गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी 12 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. मृत 12 नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौर्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात हा थरार घडला.
या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्यासह एक जवान जखमी झाला असून, त्यांना नागपूरला हलविण्यात आलेे. 12 नक्षल्यांमध्ये टिपागड दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम आणि विशाल आत्राम यांचा समावेश आहे. उर्वरित दहा जणांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरने गेले होते. कार्यक्रम आटोपून त्यांनी जिल्हा सोडल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत वांडोली गावानजीकच्या जंगलात सी-60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली, तर अन्य एक जवान जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे. या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जवान व नक्षल्यांमध्ये सहा तास थरारनाट्य चालले. रात्री 8 वाजता चकमक थांबली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता 12 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी 3 एके-47, 2 बंदुका, 1 कार्बाईन, 1 एसएलआर, 7 ऑटोमोटिव्ह इत्यादी शस्त्रे आढळून आली आहेत. यानंतर तेथे नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही जिल्ह्यात जवान व नक्षल्यांमध्ये चकमकीचे प्रसंग घडलेले आहेत. 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्याचवर्षी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात 21 मे 2018 रोेजी 13 नक्षल्यांचा खात्मा केला होता.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …