लेख-समिक्षण

सिनेसृष्टीची पोस्टरबाजी

हॉलिवूड किंवा बॉलिवूडचे असो, चित्रपट हे केवळ जाहीरातबाजी आणि प्रचारामुळे चालतात, हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार हा केवळ पोस्टरच्या माध्यमातून व्हायचा. आजही तितक्याच आक्रमकतेने पोस्टरबाजी, जाहीरातीबाजी होते. अर्थात काळानुसार जाहीरातबाजीचे स्वरुप बदलले आणि स्रोत बदलले. भारतीय चित्रपटाच्या पोस्टरला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी एक पोस्टर तयार करण्यासाठी कलाकाराला बरेच दिवस लागायचे. आजघडीला मात्र काही तासांत भलेमोठे पोस्टर तयार केले जाते. बॉलिवूडचा इतिहास हा पोस्टर संस्कृतीशिवाय अपूर्ण आहे.
———-
पूर्वी एखाद्या चित्रपटाची जाहीरात करण्यासाठी आजच्या तुलनेत मेहनत घेतली जात नव्हती. तत्कालिन काळात स्पर्धा देखील नव्हती. आज मात्र चित्रपटाचे नाव जाहीर करण्यापासून ते प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. डिजिटल तंत्रामुळे तर प्रचार करणे खूपच सोयीचे झाले आहे. अर्थात पूर्वीच्या काळी जाहीरातीसाठी किंवा प्रसारासाठी पोस्टर हेच एकमेव प्रभावी साधन होते. या माध्यमातून प्रेक्षकांना नायक, नायिका, खलनायक समजत होते. त्याच्या कथानकाचा आधार कसा आहे, याचे आकलन व्हायचे. पोस्टर हेच निर्जिव माध्यम होते की ते लाखो लोकांच्या मनाला भिडायचे. एकुणातच पोस्टर हे तत्कालिन काळात प्रसिद्धीचे प्रभावी माध्यम होते आणि आजही आहे. पोस्टर संस्कृती ही बॉलिवूडचा अविभाज्य घटक आहे. यात चित्रपटाचा इतिहासही लपलेला आहे. एखाद्या चित्रपटाने शंभर दिवस पूर्ण केले, रौप्य महोत्सव साजरा केला किंवा गोल्डन ज्युबली केले तर वेगळे पोस्टर तयार केले जातात.
मूकपटापासून ते बोलपटाच्या सुरवातीच्या काळापर्यंत हाताने पोस्टर तयार केले जायचे. त्यानंतर त्याची छपाई करत चित्रपटागृहांत आणि शहरातील मुख्य चौकात झळकावले जायचे. आज प्रसिद्धीचे असंख्य माध्यम उपलब्ध असूनही पोस्टर संस्कृतीचे महत्त्व टिकून राहिले आहे. आज हाताने पोस्टर तयार करण्याची कला जवळपास इतिहासजमा झाली आहे. त्याची जागा मल्टीमीडियाच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने छापण्यात येणार्‍या होर्डिंग्जने घेतली आहे. संगणकाच्या मदतीने रचनात्मक पद्धतीने तयार होणार्‍या विनाईल पोस्टरचा वापर वाढला आहे. पोस्टर तयार करणार्‍यांचे देखील वेगळे विश्व आहे. हे पोस्टर चित्रपटाचा मूड काही निवडक कलाकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचते. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ.हुसेन यांनी सुरवातीच्या काळात चित्रपटांचे पोस्टर तयार करण्याचे काम केले आहे.
चित्रपटांच्या पोस्टरची सुरवात कधी झाली, हे ठोसपणे सांगता येणार नाही. पण सध्या सर्वात जुने पोस्टर 1924 मधील मराठी चित्रपट ‘कल्याण खजाना’चे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांनी पहिल्यांदा पोस्टर तयार केले. बाबूराव कृष्णराव मिस्त्री असे त्यांचे पूर्ण नाव होते. ते नाटक कंपनीसाठी सेट रंगवण्याचे काम करायचे. या कामावरून त्यांचे नाव पेंटर असे पडले. अगोदर ते चित्रपट दिग्दर्शक होते. पोस्टरचे महत्त्व बाबुराव पेंटर यांना अगोदर समजले. त्यानंतर अन्य निर्माते आणि दिग्दर्शकांनी पोस्टर छापण्यास सुरवात केली. कालांतराने पोस्टर हेच चित्रपटाच्या प्रसिद्धीचे मुख्य साधन ठरले. तत्पूर्वी बाबूराव पेंटर यांनी 1923 मध्ये वत्सलाहरण चित्रपटाच्या प्रचारासाठी पहिले पोस्टर तयार केल्याचे सांगितले जाते. एकूणातच पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाचा प्रचार करण्यास बाबूराव पेंटर यांनी सुरवात केली, असे म्हणता येईल. ते केवळ पोस्टरच तयार करत नव्हते तर चित्रपटाचे कथानक, कलाकारांंचे फोटो असलेल्या माहितीपुस्तिकेचे देखील वितरण करत असत. अशा पुस्तिकांचे प्रस्थ नंतर खूप वाढले. आलमआरा (1931) साठी त्यांनी जुबेदा यांचे तयार केलेले पोस्टर खूप गाजले. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्रची निर्मिती केली. परंतु त्याचे कोणतेही पोस्टर नव्हते. प्रदर्शनाची माहिती देणारी एक जाहीरात होती. दीड तासाच्या या चित्रपटाचे दररोज चार शो व्हायचे आणि दुप्पट तिकीट आकारले जायचे. तेव्हा वर्तमानपत्रात जाहीरात देण्याबरोबरच हँडबिल देखील दिले जायचे. कारण प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा वर्तमानपत्र हाच एकमेव मार्ग होता.
पोस्टरमध्ये वापरण्यात येणारे रंगछटा नायक, नायिका आणि खलनायकाच्या चेहर्‍यावरचे हावभाव आणि चित्रपटाचे कथानक सांगण्यास मदत करतात. याशिवाय अनेकदा विनोदी कलाकारांनी देखील या पोस्टरवर स्थान मिळविले आहे. परंतु मेहमूद, जॉनी वॉकर यांच्याइतकी प्रसिद्धी अन्य विनोदी कलाकारांना मिळाली नाही. नायकाचा चेहरा आक्रमक आणि रुबाबदार दाखवला जायचा, तर नायिकेचे सादरीकरण आकर्षक आणि उत्तेजित असायचे. खलनायकाच्या चेहर्‍यावर क्रोर्य दिसायचे. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेले दाखवले जायचे. चित्रपट दरोडेखोरांवर असेल (मेरा गाँव मेरा देश, कच्चे धागे, गंगा की सौंगध, शोले) तर नायकाच्या हातात बंदूक आणि नृत्य करणारी नायिका दाखविली जायची. पोस्टरकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जावे, अशा रितीने त्याची रंगसंगती केली जायची. पोस्टरमध्ये कलाकारांचे हावभाव दिसण्यासाठी वेगवेगळ्या रंगछटा वापरल्या जात. कथानक त्रिकोणी प्रेमावर किंवा प्रेमावर आधारित असेल तर पोस्टरवर रोमॅटिंक भाव चित्तारले जात. खलनायकाचा चेहरा हा निळ्या रंगाने रंगविला जायचा तर त्याचे ओठ लाल असायचे. यावरून त्याची क्रुरता अधिक उठावदार दिसायची.
महानायक अमिताभ बच्चन यांना अँग्री यंगमॅन करण्यात पोस्टरचा मोठा वाटा राहिला आहे. अमिताभ यांचा रागीट व आक्रमक चेहरा पाहूनच प्रेक्षक तिकीट काढायचे. पण जंजीर चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा चेहरा जया भादूरीपेक्षा लहान दाखविला होता. या चित्रपटाच्या पोस्टरवर प्राण, अजित आणि जया भादूरी यांची छाप होती. कारण ते अमिताभ बच्चनपेक्षा मोठे कलाकार होते. परंतु ‘दिवार’ चित्रपटात येईंपर्यंत अमिताभ बच्चन यांची उंची शशी कपूर यांच्यापेक्षा अधिक झाली. या पोस्टरव्यतिरिक्त कटआऊटची देखील उभारले जावू लागले. पूर्वी पोस्टरवर कलाकार, दिग्दर्शक आणि संगीतकाराचे नाव असायचे. परंतु सलीम जावेद या जोडगोळीने बॉलिवूडमध्ये धमाल उडवून दिली तेव्हा त्यांचेही नाव पोस्टरवर झळकू लागले. चित्रपटाचा प्रसार करणारे पोस्टर हे काहीवेळा वादाला देखील निमंत्रण देतात. ‘क्रिमिनल’च्या पोस्टरमध्ये नायिकेच्या हत्येवरून असे वातावरण तयार केले गेले की प्रत्यक्षात तिची हत्या झाली. शाहरुख खानचा रा-वन या चित्रपटाच्या पोस्टरचे धडाक्यात प्रदर्शन झाले. परंतु ते पोस्टर हॉलिवूडच्या एका चित्रपटाची नक्कल असल्याचे म्हटले गेले. हेट स्टोरीच्या अश्लिल पोस्टरने देखील वाद झाला. निर्माती एकता कपूरची वेब सिरिज ‘हिज स्टोरी’च्या पोस्टरने देखील वाद झाला. सुधांशू सरियाने एकता कपूरवर पोस्टर चोरीचा आरोप केला. तिच्या मते, हे पोस्टर तिचा चित्रपट ‘लोएव्ह’ च्या पोस्टरची नक्कल आहे. या वादानंतर ऑल्ट बालाजी यांनी पोस्टर उडविले. दिग्दर्शक अमजद खान यांचा चित्रपट गुल मकईवरून देखील फतवा जारी झाला होता.
काळानुसार पोस्टर तयार करण्याच्या तंत्रज्ञानात बदल होत गेले. 1960 च्या दशकांपर्यंत हाताने पोस्टर तयार केले जात होते. त्यानंतर कट पेस्ट तंत्र लोकप्रिय झाले. यात कलाकारांची प्रतिमा कापून त्याचे कोलाज करून ते पोस्टरवर चिटकविण्यात येऊ लागले. 1990 च्या दशकात पोस्टर छपाईच्या तंत्रात क्रांती झाली आणि पोस्टर केवळ चेहर्‍यापुरतीच मर्यादित राहिले नाही तर कॉम्प्यूटर डिझायनिंगने त्यास आणखी सुलभ आणि प्रभावी केले. दर्जेदार पोस्टर तयार करणारे कलाकार एवढे लोकप्रिय झाले की त्यांना वाट्टेल ती किंमत मोजण्यास नायक-नायिका तयार झाले. या पोस्टरच्या कलेने एवढी उंची गाठली की देशातील सर्वात मोठे कला महाविद्यालय मुंबईचे जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या अध्यासनात पोस्टर कलेचा समावेश करण्यात आला. – सोनम परब

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *