माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा असला तरी मानवीसमूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे हे दाखवण्याची मानसिकता त्याच्यात असते. यासाठी जमेल त्या मार्गाने आपल्या सामर्थ्याचे, संपत्तीचे दर्शन घडवणारे अनेक जण समाजात दिसतात. यामध्ये आलिशान गाड्या, भव्यदिव्य विवाहसोहळे, याबरोबरीने वाहनांसाठीच्या व्हीआयपी नंबरप्लेटही मोलाची भूमिका बजावतात. भारतात अलीकडील काळात या नंबरप्लेटसाठी हजारो नव्हे तर लाखो रुपये मोजण्यास तयार असणारा एक वर्ग तयार झाला आहे. अलीकडेच हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीने एक लाख रुपये किमतीच्या स्कूटीसाठी तब्बल १४ लाख रुपये खर्च करून ०००१ क्रमांक घेतल्याचे समोर आले. या प्रवाहाविषयी आणि त्यामागील मानसिकतेविषयी
…
भारतात वाहन विकत घेणे ही केवळ वाहतूक साधनाची निवड नसून, अनेक वेळा ती वैयक्तिक प्रतिष्ठा, सामाजिक ओळख आणि आर्थिक सामर्थ्य यांची झलक ठरते. या प्रतीकात्मकतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हीआयपी नंबर प्लेट्स. वाहनाच्या नोंदणी क्रमांकातील काही विशिष्ट आकडे (उदा. ०००१, ९९९९, ७७७७, १२३४, इ.) मिळविण्यासाठी काही व्यक्ती लाखो रुपये खर्च करतात. पण हा केवळ शौक आहे की या मागे काही खोल सामाजिक व आर्थिक कारणे असतात? जिथे, सर्वसामान्यांना लाखाच्या घरात गेलेल्या दुचाकी खरेदी करताना उसनवार्या कराव्या लागतात, बँकांचे कर्ज घ्यावे लागते, तिथे केवळ मनासारखा वाहनक्रमांक मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, हे आर्थिक विषमतेचे विदारक वास्तव आहे.
भारतीय समाजात अंकशास्त्र, सौंदर्यदृष्टी व व्यक्तिमत्व दर्शविण्याची इच्छा यांना महत्त्व दिले जाते. चारचाकी वाहनाच्या नंबर प्लेटवरील ०००१ अथवा ०७८६ हे आकडे एखाद्याच्या धार्मिक श्रद्धा, व्यवसायिक आत्मविश्वास किंवा राजकीय ओळखीचे संकेत ठरतात. या क्रमांकांकडे पाहणारा समाज त्या व्यक्तीचा दर्जा, त्याची सामाजिक प्रतिष्ठा किंवा त्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधतो.
अधिकृत लिलाव प्रक्रिया
आणि उत्पन्नाचा स्रोत
आज भारतातील अनेक राज्यांमध्ये वाहन नोंदणीसाठी विशेष व्हीआयपी नंबर लिलाव पद्धतीने दिले जातात. उदा. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब इ. राज्यांमध्ये ०००१, ०००९, ०७८६ यांसारख्या नंबरसाठी बोली लावली जाते. या लिलाव प्रक्रियेत काही वेळा लाखो रुपयांपर्यंत बोली जाते. २०२३ मध्ये पंजाबमध्ये ०००१ क्रमांकासाठी एका व्यावसायिकाने २२ लाख रुपये मोजल्याची बातमी झळकली होती. हे सरकारसाठी उत्पन्नाचे एक माध्यम असले तरी, यात उच्चभ्रू वर्गाचे वर्चस्व स्पष्ट दिसते.
अलीकडेच, हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील संजीव कुमार यांनी एक लाख रुपये किमतीच्या स्कूटीसाठी तब्बल १४ लाख रुपये खर्च करून ०००१ क्रमांक घेतला. त्यांच्या आधीही देशभरात अनेक उदाहरणे आहेत जिथे फक्त नंबर प्लेटसाठी १०-२० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली गेली आहे. या कृतीचा उगम एका मूलभूत विचारसरणीत आहे, ती म्हणजे ‘मी काहीतरी वेगळं, उठून दिसणारं करत आहे.’ समाजाच्या नजरेत उठून दिसण्यासाठी काही लोक वाहनाची किंमत नव्हे, तर त्यावरील नंबरच जास्त मौल्यवान मानतात. २०२३ मध्ये दुबईत ‘पी ७’ ही नंबर प्लेट तब्बल १२२ कोटी रुपयांना विकली गेली. ही आतापर्यंतची जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही तिची नोंद झाली आहे.
भारतात प्रत्येक वाहनासाठी आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) द्वारा ०००१ ते ९९९९ या मालिकेतील क्रमांक जारी केले जातात. त्यामधील ०००१, ००७, ७७७७, ९९९९, ४२० यांसारख्या खास व लक्षवेधी क्रमांकांना ’व्हीआयपी’ किंवा फॅन्सी नंबर म्हणतात. या क्रमांकांची नोंदणी सर्वसामान्य प्रक्रियेनुसार न होता, ती ऑनलाइन लिलावाच्या (ई-ऑशन) प्रक्रियेद्वारे होते. इच्छुक व्यक्तींना ही संख्या मिळवण्यासाठी बोली लावावी लागते.
केंद्र सरकारच्या ‘फॅन्सी डॉट परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करून इच्छुक ग्राहक आपल्याला हवे असलेले फॅन्सी नंबर निवडू शकतात. त्यानंतर संबंधित राज्य, आरटीओ कार्यालय निवडून त्यासाठी लिलावामध्ये सहभागी होता येते. सर्वात जास्त बोली लावणार्या व्यक्तीला तो क्रमांक मिळतो.
यासाठी बेसप्राईस निर्धारीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार दुचाकींसाठी ५,००० ते ५०,००० रुपये, चारचाकी वाहनांसाठी : २०,००० ते १,००,००० रुपये, कमर्शियल वाहनांसाठी दहा हजार ते पन्नास हजार, सुपर व्हीआयपी क्रमांकांसाठी (०००१, ००७ यांसारखे क्रमांक) ५०,००० ते २,००,००० रुपये. राज्यनिहाय ही किंमत वेगवेगळी असते. उदा. दिल्लीत ०००१क्रमांकासाठी एक लाख रुपयांपासून लीलाव सुरू होतो; तर केरळमध्ये ५०,००० पासून लीलाव सुरू होतो.
प्रशासकीयदृष्ट्या पाहता, व्हीआयपी नंबर मिळाल्यानं कोणतेही विशेष सवलती, कायदेशीर लाभ अथवा अधिकृत अधिकार मिळत नाहीत. पण समाजाच्या नजरेत यातून एक ‘प्रभाव’ निर्माण होतो. व्यक्तीला स्टेटस सिम्बॉल लाभतो. अनेक जण अशा क्रमांकाचा वापर व्यावसायिक प्रचारासाठी, सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी करतात. असे आकडे विकत घेणारे लोक बहुधा धनाढ्य, राजकीय किंवा सिनेसृष्टीशी संबंधित असतात. उदाहणार्थ सलमान खानचे वाहन ‘२७२७’ किंवा महेंद्रसिंग धोनीचा ‘०००७’ क्रमांक. या नमुन्यांमुळे सामान्य लोकांमध्ये देखील व्हीआयपी नंबर म्हणजे प्रतिष्ठा असा समज तयार होतो.
अनेकदा व्हीआयपी नंबर निवडण्यामागे ज्योतिषशास्त्रीय गणना, लकी नंबर, मुलांचा जन्मदिनांक, किंवा धार्मिक विश्वास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, मुस्लिम समाजात ७८६ या नंबरला धार्मिक महत्त्व आहे; बरेच हिंदू लोक ९, १ किंवा ३ यांना शुभ मानतात. या श्रद्धाळूपणाला व्यावसायिक भांडवलशाहीने तिला बाजारात विक्रीयोग्य उत्पादनात रूपांतरित केलं आहे.
व्हीआयपी नंबरचे गुन्हेगारी संदर्भ
गंभीर बाब म्हणजे काही वेळा या ‘विशेष’ नंबरचा गुन्हेगारी कारणांसाठी गैरवापर होतो. खोट्या ओळखीपासून ते पोलिसांच्या लक्षातून बचावासाठी महागडा व्हीआयपी नंबर हे वाहन सामान्य वाटू नये म्हणून वापरला जातो. यामुळे वाहतूक नियंत्रण यंत्रणेसाठी अडचणी निर्माण होतात. जेव्हा सरकार आणि समाज व्यक्तीला आत्म-समाधान देणारी किंवा गुणवत्तेवर आधारित प्रतिष्ठा) पुरवू शकत नाही, तेव्हा अशी बाह्य चिन्हं त्यासाठी वापरली जातात, असे समाजशास्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. व्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये खर्च करणे ही व्यक्तीची खासगी पसंती असली तरी यातून आर्थिक व सांस्कृतिक वर्चस्व जपण्याची मानसिकता दिसून येते आणि सामाजिक समतेच्या प्रक्रियेतील मोठा अडसर आहे. -प्रसाद पाटील
Check Also
१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता
राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री …