राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती, उद्योग यानंतर शिक्षण हा एक महत्त्वाचा गाभा घटक असतो. कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य हे त्या देशात शिक्षणावर होणार्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. अलीकडच्या काळात 1995 नंतर जागतिक स्तरावर अर्थशास्रज्ञ शिक्षणाला शाश्वत विकासाचे एक साधन मानत आहेत आणि जगभरात शिक्षणाकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. कारण शिक्षण आणि कौशल्य विकासावर राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. संशोधन आणि विकास हाच खरा अर्थव्यवस्थेचा पाया असतो. या अनुषंगाने मोदी3.0 सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात शिक्षण विषयक केलेल्या तरतुदींकडे पाहावे लागेल.
एकूण शिक्षणावरील खर्च 1.84 दशलक्ष एवढा दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण या सर्व घटकांचा समावेश आहे. माहितीच्या आधारे असे नमूद करण्यात आले आहे की, युजीसीवर करण्यात आलेली तरतूद थोडी कमी करण्यात आली आहे; आयआयटीवरील तरतूदही कमी करण्यात आली आहे; परंतु एलिमेंटरी शिक्षणावरती म्हणजे प्राथमिक शिक्षणावर तरतूद वाढवण्यात आली आहे. याही पलिकडे जाऊन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन उच्च शिक्षण क्षेत्रात 2500 विद्यार्थ्यांना 75 लाख रुपयापर्यंत एज्युकेशन व्हाऊचर म्हणजे शिक्षण विषयक स्टायपेंड किंवा अभिवृद्धी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक तरतुदीचा अडसर आता राहाणार नाही. दुसरीकडे, उच्च शिक्षण संस्थांनासुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञानापासून वंचित ठेवता येणार नाही. या रकमेसाठी व्याजदर केवळ तीन टक्के ठेवण्यात आलेला आहे. ही तरतूद हेच सांगते की, शिक्षण आणि कौशल्य विकास हा राष्ट्राचा आत्मा आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकास हेच खरे भविष्याचे सामर्थ्य आहे. महात्मा गांधींनी 1937 मध्ये बिर्ला भवन येथे केलेल्या भाषणात असे म्हटले होते की, भारतीय शिक्षणाचे भवितव्य कौशल्यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपण कौशल्य विकसनाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याअनुषंगाने गांधीजींच्या ‘नई तालीम’मधील हे सूत्र घेऊन मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षापासून कौशल्य विकासावर भर देण्यात येत असून यावर्षीच्या अर्थसंकल्पातही या मुद्दयाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते.
या अर्थसंकल्पात बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान विषयक संशोधनाला चालना देण्यासाठी 2500 संस्थांची उभारणी करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. अलीकडे शेतीच्या संशोधनामध्ये उत्पादकता कशी वाढवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान बदलाच्या काळात टिकतील अशी अव्वल दर्जाची पिके कशी तयार करता येतील, त्यावरील रोगराईचा सामना कसा करता येईल या अनुषंगाने कृषी जैवतंत्रज्ञान विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याअनुषंगाने प्रस्तावित जैवतंत्रज्ञान विषयक संस्थांचा लाभ येणार्या काळात ग्रामीण तरुणांना घेता येऊ शकेल.
– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर,ज्येष्ठ विचारवंत
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …