उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि खुनाच्या घटनेमुळे तीन वर्षांपूर्वी गाजले होते. आता ‘बाबा’चा चरण स्पर्श करण्यासाठी गाजत आहे. हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावात मंगळवारी दुपारी एक भयंकर दुर्घटना घडली. येथे भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगमध्ये चरण स्पर्श करण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 130 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात सत्संगसाठी मांडव घातलेला होता. सत्संग संपल्यानंतर गुरुजी यांची कार निघाली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी लोक धावले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी लोकांना अडविले. यातच चेंगराचेंगरी झाली. अनेकजण खाली पडले, तर इतर लोक त्यांच्या अंगावर चढून पुढे गेले.
एका प्रत्यक्षदर्शी रामदासने सांगितलं की, तो आपल्या पत्नीच्या औषधांसाठी तिला घेऊन अलीगडला गेला होता. तिथून परत येत असताना ते वाटेत सत्संगमध्ये सहभागी झाले. ही व्यक्ती सेवा देणार्यांजवळ बसली तर त्याची पत्नी सत्संगमध्ये गेली आणि त्यांची पत्नीही या चेंगराचेंगरीत अडकली. मांडवापासून लांब बसलेले असताना अचानक खूप मोठी गर्दी दिसून आली. जवळपास दीड ते 2 लाख लोकांची गर्दी होती. जिथे हा कार्यक्रम होता ते शेत 50-60 एकरात पसरले होते. संपूर्ण रस्ता जाम होता. या व्यक्तीची पत्नी ही भोले बाबा यांना खूप मानत होती, अशीही माहिती या प्रत्यक्षदर्शीने दिली.
या घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. याचा अहवाल 24 तासाच्या आत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकार्यांची बैठक घेत त्यांना आवश्यक निर्देश दिलेत. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य महिला आणि बालके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह बहुतेक नेत्यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याप्रकरणाची दखल घेत योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. तसेच, त्यांना केंद्राकडून हवी ती मदत देण्याचं आश्वासन देखील दिलं. तसेच, अमित शहा यांनी एक्सवर याबाबत दु:ख व्यक्त करत एक पोस्ट टाकली. यामध्ये त्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितले.
या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सरकारी रुग्णालायाबाहेर एकापाठोपाठ एक रुग्णवाहिकेमधून मृतदेह आणले जात होते. हे मृतदेह रुग्णालयाबाहेरच जमिनीवर ठेवले होते. तेथे मृतदेहांचा खच पडला होता. मृतदेह पाहून त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. हे नातेवाइक अश्रू पुसत होते आणि एकमेकांचे सांत्वन करत होते. जखमींवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती, त्याचवेळी मृतांच्या नातेवाइकांनी टाहो फोडला होता. मन हेलावून टाकणारे चित्र रुग्णालयाबाहेर दिसले. एका ट्रकमध्ये एक महिला पाच-सहा मृतदेहांमध्ये रडत बसली होती आणि लोकांना आपल्या मुलीचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची विनंती करत होती. संध्याकाळनंतर मृतांचा आकडा वाढू लागला आणि रुग्णालयाबाहेरील गर्दीही वाढू लागली. ‘100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात एकच डॉक्टर होता. ऑक्सिजनची सोय नव्हती. काही जण अजूनही श्वास घेत आहेत; पण उपचारांची योग्य सोय नाही,’ असे संतप्त तरुणाने रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …