आनंदी आयुष्य जगण्यासाठी संगीताची साथ ही खूप मोलाची ठरते. त्यामुळेच आपल्यातील प्रत्येकाने एखादे तरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. संगीतसाधनेमुळे आयुष्यातील इतर काही गोष्टीतही सुधारणा होण्यास मदत मिळते. संगीतवाद्य शिकण्यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ.
स्मरणशक्ती वाढते ः संगीतवाद्य वाजवण्याचा एक मोठा फायदा आहे हा. संगीत ऐकणे आणि वाद्य वाजवणे ह्या दोन्ही आपल्या मेंदूला उत्तेजित करतात. त्यामुळे संगीत वाद्य शिकण्यासाठी उशीर झालेला नसतो, ते कोणत्याही वयात शिकता येते. वाद्य शिकताना मेंदू कायम सजग आणि कार्यक्षम राहात असल्यामुळे अर्थातच स्मरणशक्ती वाढते.
ताणापासून सुटका ः ताणापासून मुक्ती मिळवायची असेल तर नियमितपणे संगीत वाद्य वाजवा. आपल्याला आवडणारे कोणतेही गाणे त्यावर वाजवा. आपण आपले आवडते गाणेही ऐकू शकतो. संगीत हे तणावमुक्तीचे महत्त्वाचे साधन बनू शकते.
समाजसंपर्कात वाढ ः संगीतवाद्य शिकल्यामुळे संगीतात अधिक रस निर्माण होतो. पर्यायाने आपण मैफिलींना जातो. लोकांशी संपर्क होतो. आपण वाद्य वाजवत असल्याचे त्यांना कळते. त्यामुळे आपण सगळ्या प्रकारच्या समाजात सहजपणे मिसळू शकतो.
शिस्त लागते ः संगीतवाद्य वाढत्या वयात शिकणे तसे अवघडच जाते पण तरीही चिकाटीने ते शिकत रहा. त्याचे अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे आपल्याला एक शिस्त लागते. आपण एकूणच व्यवस्थापन शिकतो. कारण चांगला वादक होण्यासाठी शिस्त आणि योग्य व्यवस्थापन शिकावेच लागते. आपल्याला रोजच़्या रोज सराव करावा लागतो. गोष्टींचे प्राधान्यक्रम लक्षात येऊ लागतात. त्यामुळे वाद्य शिकण्यासाठी योग्य तेवढा वेळ द्या.
जबाबदार व्यक्ती ः कोणतेही वाद्य शिकताना धीर धरणे गरजेचे असते कारण शिकण्यासाठी वेळ हा लागतोच. शिवाय त्याचा जास्तीत जास्त सराव करावा लागतो. वाद्य शिकताना काही अवघड जागा, सुरांचा सराव सातत्याने करावा लागतो. त्यामुळे साहजिकच जबाबदारीची जाणीव आपल्याला होऊ लागते.
गणिती क्षमता ः संगीतातही नोटेशन घ्यावे लागते, ताल मोजावा लागतो. त्यामुळे वाद्य शिकताना आपले गणिती ज्ञानही उपयोगी पडणार आहे. संगीताचा शास्त्रीय बैठक किंवा सिद्धांत समजून घेताना बुद्धीचा कस लागतो. संगीत वाद्य शिकणार्या व्यक्ती त्यांच्या अभ्यासातही विशेष चमक दाखवतात, असे आढळून आले आहे. गणितात विशेष प्राविण्य मिळवतात. त्यामुळे इतरांच्या तुलनेत प्राविण्य, पुरस्कार पटकावण्यात संगीत वाद्य शिकणारे विद्यार्थी आघाडीवर असतात.
हेही लक्षात ठेवा ः कोणतेही वाद्य वाजवायला शिकताना आपले हात आणि नजर यांच्या हालचाली जुळायला हव्यात. जेव्हा आपण एखादे वाद्य वाजवतो तेव्हा आपल्या वहीतील नोटेशन वाचून मेंदू त्याचे विविध पॅटर्न्स आतल्या आत बनवत असतो.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …