं. ज्या लतादीदींच्या स्वरांना त्या आदर्श मानतात त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा, ही बाब एक सहकलावंत म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला खूप महत्त्वाची वाटते.
यानिमित्तानं अनुराधाताईंची-माझी भेट आरंभी कशी झाली हे सांगायला मला आवडेल, कारण त्यामध्ये नाट्यपूर्णता आहे. साधारण 1980-85 च्या काळात मुंबईतील एका वृत्तपत्रामध्ये मी विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत होतो. आमच्या संपादकांनी एके दिवशी बोलावून मला नवोदित, पण पुढील दहा वर्षांमध्ये जे नक्की नावारुपाला येतील अशा काही कलावंतांचा शोध घेऊन त्यांच्या मुलाखती घेण्यास सांगितलं. त्यामध्ये मी सुरेश वाडकर, अजित कडकडे यांच्या नावांबरोबर अनुराधा पौडवाल यांचं नाव सुचवलं होतं. मुलाखतीसाठी मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो तेव्हा एक वेगळा अनुभव मी घेतला. अनुराधाताईंचं नाव तेव्हा गायनविश्वात लोकप्रिय होऊ लागलं होतं, त्यांच्या स्वरांचं वेगळेपण रसिकांना उमगलं होतं. विशेषतः संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्यासोबतचं एक गायिका म्हणून त्यांचं उत्कृष्ट ट्युनिंग होतं. त्यातूनच सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल असं एक वेगळंच युगलगीतांचं पर्व उदयाला आलं. पत्रकार म्हणून उमेदवारी करत असल्यामुळं तो माझ्या अध्ययनाचा काळ होता. त्या काळात त्यांच्या घरी मी पहिल्यांदा गेलो. एक उमलता, ताजा, उत्कट सूर आणि व्यक्तिमत्वातील गोडवा गाण्यामध्ये आलेला की गाण्यातल्या गोडव्यामुळं व्यक्तिमत्व देखणं झालेलं हे कळू नये अशा प्रकारचं एक रुपलाघव आणि स्वरलाघव मला जाणवलं. ती मुलाखत अतिशय गाजली. त्याकाळात मला गीतरचनेची मुशाफिरी करावी लागत होती. ती करताना मी अनेक स्टुडिओमध्ये संगीतकारांना भेटायला जायचो. असाच एके दिवशी साधारण साडे अकराच्या सुमारास मुंबईतील अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या आणि राज कपूर यांच्या ‘बरसात’ चित्रपटातील गाण्यांचं रेकॉर्डिंग झालेल्या फेमस स्टुडिओमध्ये गेलो होतो. तिथं विख्यात संगीतकार आणि लता मंगेशकरांचे आवडते व्हायोलीनवादक प्रभाकर जोग यांच्या गाण्याची रिहर्सल सुरू होती. गायकाच्या दालनामध्ये कुणी उभं नव्हतं; पण हार्मोनियमवर प्रभाकर जोग एका व्यक्तीला गाणं शिकवत होते. मी जवळ जाऊन डोकावून पाहिलं तर त्या अनुराधा पौडवाल होत्या. दोन-तीन रिहर्सल झाल्यानंतर त्यावेळच्या उमेदीच्या काळातील अनुराधाताई या गायकाच्या केबिनमध्ये उभ्या राहिल्या. हे गाणं होतं…‘हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या स्वरात न्हाली’. मधुसुदन कालेलकरांची अप्रतिम गीतरचना, प्रभाकर जोगांची प्रसन्न, नादमधुर चाल आणि या दोघांना अनुराधा पौडवाल यांचा शंभर चंद्र लावलेल्या चांदण्याचा स्वर आजही माझ्या कानामनामध्ये घुमतो आहे. या ध्वनीमुद्रणादरम्यान मी त्यांच्यातलं समर्पण पाहिलं. नंतरच्या काळात हे गाणं आकाशवाणीवर सातत्यानं घुमू लागलं तेव्हा अनुराधा पौडवाल आपलं गाणं कधी गातील, त्यांचा आश्वासक आवाज आपल्या शब्दांना कधी मिळेल हे स्वप्नं मी त्यावेळी पाहिलं.
अनुराधाताईंचा गर्भरेशमी स्वर विलक्षण होता. विशेष म्हणजे लतादीदी आणि आशाताई या दोन अजोड आणि जगामध्ये कुठंही न आढळणार्या वैशिष्ट्यांमध्ये टिकून राहणं आणि आपला वेगळा आवाज निर्माण करण्याचं आव्हान पेलताना अनुराधा पौडवाल यांनी नक्कीच मेहनत घेतली असणार. त्यामुळंच त्यांच्या स्वरांना असणारा रेशमी पिळ घुमत राहतो.
पुढील काळात ‘गीतरजनी’मधील गाणी मिळू लागल्यानंतर अनेक नामवंत संगीतकार मला बोलावू लागले. एकदा अरुण पौडवाल यांनी मला गीतलेखनासाठी बोलावलं. त्यावेळी असं लक्षात आलं की, अरुणजींसाठी गीतलेखन हा व्यवसाय नव्हता. त्यांचं ते भक्तीसमर्पण होतं. त्याच काळामध्ये टी-सीरीजमधून त्यांची अनेक भक्तीगीतं प्रकाशित होत होती. गुलशन कुमार हे त्या कंपनीचे मालक होते. ते स्वतः शिवभक्त होते. त्यामुळं शंकराची अनेक गाणी अनुराधा पौडवाल यांनी गायिली. संगीतकार नंदू होनप यांच्या अनेक भक्तीगीतांपैकी 95 टक्के गाणी मी लिहिलेली आहेत आणि या गाण्यांमध्ये मुख्य स्रीस्वर अनुराधाताईंचा होता. त्यांनी माझी 300 ते 350 हून अधिक भक्तीगीतं गायिली. यामध्ये मला आवडणार्या आणि 30-35 वर्षांपूर्वी ध्वनीमुद्रित होऊनही आजच्या काळातही सगळीकडं वाजणार्या ‘नाचे रुणझुण असा गणपती’ या गाण्याचा उल्लेख करावासा वाटतो. यामधील नादमय शब्द अनुराधा स्वरांमुळे अधिकच नादमय झाले.
नाचे रुणझुण असा गणपती,
छुमचुमणार्या मधुर स्वरांनी , पैंजण चरणी गाती..
नरतन रंगी ताल ही रमले, निनादताना सुर ही रमले
कंठामधले मोती सुंदर, हृदयी लखलखती
नाचे रुणझुण असा गणपती….
हे गाणं म्हणजे केवळ कविता नाही; तर नृत्यगणेशाची शब्दरुपता आहे. हे शब्दरुप स्वरांच्या साथीशिवाय अपुरं आहे. त्यामुळं अनुराधाताईंनी रुणझुण हा स्वर किंवा चरणी गाती’ मधील मिंड किंवा हलकासा झोन इतका योग्य घेतला आहे की मी आजही ते ऐकताना आतून भारावून जातो. याखेरीज स्वामी समर्थांची, दत्तगुरुंची गाणी, अनुसुयेचा पाळणा अशी माझी अनेक दत्तभजनं अनुराधाताईंनी गायिली आणि ती लोकप्रिय झाली. त्या यशामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांचा आणि सुरांचा खूप महत्त्वाचा व मोठा वाटा आहे.
श्रीधरजी फडके यांच्यासोबत एक भावगीत लिहिण्याची मला संधी मिळाली. त्यामध्ये मी चालीवर गाणं लिहिलं. त्यावेळी श्रीधरजींनी हे गाणं कोण गाणार आहे, हे सांगितलं नव्हतं. पण गाणं लिहून पूर्ण झाल्यानंतर मी श्रीधरजींना म्हणालो की, तुमची चाल अप्रतिम आहे, मीही गाणं लिहिण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे, पण गातंय कोण?’ श्रीधरजी म्हणाले, ‘काय वाटतं? कोण गात असेल?’ मी चटकन म्हणालो, ‘तुमच्या स्वररचनेवरुन वाटतंय की अनुराधा पौडवाल गात असतील.’ श्रीधरजींनी टाळी देत अगदी बरोबर ओळखलंत अशी प्रतिक्रिया दिली. हे गाणं होतं, ‘चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा, गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा’. आज मराठी वाद्यवृंदात अनेक गायिका हे गाणं गातात. लोकांना आवडणार्या भावगीतांपैकी एक हे गीत आहे. त्याकाळात भक्तीगीतांचं युग आल्यामुळं भावगीतांचा जमाना हरवत चालला होता. अशा काळात एक युग निर्माण करण्याचंं काम ज्यांनी केलं, त्यामध्ये मला योगदान देता आलं आणि त्यासाठी मला साथ मिळाली ती अनुराधा पौडवाल यांची.
अनुराधा पौडवाल यांच्या समर्पित वृत्तीचं आणखी एक उदाहरण मला यानिमित्तानं सांगावंसं वाटतं. एकदा त्यांचा दूरध्वनी आला आणि ‘प्रवीणभाऊ, तुम्हाला पांडुरंगाच्या चार-चार ओळींच्या रचना लगेच लिहून द्यायच्या आहेत. या कॅसेटचं रिलीज उद्या आहे आणि परवा आषाढी एकादशी आहे. मी स्टुडिओमध्येच आहे,’ असं म्हणून त्यांनी मला एक विशिष्ट चाल, त्या चालीचा एक रुपबंध गुणगुणून दाखवला आणि याच मीटरवर आपल्याला लिहून हवं आहे, असं सांगितलं. मी होकार कळवला आणि लागलीच चार-चार ओळींची चार कडवी लिहिली. त्याकाळात मोबाईल नव्हते. दूरध्वनी आणि फॅक्सचा काळ होता. माझ्याकडं आलेल्या एका विद्यार्थ्याला मी ती कडवी फॅक्स करायला सांगितली. अनुराधाताईंनी ताबडतोब ती गायला घेतली आणि ती गाऊन होईपर्यंत मी पुढची कडवी लिहून फॅक्स केली. अशी मी 88 कडवी लिहिली आणि जवळपास 44 गाणी अनुराधाताईंनी गायिली. त्या एकीकडे गात होत्या, गाणी ओके होत होती. 11.30 ते 3.30 पर्यंत मी ही गाणी लिहून दिली आणि सायंकाळी रेकॉर्डिंग पार पडले. दुसर्या दिवशी ती कॅसेट रिलीज झाली आणि पंढरपूरला त्याचं प्रकाशनही झालं. या प्रसंगामध्ये माझ्या जिद्दीपेक्षाही अनुराधाताईंचं समर्पण मला अधिक मोलाचं वाटतं. आमच्या आजवरच्या सुरेल प्रवासातील ही एक अविस्मरणीय आठवण. त्या सुरेल दिवसांच्या महत्त्वाच्या शिल्पकार होत्या अनुराधा पौडवाल.
‘अंगार’ या चित्रपटातील ‘वाट रेशमी फुलाफुलांत नाहते, बाहुपाशी राजसा बहरुनी विसावते’ हे मी लिहिलेलं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायिलं. हे गाणंही माईलस्टोन ठरलं. या गाण्यामध्ये ‘इंद्रबनातील मी पाकोळी, योगी झाला भ्रमरकुळी’ अशा ओळी आहेत. आपल्या संन्याशी प्रियकराला अनुवादी करण्याचं सामर्थ्य त्या नायिकेमध्ये यावं यासाठी हे गाणं लिहिलं गेलं आणि अनुराधाताईंच्या स्वरांनी ते विलक्षण बनवलं. याशिवाय, ‘शपथ तुला बाळाची’ या चित्रपटातील तिन्ही सांजेला प्रभु चरणाशी एक नित्य प्रार्थना आणि ‘आत्मविश्वास’मधील ‘आली जाग सोनियाच्या अंबराला…’ या माझ्या गीतांनाही अनुराधाताईंनी दिलेला स्वरसाज अद्वितीय ठरला. जवळपास 40 संगीतकारांकडे 300 हून अधिक गाणी आम्ही एकत्र केलेली आहेत. त्या काळात मी त्यांचं समर्पण, शब्दांवरचं त्यांचं प्रेम, घरामधील त्यांचं आतिथ्य, भक्तीमयता आणि शालीनता, परमोच्च टोकाला जाऊनही असणारी हसतमुखता, स्वागतशीलता मी जवळून पाहिली. कधीही कुणावरही त्यांनी टीका केली नाही, हेही मी पाहिलं.
भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने अनुराधाताईंना गौरवण्यात येणार आहे याचा आनंद अशासाठी आहे की, लावणी, मुजरा, अंगाई, भक्तीगीतं, लोकगीतं, ओव्या असा गाण्याचा कोणताही प्रकार त्यांच्या स्वरांना वर्ज्य नव्हता. अशा या थोर पार्श्वगायिकेला, माझ्या सहकलावंताला हा महान पुरस्कार मिळाला याबाबत मनापासून आनंद होत आहे.
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके) प्रा. प्रवीण दवणे, ज्येष्ठ कवी-गीतकार-साहित्यिक
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …