लेख-समिक्षण

सहजीवनातला आनंद आणि न्युरोसायन्स

प्रेम, भांडणं, संवाद, गैरसमज ‡हे सगळं केवळ मनाचं नाही, तर मेंदूच्या रचनेशी आणि त्याच्या कामकाजाशी जोडलेलं आहे.
खालचा मेंदू ः याला ‘ब्रेन स्टेम’ किंवा सरायव्हल ब्रेन म्हणतात. याचं मुख्य काम म्हणजे धोका ओळखणं आणि लगेच प्रतिक्रिया देणं. म्हणजेच “लढा, पळा किंवा थिजून जा’ हे तात्काळ निर्णय. जोडीदाराशी संवाद करताना तुमच्या भावना दुखावल्या जात असतील, तुम्हाला दोष दिला जात असेल, किंवा अपमान वाटत असेल तर हा भाग आपोआप सक्रिय होतो. अशावेळी तुमचा मेंदू तुम्हाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, पण परिणामी संवाद खंडित होतो आणि भांडणं सुरू होतात.
मध्य मेंदू : भावना आणि आठवणींचं केंद्र
यात अ‍ॅमिगडाला (भीतीची भावना निर्माण करणारा भाग) आणि हिप्पोकॅम्पस (आठवणी साठवणारा भाग) समाविष्ट आहे. हे भाग भावनिक आठवणी जपतात. त्यामुळे भूतकाळातील कुठलीही वेदनादायक आठवण अचानक सध्याच्या क्षणी जागृत होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पूर्वी कोणी दुर्लक्ष केलं असेल आणि आज जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर तुमच्या मेंदूला तोच धोका वाटतो आणि तीच वागणूक पुन्हा सुरू होते.
वरचा मेंदू : विचार, निर्णय आणि आत्मनियंत्रण
यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे. म्हणजे विचार करण्याची आणि परिस्थिती नीट समजून घेण्याची ताकद. नात्यात विश्वास, शांतता आणि मोकळेपण असेल, तर हा भाग काम करतो. पण धोका वाटू लागल्यावर हा भाग ‘ऑफलाइन’ होतो आणि खालचा मेंदू संपूर्ण ताबा घेतो.
जेव्हा आपल्याला दोषी ठरवलं जातं, नकार दिला जातो, किंवा हिणवलं जातं, तेव्हा आपला मेंदू झटकन लढा-पळा-थिजून जा प्रतिक्रियेत जातो. मग आपण एकतर ओरडतो, आरोप करतो, नातं तोडण्याच्या धमक्या देतो किंवा शांत राहून भावनिक अंतर ठेवतो. अशावेळी कोणतीही समजूतदार चर्चा, सहानुभूती किंवा संवाद शक्य नसतो. कारण मेंदूचा विचार करणारा भागच निष्क्रिय असतो.
पुन्हा पुन्हा तेच वागणं का घडतं?
आपल्या मेंदूने सवयींचा मार्ग तयार केलेला असतो. त्यामुळे आपण सतत जुन्याच पद्धतीने प्रतिक्रिया देतो. भांडण, शांत बसणं, टाळणं ही याची उदाहरणे आहेत. कारण बदल घडवायचा असेल तर त्यासाठी नवीन निर्णय, नवीन कृती आणि प्रयत्न करावे लागतात जे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम आहे. पण भीती, अनिश्चितता आणि वेदना यामुळे आपला मेंदू आपल्याला म्हणतो की, हे नाही जमणार!, आणि आपण पुन्हा जुन्याच वागणुकीकडे जातो.
प्रेमात पडल्यावर मेंदूत कोकेनसारखी केमिकल प्रतिक्रिया होते. डोपामिन, ऑक्सिटोसिन, हे सगळं प्रेमाची नशा वाढवतात. पण हळूहळू ही नशा कमी होते आणि मग किंवा तर प्रेम प्रगल्भतेकडे जातं, किंवा ते संघर्षात बदलतं. प्रेमाचं रूपांतर यशस्वी सहजीवनात व्हायचं असेल, तर नव्याने शिकण्याची आणि जाणीवपूर्वक कृती करण्याची तयारी लागते.
यावर उपाय म्हणजे, जोडीदाराचा राग किंवा शांतता यामागे त्याची बचावाची यंत्रणा काम करत आहे हे समजून घ्या. भांडणांमध्ये ब्रेक घ्या. जेव्हा वाटतं की तणाव वाढतोय, तेव्हा थोडा वेळ थांबा. नवीन संवादशैली शिकण्यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घ्या. जोडप्यांसाठी समुपदेशन हा “लास्ट ऑप्शन” नसून, एक सुजाण निर्णय असतो. ‘मी असाच आहे’ ही भावना बाजूला ठेवून, स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा ठेवा.
सततचा सराव आणि जाणीवपूर्वक वागणं हे मेंदूतील नव्या सवयी घडवण्याचा एकमेव मार्ग आहे.
आपल्या मेंदूकडे विकसित विचारशक्ती आहे, निवड करण्याची ताकद आहे. पण ती सवयी, भावना आणि भूतकाळाच्या आठवणींनी झाकोळलेली असते. तरीही, प्रत्येक वेळी आपण शांत राहतो, समजून घेतो, नव्यानं संवाद करतो. यातून मेंदूत नवे रस्ते तयार होतात. नातं टिकवायचं असेल, तर एकमेकांच्या सुरकुत्यांइतकंच एकमेकांच्या मेंदूच्या लपलेल्या भागांनाही ओळखणं आवश्यक आहे.

Check Also

पहिल्यांदा बाबा बनताय?

ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व …