अलीकडे इंदूरमध्ये जी घटना घडली ती फिल्मी कथानकापेक्षा अधिक रोमांचक आहे. एका पत्नीने लग्नाच्या केवळ दोन आठवड्यांतच आपल्या पतीचा हनिमूनदरम्यान भाडोत्री मारेकर्यांकडून खून करवला. कट असा रचला गेला की पोलिसही थक्क झाले. एक असा थरकाप उडवणारा कट ज्यात प्रेमाचं नाटक होतं, फसवणूक होती आणि खूनदेखील! हा खून अनेक फिल्मी कथानकांची आठवण करून देतो. असं म्हणता येईल की ही घटना चित्रपटसृष्टीतूनच बाहेर आलेली गोष्ट वाटावी किंवा एखाद्या ‘रील’मधून साकारलेली ‘रिअॅलिटी’ ! – सोनम परब
————-
आपल्याकडे बेवफाई किंवा प्रतारणा या मनोवृत्तीवर आधारित डझनभर चित्रपट तयार झाले, पण इंदूरच्या सोनम रघुवंशीने जी कृत्ये केलं, ती गोष्ट चित्रपट कथानकांच्या सीमेपलीकडची आहेत. भारत हा परंपरावादी आणि सुसंस्कृत समाज असलेला देश आहे. अशा वेळी पत्नीने आपल्या पतीचा खून करवणं, अशा घटनांना प्रेक्षक अमान्य करू शकतात. ह्याच शयतेमुळे निर्मात्यांनी अशा विषयांना हात घालण्यात बहुतांश वेळा कच खाल्ली. चित्रपटकारांसाठी हा विषय निषिद्ध होता, असे नाही. चित्रपट निर्माते बी.आर. चोप्रांसाठी ‘बेवफा’ पत्नी हा केवळ आवडता आणि बॉस ऑफिसवर फायदेशीर विषय नव्हता, तर त्यांनी अशा पत्नीने चांगल्या पतीचा खून करण्याचा कट साकारण्याचं धाडसही दाखवलं.
दिग्दर्शनात आपली छाप उमटवल्यानंतर जेव्हा बी.आर. चोप्रांना स्वतंत्र निर्माता बनण्यासाठी अशोक कुमार यांनी प्रेरित केलं, तेव्हा त्यांनी पहिल्याच चित्रपटासाठी विश्वासघातकी पत्नीच्या हातून पतीच्या खुनासारखा ऑफबीट विषय सुचवला. हा १९५१ चा काळ होता, तेव्हा अशा विषयावर चित्रपट बनवणं म्हणजे आत्मघातकी पाऊलच होतं. पण चोप्रांनी धाडस दाखवलं आणि अशोक कुमार, कुलदीप कौर, प्राण व जीवन यांना घेऊन आय.एस. जोहर यांच्या कथा, पटकथा आणि संवादावर ‘अफसाना’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं. या चित्रपटाने प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवली आणि बॉस ऑफिसवरही खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी ‘गुमराह’, ‘हमराज’ आणि ‘धुंध’ या चित्रपटांतही पत्नीच्या विश्वासघाताचे विविध किस्से सेल्युलॉइडवर उतरवत बॉस ऑफिसवर धूम उडवून दिली. नव्या काळात दिलीप कुमार, शर्मिला टागोर, बिंदू आणि प्रेम चोप्रा यांना घेऊन त्यांनी ‘अफसाना’चाच रीमेक ‘दास्तान’ तयार केला. पण, हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विश्वासघातकी पत्नीने पतीचा सुनियोजित खून करण्याचा जाळं विणणारे कथानक आणले. इत्तेफाक’ या नावाने तयार झालेल्या या चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि नंदा हे कलाकार होते. या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉस ऑफिसवर कमाल केली.
बी.आर. चोप्रांच्या या परंपरेला त्यांच्या धाकट्या भावाने, म्हणजे यश चोप्रांनीही पुढे चालना दिली. बी.आर. फिल्म्सपासून वेगळं होत त्यांनी राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी यांना घेऊन ‘दाग’ हा चित्रपट तयार केला. यातसुद्धा बेवफाईचं चित्रण होतं. त्यानंतर त्यांनी देव आनंद, हेमा मालिनी, राखी, बिंदू आणि प्राण यांना घेऊन ‘जोशीला’ हा चित्रपट तयार केला. यातसुद्धा बिंदू आपला पती प्राण याच्याशी प्रतारणा करून त्याचा खून करण्याचा कट रचते. अनेक कारणांमुळे ‘जोशीला’ प्रेक्षकांना गुंतवू शकला नाही. तरीही हा विषय मात्र मागे पडला नाही. काही वर्षांनी सुभाष घई यांनी ‘कर्ज’ चित्रपट तयार केला. यात ऋषी कपूरच्या मागील जन्मातील पत्नी सिमी गरेवाल त्याचा कारने चिरडून खाईत फेकून खून करते. अगदी सोनमने आपल्या पतीचा खून जसा केला तसाच.
सोनम रघुवंशी प्रकरणात पती राजा याच्या मृत्यूनंतर सोनमवर संशय गेला आणि तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाने ‘हसीन दिलरुबा’, ‘डार्लिंग’ आणि ‘जाने जान’ अशा चित्रपटांची आठवण करून दिली. या मालिकेत पहिलं नाव आहे ‘हसीन दिलरुबा’चं, ज्यात विक्रांत मॅसी आणि तापसी पन्नू दिसले होते. या चित्रपटात तापसीवर पतीच्या खूनाचा आरोप असतो. हा चित्रपट विनील मॅथ्यू यांनी दिग्दर्शित केला आहे. आलिया भट्टचा नेटफ्लिसवर ‘डार्लिंग’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो कौटुंबिक हिंसाचारावर आधारित उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातही नायिका आपल्या पतीचा खून करते. २०२३ मध्ये करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांचा ‘जाने जान’ हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात माया हे पात्र आपल्या पतीचा खून करते.
‘अ परफेट मर्डर’ हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता. प्रेम त्रिकोणाभोवती याच्या कथानकाची रचना केली होती. अखेरीस ती स्त्री आपल्या प्रियकराच्या बंदुकीतून आपल्या पतीवर गोळी झाडते. २००६ मध्ये आलेल्या ‘प्रोवोड’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात अॅशने किरणजीत नावाच्या महिलेचं पात्र साकारलं होतं. ही महिला लग्नानंतर अमेरिकेला जाते आणि तिचा पती तिला मारहाण करतो. एके दिवशी त्रासाला कंटाळून ती आपल्या पतीचा खून करते.
बेवफाई, प्रेम, लालच आणि कटकारस्थानाची कहाणी २००३ मध्ये आलेल्या ‘जिस्म’ या सुपरहिट चित्रपटाची आठवण करून देते. या चित्रपटात बिपाशा बसूने सोनिया हे पात्र साकारलं होतं. एक सुंदर आणि धूर्त स्त्री. ती आपल्या पतीला कंटाळून एका वकिलाला (जॉन अब्राहम) प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. वकील तिच्या प्रेमात आंधळा होतो आणि तिच्यासाठी खून करतो.
रुपेरी पडद्यावर नायिकेच्या प्रतारणेचे भरपूर किस्से आहेत. हे चित्रपट लग्नानंतरचं प्रेम आणि फसवणूक यावर आधारित आहेत. त्यामध्ये पत्नी प्रतारणा करत पतीला फसवते किंवा त्याला संपवते. फ्रेंच चित्रपट ‘द अनफेथफुल वाइफ’ (१९६९) हा एक कामुक थ्रिलर आहे, जो एका विश्वासघातकी पत्नीची कहाणी सांगतो. ‘सनम बेवफा’ (१९९१) हा चित्रपट एका अशाच पत्नीमुळे निर्माण झालेल्या दुःखाची कहाणी आहे. ‘बेवफा’ (२००७) हा चित्रपट अशा जोडप्याची कथा सांगतो जे आपल्या लग्नात समाधानी नसतात आणि पत्नी प्रतारणा करते. ‘गहराइयां’ (२०२२) या चित्रपटात पत्नी (दीपिका) आपल्या लग्नात समाधानी नसते आणि तिच्या कौटुंबिक समस्येमुळे तिला लग्नासोबतच विश्वासघातास सामोरे जावे लागते. ‘कभी अलविदा ना कहना’ (२००६) या चित्रपटात दोन पात्रे आपापल्या लग्नाने त्रस्त होऊन एकमेकांशी अफेअर ठेवतात. या चित्रपटांपैकी काहींमध्ये पत्नीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, तर काहींमध्ये तिचा दृष्टिकोन समजून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
फक्त हिंदीतच नव्हे, तर इंग्रजीतसुद्धा ३५ वर्षांपूर्वी ‘बरीड अलाइव्ह’ हा असाच चित्रपट आला, ज्याच्या प्लॉटने प्रेक्षकांचे होश उडवले. १९९० मध्ये आलेल्या या अमेरिकन चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँक डाराबाँट यांनी केलं होतं. यामध्ये टिम मॅथेसन, जेनिफर जेसन लेह, विलियम एथरटन आणि होयट एस्टन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला जबरदस्त यश मिळालं. १९९७ मध्ये याचा सिक्वेल ‘बरीड अलाइव्ह-२’ देखील प्रदर्शित झाला. यामध्ये पत्नी आपल्या प्रियकरासोबत पतीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते. पती मरत नाही, तरीसुद्धा त्याला पुरलं जातं. अर्धमेला पती कबरीतून बाहेर येतो. घरी परततो, तिथे त्याला आपल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराची खरी ओळख पटते. तो दोघांचा सामना करण्याऐवजी बरा होण्यासाठी लपतो. त्यानंतरचा थ्रिलर भाग अत्यंत रोमांचक आहे.
Check Also
विमान अपघातांचे रुपेरी चित्रण
अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …