निसर्गावर विजय वगैरे मिळवणं आपल्याला कधीच शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते; पण कथित आर्थिक विकासाच्या कैफात आपल्याला तसं पदोपदी वाटू लागलंय, हे मात्र खरं. निसर्ग हा सातत्यानं आपल्याला काही ना काही देत राहतो आणि आपण सातत्यानं त्याला ओरबाडत राहतो. त्यामुळं एकीकडे पैसा फुगत चाललाय आणि दुसरीकडे निसर्ग जखमी होत चाललाय. खिसे फुगल्यामुळं पर्यटनाचा पूर आलाय; पण पर्यटन कशाला म्हणायचं, यातच बेसिक घोळ आहे. ज्याला आपण आव्हान देऊ शकत नाही, जो आपल्यापेक्षा शक्तिशाली असतो, आपल्यापेक्षा अनुभवी, ज्ञानसंपन्न आहे, त्याच्यापुढे आपण झुकतो आणि निसर्ग हा त्यापैकी एक आहे. त्याच्या शक्तीला आव्हान देणं दूरच; पण त्या शक्तीची कल्पनाही आपण करू शकत नाही. मंदिरात जाताना ज्याप्रमाणं आपण चप्पल बाहेर काढून ठेवतो, त्याप्रमाणं निसर्गात जाताना आपली घमेंड आपण बाहेर ठेवली पाहिजे. पर्यटन वाढलं पाहिजे, असं कानीकपाळी ओरडणारे ‘पर्यटन जबाबदार असलं पाहिजे,’ असं म्हणताना आढळत नाहीत. वस्तुतः ‘जबाबदार पर्यटन’ हा स्वतंत्र विषयच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालीये. आपल्या पूर्वजांनी निसर्गातल्या प्रत्येक घटकाला देवत्व बहाल केलं. वन्यजीवांना देवांचं वाहन बनण्याचा मान दिला. हा निसर्गाच्या शक्तीचा आदर होता. आज आपण आदर सोडा; या शक्तीची साधी दखलही घेत नाही, म्हणून संकटात सापडतो आहोत.
पावसाळी पर्यटन म्हटल्यावर लोणावळ्याची आठवण होणारच. दोन महानगरांचा मध्यबिंदू असणार्या या पावसाळी पर्यटनस्थळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या कुटुंबीयांची शोकांतिका जितकी काळीज पिळवटणारी, तितकीच इशारा देणारी. महानगरांमध्ये पैशांचा पाऊस पडतो आणि त्यात भिजणार्यांना आपले हात आभाळाला लागल्याचा भास होतो. वास्तविक, निसर्गात होणार्या तातडीच्या बदलांची आपल्याला माहितीही नसते. दहाजणांचं कुटुंब जेव्हा खडकावर विसावलं, तेव्हा शेजारून पाण्याची बारीक धार वाहत होती. पण थोड्या वेळातच तिथं अक्षरशः पूरसदृश परिस्थिती बनली. डोंगरांमधून धबधब्यांच्या माध्यमातून येणार्या पाण्याचा प्रवाह वाढायला किती कमी वेळ पुरतो, हे या निमित्तानं लक्षात घ्यायला हरकत नाही. दहाजण एकमेकांना घट्ट धरून सुमारे दहा-पंधरा मिनिटं एका जागी निश्चल उभे होते आणि त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ अनिश्चितता होती. काठावरच्यांना बघण्यावाचून काहीच करता येत नव्हतं. थोड्या वेळानं एकेका व्यक्तीची पकड सुटत गेली आणि पाच जण लागोपाठ वाहून गेले. प्रवाह एवढा वेगवान, की पुढेही कुणाला वाचवणं शक्य झालं नाही. निसर्गाच्या कुशीत आपण जितके आनंदी असतो, तितकेच क्षणार्धात हतबलही होतो, हाच या दुर्घटनेचा धडा.
अल्पजीवी विकासाच्या नावाखाली मूठभरांचं कोटकल्याण करणारी धोरणं, निसर्गाच्या छाताडावर तांडव करणारे जेसीबी-ब्रेकर, पर्यटनाच्या नावाखाली सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून खाण्याची प्रवृत्ती यामुळं आपण आधीच निसर्गाचा कोप ओढवून घेतलाय. अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती लवकर आपला पाठलाग सोडतील, असं वाटत नाही. त्यातच अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊन आपण अज्ञाताच्या जबड्यात शिरू लागलो आहोत. ‘मला ज्ञान नाही,’ हे किमान स्वतःसमोर मान्य करून निसर्गाच्या अवाढव्य ताकदीसमोर विनम्रतेनं नतमस्तक होण्यात निसर्गाच्याच लेकरांना कमीपणा का वाटावा?
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …