लेख-समिक्षण

सायकल ब्रँडची प्रेरणादायी कहाणी

१९१२ मध्ये सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या एन रंगा राव यांचे वडील शिक्षक होते. रंगा राव ६ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाने सर्व जबाबदारी रंगा राव यांच्यावर आली. लहान वयात कुटुंबाची इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांना शिक्षणाची मोठी आवड होती, पण खिशात पैसे नव्हते. घरची परिस्थिती चांगली नव्हती, अशात शिक्षण सुरूच ठेवण्यासाठी त्यांनी शाळेच्या बाहेर व्यवसाय सुरू केला. शिक्षण चालू ठेवण्यासाठी रंगा राव यांनी शाळेत बिस्किटं विक्री करण्याचं काम सुरू केलं होतं. शाळा सुरू होण्याआधी ते शाळेच्या गेटबाहेर बिस्किट विकायचे. तसंच घाऊक व्यापार्‍यांकडून मिठाई घेऊन ती काहीशा नफ्यात गावात आणि बाजारात विक्री करत होते.
यातून जी कमाई होत होती, त्यात ते घर आणि शिक्षण दोन्हीचा खर्च उचलत होते. ट्यूशनमध्ये जाण्यासाठी त्यांच्यासाठी फी नव्हती. त्यामुळे त्यांनी शिक्षकांना ते स्वत:च्या फीऐवजी इतर सहा मुलांना ट्यूशनमध्ये शिकवतील असं सांगितलं होतं. शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी तसं केलंही.
पैसे कमावण्यासाठी त्यांनी आपल्याहून लहान मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. ते गावातील वृद्धांना वृत्तपत्रही वाचून दाखवत होते. यातूनही त्यांची कमाई होत होती.१९३० मध्ये त्यांचं सीता यांच्याशी लग्न झालं. त्यानंतर ते तमिळनाडूतील अरुवंकाडूमध्ये गेले. तिथे त्यांनी एका फॅक्ट्रीमध्येे लर्कची नोकरी केली. पण त्यांचं नोकरीत मन लागत नव्हतं. १९४८ पर्यंत त्यांनी नोकरी केली त्यानंतर पुढे नोकरी सोडून त्यांनी अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू केलं. त्यांच्याकडे सेव्हिंग काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी केवळ ५० रुपयापासून आपला व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाबाबत रंगा राव यांना अधिक माहिती नसल्याने ते विविध लोकांना भेटले, त्याबाबत शिकले आणि त्यानंतर आपलं काम सुरू केलं.
त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या अगरबत्तीचं नाव सायकल ठेवलं. यामागे एक विचार होता, की हे नाव अतिशय कॉमन होतं, जे सर्वांना समजेल. ते स्वत: सायकलवर अगरबत्तीचं बंडल टाकून बाजारात विक्रीसाठी जात होते. लोकांना अगरबत्तीसाठी अधिक पैसे द्यावे लागू नयेत यासाठी त्यांनी पॅकेजिंग खर्च कमी केला. ग्रीसप्रूफ पेपरमध्ये रोल करुन ते अगरबत्ती विक्री करत होते. त्यावेळी एका आण्यात २५ अगरबत्तीचं पॅकेज मिळत होतं. आज त्यांची कंपनी ६५ देशात व्यवसाय करत आहे. सायकल प्योर अगरबत्तीची मार्केट व्हॅल्यू ७००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन, रमेश अरविंद आणि सौरभ गांगुंलीसारखे चेहेरे आहेत.

Check Also

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …