लेख-समिक्षण

मनात उमटतो श्रावण

श्रावण आला की मनात निराळ्या लहरी उमटू लागतात. त्याच्या उन पावसाच्या खेळाबरोबर मनही आशा – निराशेच्या लपंडावात रमतं. निसर्गानेही श्रावण महिना तयार केला असेल तो मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणूनच. त्याच्या आगमनाने पुढच्या सणांची चाहूल लागते,जशी मनाला एखाद्या पुढच्या चांगल्या घटनेचे वेध लागून त्यात उत्साह भरावा. पावसाचं मळभ दूर करून त्याची रिमझिम जशी निसर्गात बदल घडवून आणते तसंच श्रावणाच्या आगमनाने येणार्‍या सणांच्या चाहूलीने मन उत्साही बनतं. मनाचं आणि श्रावणाचं म्हणूनच फार जवळचं नातं आहे. ते आपल्या संस्कृतीत, कलाकृतीत अगदी स्पष्ट उमटलंय. श्रावणसखा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो तो त्याच्या वेगवेगळ्या रूपांमुळे…
षाढाच्या झिम्माड सरींनी धरीत्रीला न्हाऊ घातल्यावर तिच्यावर हळूवार हाताने साज चढवून तिला अलंकारित करण्याचं काम निसर्गाने कदाचित श्रावणावर सोपवलं असेल. म्हणूनच त्याच्याकडे धरतीला सजवण्याचं , साजश्रृंगार करण्याचं काम आहे. पावसाच्या जलधारा उदरात साठवलेली धरती त्याची फळं द्यायला उत्सुक झालेली असते आणि ते घ्यायला आपलं मन. रिमझिम पावसात मनालाही नवे धुमारे फुटतात. कधी उन -पावसाच्या खेळात त्याला जीवनाचं एखादं सत्य सापडतं तर कधी कातरवेळी मनाच्या जखमांवर हळूवार फुंकर घालायला थोडीशी उसंत मिळते. हे सगळं वर्षाच्या या वेळीच का होत असावं? आधी उन्हाचा तडखा आणि त्यावर नंतर पावसाची सर पडून गेल्यावर दोन विरूध्द ऋतूंमुळे मनाने आणि निसर्गानेही अनुभवलेली टोकाची रूपं त्याला येणार्‍या चांगल्या दिवसांची चाहूल देत असतात. आता उन्हाची काहीली नसते आणि पावसाची रिपरिपही. असतो तो हवेतला सुखद गारवा. त्यातून मनाला मिळणारी उभारी आणि येणार्‍या सृजनशील काळाची नांदी. म्हणूनच कदाचित श्रावणात सणावारांची रेलचेल असते. मनाला संयम शिकवणारी व्रतवैकल्य असतात आणि येणार्‍या पुढच्या सणवारांची तयारी करायला मिळालेली एक उसंतही असते.
श्रावण हे माणसाच्या मनाचं प्रतिकच आहे म्हणा ना. जीवनातला एखादा टप्पा संपून दुसर्‍यात प्रवेश करताना जशी मनाची मशागत करायची असते तेच काम निसर्गात श्रावण महिन्याचं असतं. लहानपण संपून तारूण्यात प्रवेश करताना किती फुलपंखी अवस्था असते मनाची. अगदी उन- पावसाचा खेळ करणारा श्रावणच. नात्यांना समजून घेण्याची हूरहूर, मधूनच आभाळ भरून यावं तसे रूसवे फुगवे, मग सर पडून गेल्यावर मोकळं व्हावं तशी नव्या विश्वासाने आयुष्यात येणारी नाती, त्यांची जपणूक करायला केलेले प्रयत्न, जसे देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी केलेले चातुर्मासातले उपवास! कधी आनंदाची कोवळी उन्हं तर कधी प्रेमाची रिमझिम बरसात. एवढी विविधता आयुष्याच्या अन्य कोणत्या टप्प्यावर क्वचितच पहायला मिळते ना?
श्रावणात धरतीला जसे नवे धुमारे फुटतात तसेच ते माणसाच्या मनालाही फुटत असतील नाही का? म्हणून तर सृजनशील मनातून निघालेली कितीतरी साहित्य रूपं श्रावणाची पाठराखण करत असतात. मनातले भाव श्रावणाच्या रूपाने व्यक्त करायला किती सोपे आहेत नाही ? कधी त्यात विरहाची तहान असते तर कधी खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियकराला जाऊ न देण्यासाठी पावसालाच अखंड कोसळण्याचं घातलेलं साकडं असतं. कधी एखाद्या सासुरवाशणीला आलेली माहेराची, स‘या सोबत्यांबरोबर रानावनात घालवलेल्या अ‘ड खेळांची झालेली आठवण असते तर कधी धरतीने पांघरलेला हिरवा साज पाहून कुणाला एखाद्या नव्या नवरीच्या साजश्रृंगाराची आठवण झालेली असते. कुणाला या श्रावणधारात श्रीकृष्णाचं सावळं रूप दिसतं तर कुणाला त्यात विठ्ठलाची मााया. कुणी भक्तीरसात तर कुणी निसर्गाच्या मोहक रूपात बुडालेला असतो. त्यांना व्यक्त करायला कारण एकच असतं, श्रावण!
श्रावणाला महिन्यांच्या राजाची उपमा तर अगदी चपखल आहे. इतर कोणत्याही महिन्यात येत नाहीत एवढे सणवार या महिन्यात येतात. श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, कृष्णजन्म ते राखीपौर्णिमेपर्यत सगळ्या सणांची रेलचेलच असते या महिन्यात. नातीगोती जपायला, संवर्धन करायला आणि जीवनातले आदर्श कोणते असावेत याची नकळत दिली जाणारी शिकवण याच महिन्याकडून मिळते. शिवाय येणार्‍या गणपती ते दिवाळी या आनंददायी चातुर्मासाची नांदीही हा महिना देत असतो. येणार्‍या सुखाच्या विचाराने जसं मन उत्साहीत होतं तसंच काहीसं काम निसर्गात श्रावण महिना करत असतो. माणसाच्या मनाला सतत भविष्याची आणि त्यात होणार्‍या चांगल्या घटनांची ओढ असते. मानवी मन कायम येणार्‍या भविष्याकडे पाहत असतं. त्यातल्या सुखात सध्याचं दु:ख विसरत असतं. म्हणूनच त्याला ही झलक दाखवायची फार गरज असते. निसर्गात हे काम श्रावण महिना करतो. मशागत करून पेरणी करून तृप्त झालेली माती जशी नवे अंकुर घेऊन तरतरून येते तशीच काहीशी अवस्था मनाचीही झालेली असते. दु:ख किंवा संकटांना तोंड देऊन कठोर झालेलं मन या रिमझिम पावसांच्या सरींनी थोडं मोकळं होतं. येणार्‍या पुढच्या भविष्यासाठी सज्ज व्हायला लागतं.
श्रावणाचं मनाशी असलेलं नातं आणखी एका कारणाने घट्ट होतं ते त्याच्या लहरीपणामुळे ! मनाचा थांगपत्ता जसा लागत नाही तसाच श्रावणातल्या उन पावसाचा. आत्ता उन्हाची पखरण आहे म्हणावं तर कधी काळे ढग भरून येतील आणि कधी धारांनी सचैल स्नान घडेल याचा नेम नाही. कधी उन- पाऊस एकदमच हजेरी लावतात आणि आकाशात इंद्रधनुष्याचा साज पहायला मिळतो. निसर्ग किती रूपाने नटतो पण या सप्तरंगी मुकुटाचा साज घालून मिरवणं त्यालाही आवडत असेल. मनाच्या अवस्थाही अगदी अशाच असतात नाही का? कधीतरी कोणाच्या काळजीने मन भरून येतं.क्षणात त्यांच्या एखाद्या आठवणीने चेहर्‍यावर हास्य फुलतं. कधी अनपेक्षित भेटीने ओठावर हासू आणि डोळ्यात आसू अशी विचित्रच अवस्था अनुभवायला मिळते. म्हणूनच तर श्रावणाचा लहरीपणा इतर कुणाला कळेल ना कळेल पण मनाला नक्की कळतो आणि भावतोही. श्रावण हा मनाचा सखा वाटतो तो त्यासाठीच. तेव्हा हा सखा येतोय, तयार आहात ना त्याच्या सगळ्या रूपात चिंंब व्हायला ?-विधिषा देशपांडे

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *