सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा जन्म ६ जुलै १९४६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. जन्माच्या वेळी डॉटरांच्या चुकीमुळे त्यांच्या चेहर्याच्या खालच्या बाजूला, विशेषतः ओठ आणि जिभेच्या भागात पक्षाघात झाला. त्यामुळे त्यांची बोलण्याची शैली अर्धवट झाली आणि चेहर्यावर कायमस्वरूपी लकवा राहिला. हे अपंगत्व त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या सोबत राहिले. पण त्यांनी कधीही तिला शरमेची बाब समजली नाही.
स्टॅलोनचं बालपण खूप अशांत होतं. त्यांच्या आई-वडिलांचे सतत भांडण होत असत आणि शेवटी घटस्फोट झाला. स्टॅलोन व त्यांच्या भावाला शिस्त लावण्यासाठी विविध शाळांमध्ये टाकलं गेलं . पण शाळेत त्यांना नेहमी हिणवलं जात असे. कारण त्यांचं बोलणं स्पष्ट नव्हतं, चेहर्यावर विकृती होती आणि त्यांचा आत्मविश्वास खूप कमी होता. तेव्हा त्यांनी ठरवलं की, जग त्यांना नाकारणार असेल, तर ते स्वतःच स्वतःचं जग निर्माण करतील. कॉलेजमध्ये त्यांनी नाट्यकलेचा अभ्यास सुरू केला. अभिनय शिकून ते लॉस एंजेलिसला गेले. सुरुवातीला त्यांना केवळ छोट्या भूमिका मिळत होत्या. कधी गँगस्टर, कधी साईड रोल. पैसे नसल्यानं त्यांनी अनेक वेळा उपाशीपोटी दिवस काढले. काही दिवस त्यांनी झोपण्यासाठी बस स्थानकांचा आधार घेतला. एक वेळ अशी आली की, त्यांनी आपल्या प्रिय कुत्र्याला विकून टाकलं. कारण त्याच्यासाठी अन्न विकत घेण्याइतकेही पैसे उरले नव्हते. १९७५ साली त्यांनी एक बॉसिंग सामना पाहिला. महंमद अली विरुद्ध चक वेप्नर. त्या लढतीनं त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी तीन दिवसांत एका बॉसरची कहाणी लिहिली- रॉकी याची स्क्रिप्ट त्यांनी अनेक निर्मात्यांना दाखवली. सर्वांनाच स्क्रिप्ट आवडली, पण कोणीही त्यांना मुख्य भूमिकेत घेण्यास तयार नव्हतं. त्यांना ५० हून अधिक ठिकाणी नकार मिळाले. पण मी रॉकीमध्ये काम करणारच, यावर स्टॅलोन ठाम होते. शेवटी एका स्टुडिओनं स्क्रिप्ट विकत घेतली आणि त्यांच्याच अटीवर चित्रपट बनवण्यास मान्यता दिली. १९७६ साली रॉकी प्रदर्शित झाला आणि बॉस ऑफिसवर धुमाकूळ घातला. एक सामान्य, अपंग, गरीब माणूस जिद्द आणि मेहनतीने मोठा बॉसर बनतो. ही कहाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली. रॉकीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि स्टॅलोन एका रात्रीत स्टार बनला. रॉकीच्या यशानंतर त्यांनी रॅम्बोसारखे आयकॉनिक पात्र साकारलं. पण त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही स्वतः दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीत उतरून त्याने केवळ आपल्या संघर्षाच्या बळावर पुन्हा आपलं स्थान निर्माण केलं. त्यामुळेच आज स्टॅलोन हा एक यशस्वी अभिनेता, लेखक, निर्माता आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व मानला जातो हे खरे नाही काय ?
Check Also
ऊर्जादायी यशोगाथा
विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …