लेख-समिक्षण

‘विशेष’ खेळाडूंची दमदार कामगिरी

भारतीय खेळाडूंचा पदकांचा पाऊस अद्याप थांबलेला नाही. पॅरिस येथील पॅरालंपिकच्या बातम्या देशाच्या गौरवात भर घालणार्‍या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी एवढ्या संख्येने भारताच्या पदरात पदके पडलेली नव्हती. अर्थात हा मुद्दा केवळ देशाच्या दिव्यांग खेळाडूंकडून प्रस्थापित केल्या जाणार्‍या विक्रमाचा नसून पॅरिस पॅरालंपिकची पदकांची यादी पाहिली तर ही भारतीयांची बदलणारी मानसिकता आणि दृष्टीकोन याचा एक आदर्श नमूना म्हणावा लागेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यशाने भारावून गेले आहेत. पदक जिंकणार्‍या खेळाडूंशी टेलिफोनवरून चर्चा करताना त्यांनी तुम्ही मिळवलेल्या यशाने देशातील युवापिढी प्रेरणा घेईल, असा आशावाद व्यक्त केला. पंतप्रधानांच्या वक्तव्याला आणखी एक गोष्ट जोडता येईल आणि ती म्हणजे या कामगिरीने देशातील तरुणाईत आणि दिव्यांग खेळाडूंत नव्याने आत्मविश्वासाची ऊर्जा भरली जाईल आणि वास्तविक ती गरज अनेक काळापासून व्यक्त केली जात होती.
इंग्रजी भाषेत दिव्यांगांसाठी पूर्वी डिसॅबल किंवा अपंग या शब्दांचा वापर केला जात होता. परंतु आता शब्दावलीत बदल केला आहे. त्याजागी स्पेशल अ‍ॅबल्टड पर्सन म्हणजे विशेष क्षमतेची व्यक्ती हा शब्द आला.खरोखरच पॅरिस पॅरालंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी आपण विशेष क्षमतेचे, प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याचे सिद्ध करून दाखवले. खर्‍या अर्थाने ते एका अशा ठिकाणाहून पॅरिसला गेले होते की तेथे खेळाडूंना पायाभूत सुविधा, पुरेसे पाठबळ आणि सोयी दिल्या जात नसल्याची ओरड होते. कोणत्याही ऑलिंपिक स्पर्धेनंतर आणि आंतराष्ट्रीय पातळीवरच्या खेळानंतर देशातील वर्तमानपत्रांत वैचारिक लेखातील शेवटचा मुद्यांत भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलेली असते आणि सुविधा नसल्याबद्धल सरकारवर खापर फोडले जाते. सध्या क्रिकेटशिवाय अन्य कोणत्याच खेळाकडे लक्ष दिले जात नसल्याचे वाटत असतानाा दिव्यांग खेळाडूंनी पॅरिसमध्ये धमाकेदार कामगिरी करत दररोज एकतरी पदक देशाला जिंकून दिले आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारात आपल्या खेळाडूंनी बाजी मारलीे. नेमबाजी, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, ज्युडो असे कितीतरी प्रकार सांगता येतील. महिला खेळाडूंही जिंकत आहेत अणि त्याजोडीला पुरुषही मैदान मारत आहेत.
अपेक्षेपेक्षा अधिक पदक आपले विशेष खेळाडू जिंकत आहेत. अशावेळी सामान्य खेळाडूंना आपल्या कामगिरीत सुधारणा का करता येत नाही? हा प्रश्न आहे. ते याच वेगाने वाटचाल का करत नाहीत? यावर क्रीडासंघाने, संघटनांनी गांभीर्याने विचार करायला हवा. — नितीन कुलकर्णी,क्रीडा अभ्यासक

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *