णूस जास्तीत जास्त किती वर्षेजगू शकतो? शतायुषी व्यक्ती अतिभाग्यवान मानली जाते. अर्थात, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आपण सामाजिक नीतिनियम मोडले तर तो गुन्हा ठरतो आणि गांभीर्यानुसार त्याची शिक्षाही मिळते. गुन्हा अतिगंभीर असेल तर आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. अशी व्यक्ती शतायुषी झाल्यास ती भाग्यवान नव्हे तर शापित ठरेल. हा विचार मनात येण्याचं कारण अॅडम ब्रिटन नावाच्या व्यक्तीला झालेली 249 वर्षांच्या कारावासाची शिक्षा. हा तसा प्रसिद्ध माणूस. अगदी जगप्रसिद्ध. नॅशनल जिओग्राफिक प्रॉडक्शन्ससारख्या मान्यवर संस्थांसोबत काम केलेला प्राणिशास्त्रज्ञ. मगर हा त्याच्या संशोधनाचा मुख्य विषय. अशा मान्यवराकडून असा कोणता अपराध घडला, की दिलेली शिक्षा भोगायला त्याला अनेक जन्म घ्यावे लागतील? अॅडम ब्रिटनविरुद्धचा खटला अनेक कारणांनी जगभरात बहुचर्चित ठरला. विशेष म्हणजे, सुनावणीदरम्यान समोर येणारी वर्णनं धक्कादायक असू शकतात म्हणून मुख्य न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी केवळ उपस्थितांनाच नव्हे तर कर्मचार्यांनाही कक्षातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला. याच सुनावणीत ‘पॅराफिलिया’ हा शब्द चर्चेत आला. अॅडमला हा आजार असल्याचं त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्याचं कृत्य अत्यंत बीभत्स, किळसवाणं आहे. त्याच्यावर असंख्य कुत्र्यांचं लैंगिक शोषण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला. कुत्र्यांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर तो त्यांना अत्यंत क्रूरपणे मारत असे.
शक्यतो ज्याची जाहीर चर्चा होत नाही आणि ती फारशी योग्यही वाटत नाही, असा हा विषय. परंतु मनोविश्लेषणाच्या अंगाने चर्चा आवश्यकही ठरते. शारीरिक आजारांप्रमाणं मनोविकारांची दखल घेतली जात नाही, मग उपचार तर दूरच राहतात! असे आजार घेऊन फिरणारी व्यक्ती आपल्या अवतीभोवती असू शकते आणि ती त्रासदायक ठरू शकते. परगावी जाणार्यांना आपल्या पाळीव प्राण्यांचं काय करायचं, याची चिंता असते. असे लोक हेरून अॅडम त्यांना गाठायचा आणि त्यांची कुत्री सांभाळायला घ्यायचा. प्राणिपालनाच्या अनुभवाविषयी कुणी विचारलंच, तर अॅडम त्यांना खोट्या कहाण्या सांगायचा; जुने फोटो पाठवायचा. कुत्री ताब्यात घेतल्यावर तो एका शिपिंग कंटेनरमध्ये नेऊन त्यांच्याशी अनैसर्गिक कृत्य करायचा. या कंटेनरमध्ये कॅमेरे बसवलेले होते. हे रेकॉर्डिंग तो स्वतःची ओळख लपवून इतरांच्या नावानं किंवा निनावी व्हायरल करायचा. ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरी पोलिसांनी अशाच व्हिडिओवरून माग काढून त्याला अटक केली. अटकेपूर्वीच्या 18 महिन्यांत त्याने 42 कुत्र्यांचं लैंगिक शोषण केल्याचं निष्पन्न झालंय. त्यापैकी 39 कुत्र्यांचा मृत्यू झाला. ऐकतानाच शिसारी आणणारा हा आत्यंतिक घृणास्पद प्रकार! चार्लस डार्विन विद्यापीठात महत्त्वाचं पद भूषवलेल्या जगद्विख्यात प्राणिशास्त्रज्ञाच्या हातून हे काय घडलं ? त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलेला ‘पॅराफिलिया’ आजार काय आहे? प्राप्त माहितीनुसार, प्रारंभिक जीवनात झालेल्या एखाद्या आघातामुळं मनोलैंगिक विकासात अडथळे येऊन असे विकार होऊ शकतात. अशा व्यक्तींच्या उत्तेजनांचा पॅटर्न सामान्यांपेक्षा खूपच वेगळा, विचित्र, विकृत आणि हिंस्र असू शकतो. ‘पॅराफिलिया’चे व्यक्तीपरत्वे उपप्रकार आणि तीव्रतेनुसार स्तरही आहेत. दखल घ्यावीशी वाटत नाही; पण घेण्यावाचून गत्यंतर नाही, अशा मनोविकारांबाबत वेळीच सावध झालं पाहिजे.-हिमांशू चौधरी
Check Also
जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …