लेख-समिक्षण

विज्ञानयुगातील दीपस्तंभ

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असून खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे कार्य कायम स्मरणात राहील. डॉ. नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे एक थोर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. ते ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे अभ्यासक होते. डॉ. नारळीकर यांनी आपल्या संशोधनातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या पीएच.डी प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि सृष्टीच्या निर्मितीसारख्या विषयांचा समावेश होता. त्यांनी विश्वाच्या स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडून खगोलशास्त्राला एक वेगळी दृष्टी दिली. हॉईल यांच्या समवेत त्यांनी गुरुत्वाकर्षणसदृश सिद्धांत सादर केला, ज्यामुळे विशोत्पत्ति शास्त्रात महत्त्वाचे योगदान दिले. डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये विपुल लेखन केले. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘अभयारण्य’, ‘वामन परत ना आला’, ‘अंतराळ’, ‘भस्मासुर’, ‘व्हायरस’, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ यांचा समावेश होता. ‘चार नगरात माझे विश्व’ आणि ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’ ही त्यांची आत्मचरित्रे आहेत. ‘चार नगरात माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्ये कळावीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञान कथांमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ हॉईल-नारळीकर थिअरी प्रसिद्ध झाली होती. विश्वाची निर्मिती महास्फोटातून झाली की, ते स्थिर स्थितीत आहे. असे दोन मतप्रवाह खगोल व भौतिक तज्ज्ञांमध्ये होते. हॉईल-नारळीकर यांचा सिद्धांत स्थिर स्थिती विश्वाची कास धरणारा होता. डॉ. नारळीकर यांनी वयाच्या २६ व्या वर्षी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला आणि ते स्वतंत्र भारतातील विज्ञान जगताचा चेहरा ठरले. या सिद्धांतातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवल्यानंतर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधन आणि लोकप्रियता अधिक उंचावण्यासाठी ते भारतात परतले. डॉ. नारळीकरांच्या अचाट बुद्धिमत्तेची कल्पना असल्याने १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना बोलावून घेतले आणि डॉ. नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये दाखल झाले. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठ’ स्थापन करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. डॉ. नारळीकरांनी विज्ञानकथा इतक्या रसाळ भाषेत, सोप्या आणि सुलभरीत्या मांडल्या की, वाचकांना त्याची चटक लागली. त्यांची लेखणी कायम महाराष्ट्राला विज्ञानसाक्षर करण्यासाठी झिजत राहिली. भारताच्या या महान वैज्ञानिकास भावपूर्ण श्रद्धांजली.– जगदीश काळे

Check Also

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …