अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत जे घडले ते केवळ आकड्यांपुरते नव्हते, तर प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यूमागे एक वेगळी कहाणी दडलेली होती. हा पहिला किंवा शेवटचा अपघात नव्हे. आजवर अनेक हृदयद्रावक विमान अपघात झाले असून त्यातील काहींच्या कहाण्या रुपेरी पडद्यावरही दिसल्या. मात्र ज्या सत्य घटनांवर चित्रपट झाले, त्यांच्या कहाण्यांचा शेवट तुलनेने आशादायक होता. तरीही अशा दुर्दैवी आणि भावनात्मक कहाण्यांवर चित्रपट करणे हे फारच मोठ्या धैर्याचे काम असते. भारतात या प्रकारचे चित्रपट मोजकेच झाले, पण हॉलीवूडने मात्र अशा कहाण्यांवर अनेक प्रयोग केले. अशा अपघातांच्या आठवणी जिवंत ठेवणारे काही चित्रपट आठवतात. काहींमध्ये प्लेन क्रॅश, काहींमध्ये हायजॅक तर काहींमध्ये इमर्जन्सी लँडिंग यांसारख्या थरारक घटना दाखवल्या गेल्या. अशा घटना केंद्रस्थानी असलेले चित्रपट विशेष गाजले. या कथांमध्ये भय, रहस्य आणि माणसांच्या धैर्याचे दर्शन घडते. मात्र, अशा कथांचे अधिक प्रयोग हॉलीवूडमध्ये झाले.
हिंदी चित्रपटांपैकी काही निवडक चित्रपटांमध्ये अशा घटना मांडल्या गेलेल्या दिसतात. नीरजा, फ्लाइट, हायजॅक, जमीन, एयरलिफ्ट, बेलबॉटम, आयसी-८१४ : कंधार हायजॅक यांसारखे चित्रपट विमान दुर्घटनांवर आधारीत होते. विशेष म्हणजे यातील बहुतांश चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने त्यांना अधिक वजन प्राप्त झाले. २०२४ मध्ये आलेला आयसी-८१४ : कंधार हायजॅक हा ओटीटीवर प्रदर्शित झालेला चित्रपट होता. ४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूपासून दिल्लीकडे जाणारी फ्लाईट आयसी-८१४ पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केली होती. नंतर हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार एअरपोर्टवर उतरवले गेले. प्रवाशांच्या बदल्यात या दहशतवाद्यांनी भारतात तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांची सुटका करण्याची अट ठेवली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही वादही झाले, पण प्रेक्षकांनी मात्र या थरारक कहाणीला भरभरून प्रतिसाद दिला. २०१६ मध्ये आलेला ‘नीरजा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात खोलवर उतरला. हा चित्रपट १९८६ साली कराचीमध्ये फ्लाइट-७३ हायजॅक करण्याच्या घटनेवर आधारित होता. नीरजा भनोट नावाच्या धैर्यशील एअर होस्टेसने ३५९ प्रवाशांचे प्राण वाचवताना आपला जीव गमावला होता. तिची भूमिका सोनम कपूरने साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले.
अपहरण किंवा विमान अपघात यांच्या पलिकडेही काही कहाण्या असतात. यामध्ये युद्धभूमीवर अडकलेल्या भारतीयांना विमानांद्वारे सुरक्षित बाहेर काढण्याचे मिशन महत्त्वाचे ठरते. २०१६ मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या ‘एयरलिफ्ट’ चित्रपटात अशाच कथानकावर काम झाले. रंजीत कटियाल नावाचा व्यापारी १९९० च्या खाडी युद्धात १ लाख ७० हजार भारतीय नागरिकांना कुवैतमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारत सरकारच्या मदतीने प्रयत्न करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमानांनी बचावकार्य कसे केले गेले, हे या चित्रपटात दाखवले गेले.
बेल बॉटम (२०२१) या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने रॉ एजंटची भूमिका निभावली होती. हा चित्रपट १९८० च्या दशकातील एका प्रत्यक्ष घडलेल्या हायजॅक प्रकरणावर आधारित होता. हायजॅक नावाच्या एका चित्रपटात शायनी आहूजाने आपली लहानगी मुलगी वाचवण्यासाठी एअरपोर्ट इंजिनिअर बनणार्या नायकाची भूमिका साकारली होती. ‘जमीन’ या चित्रपटात अजय देवगण आणि अभिषेक बच्चन हे दोघे दहशतवाद्यांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मिशनवर निघतात आणि यशस्वी होतात असे दाखवण्यात आले होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये रोमांच होता. ‘जमीन’ चित्रपट मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही अनेकदा पाहिला गेला.
रनवे ३४ (२०१५) या चित्रपटात अजून वेगळा दृष्टिकोन होता. पायलटच्या निर्णयशक्तीवर, अनुभवावर आणि त्यातून होणार्या परिणामांवर आधारित ही कथा होती. अजय देवगणने यामध्ये कॉकपिटमध्ये बसलेला अनुभवी पायलट विक्रांत खन्ना साकारला होता, ज्याला आपल्या अनुभवावर अतूट विश्वास होता. त्याचा निर्णय, एकीकडे प्राण वाचवणारा ठरतो, तर दुसरीकडे चौकशीस पात्र ठरतो. अजय देवगणनेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.
विविध देशांच्या सिनेसंस्कृतींमध्ये विमान अपघात हे नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे विषय राहिले आहेत. हॉलीवूडमध्ये या विषयावर जवळपास ४४ चित्रपट तयार झाले आहेत. त्यातील काही चित्रपट आजही ‘ऑल टाइम बेस्ट’ मानले जातात. यात विमान प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कसे कष्ट केले गेले, त्याचे दाखले मिळतात. विमान अपघात हे विषय नेहमीच संवेदनशील राहिले आहेत, म्हणूनच ते अधिक परिणामकारक ठरतात.
२००० साली आलेला ‘फायनल डेस्टिनेशन’ हा चित्रपट एक भयप्रद संकल्पनेवर आधारित होती. अलेझ नावाच्या एका तरुणाला स्वप्न पडते की, ज्या विमानात तो आहे, ते अपघातग्रस्त होणार आहे. तो घाबरून विमानातून उतरतो आणि प्रत्यक्षात विमान अपघात होतो. मात्र त्याचे मित्र नंतर अजब अपघातांत मृत्युमुखी पडू लागतात. या चित्रपटात दाखवलेले विमान अपघाताचे दृश्य इतके परिणामकारक होते, की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत. त्याच वर्षी आलेला ‘कास्ट अवे’ देखील विमान अपघातावर आधारित होता. यात टॉम हँसने साकारलेली व्यक्तिरेखा एका निर्जन बेटावर जिवंत राहण्यासाठी करत असलेल्या संघर्षाचे प्रातिनिधिक चित्रण होते. ही कथा केवळ अपघाताची नव्हती, तर माणसाच्या जगण्याच्या इच्छाशक्तीची होती.
२०१६ मध्ये आलेला सुली हा चित्रपट चेसली सली सलेनबर्गर या एका अमेरिकन पायलटच्या सत्यकथेवर आधारित होता. २००९ मध्ये दोन्ही इंजिन बिघडलेल्या विमानाला त्यांनी न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर सुरक्षित उतरवले होते. सर्व प्रवासी वाचले, पण चौकशी समितीने त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टॉम हँसने साकारलेला हा पायलट मानवी निर्णयशक्तीची आणि प्रसंगावधानाची उत्कृष्ट मिसाल होता.
२०१४ मधील नॉन-स्टॉप हा चित्रपट सुद्धा एक थरारक विमानकथेवर आधारीत होता. एका अमेरिकी एअर मार्शलला फ्लाइट दरम्यान एक धमकी मिळते की जर पैसे दिले नाहीत तर प्रत्येक २० मिनिटांनी एक प्रवासी मरण पावेल. तो मारेकर्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो, विमानातील प्रत्येक जण संशयित ठरतो. ही कथा प्रेक्षकांना एक वेगळी भीती आणि उत्कंठेचा अनुभव देणारी ठरली.
२०१२ मधील फ्लाइट हा चित्रपट सुद्धा विमान अपघातावर आधारित होता. यातील पायलट एक मोठा अपघात टाळतो, पण त्याचे खरे स्वरूप नंतर उघड होते. १९९३ मध्ये आलेल्या अलाइव या चित्रपटातही विमान अपघाताचे भावनिक चित्रण आहे. ही कहाणी पर्वतरांगेतील विमान दुर्घटनेवर आधारित होती. तिथेे काहींनी जिवंत राहण्यासाठी मृतांचं मांस खाल्ल्याचे दाखवण्यात आले.
१९५२ मध्ये झालेल्या एका खर्या अपघातावर आधारित जुबैदा हा चित्रपटही लक्षात राहणारा ठरला. श्याम बेनेगल दिग्दर्शित या चित्रपटात जोधपूरचे महाराज आणि त्यांची दुसरी पत्नी जुबैदा बेगम यांचा अंत विमान अपघाताने होतो. चित्रपटात करिश्मा कपूर, रेखा आणि मनोज बाजपेयी यांच्या भूमिका होत्या. जुबैदा बेगम या ४०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचा मृत्यू २६ जानेवारी १९५२ रोजी एका विमान अपघातात झाला होता.
या सार्या घटनांचा आणि चित्रपटांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, विमान अपघात, हायजॅक, आणि हवामार्गीय मिशन्स यांवरील चित्रपट केवळ मनोरंजन नसून, ते एक प्रकारची मानवी शौर्यकथा, संघर्षगाथा आणि वास्तववादी इतिहास सांगतात. यातून प्रेक्षकाला नवा अनुभव मिळतो, जो केवळ पडद्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याच्या भावविश्वाला व्यापून टाकतो.- सोनम परब
Check Also
अमिताभ बनणार जटायू
बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात …